Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तरी, खरा निकाल...; तज्ज्ञांनी सांगितला उद्धव ठाकरेंसमोरचा एकमेव मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 03:35 PM2023-02-19T15:35:19+5:302023-02-19T15:41:38+5:30

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: शिवसेना आणि ठाकरे हे समीकरणच संपल्यासारखे अनेकांना वाटत आहे. परंतू, खरेच तसे होईल का? उद्धव ठाकरे संपतील का? त्यांच्यासमोर काही पर्याय आहेत का? असेही सवाल उपस्थित होत आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण देऊन टाकली अन् राज्यात राजकारणाचा दुसरा अंक सुरु झाला आहे. पक्ष चोरला, बाप चोरल्याचे आता आरोप होऊ लागले आहेत. असे असताना शिवसेना आणि ठाकरे हे समीकरणच संपल्यासारखे अनेकांना वाटत आहे. परंतू, खरेच तसे होईल का? उद्धव ठाकरे संपतील का? त्यांच्यासमोर काही पर्याय आहेत का? असेही सवाल उपस्थित होत आहेत.

'सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS)' च्या 'लोकनीती' या कार्यक्रमाचे सह-संचालक संजय कुमार यांनी यावर माहिती दिली आहे.

शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिल्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे अजिबात आश्चर्य वाटले नसल्याचे ते म्हणाले. तो कायदेशीर निर्णय आहे असे वाटते. निवडून आलेले आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असले तरी कार्यकर्ते आणि पक्ष त्यांच्यासोबत असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाकडून केला जात आहे. या दाव्यासाठी पुराव्याची गरज होती, असे ते म्हणाले.

पण निवडून आलेले आमदार कोणाच्या पाठीशी उभे आहेत हे दिसल्याने आयोगाने तसा निर्णय घेतला. पक्षात ज्या प्रकारे फूट पडली आहे, त्यावरून बहुतांश आमदार शिंदे यांच्या पाठीशी आहेत आणि त्यामुळेच ते सरकार स्थापन करू शकले आहेत, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे मला आश्चर्य वाटत नाही, असे कुमार म्हणाले.

निवडणूक आयोग कोणताही असंवैधानिक निर्णय घेईल असे मला वाटत नाही. ते घटनाबाह्य असते तर निवडणूक आयोगाने हा निर्णय कधीच घेतला नसता. परंतु, हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असताना आयोगाने असा निर्णय घ्यावा की नाही हा प्रश्नच आहे असे ते म्हणाले.

निवडणूक आयोगाने नियम धाब्यावर बसवून कोणताही निर्णय घेतला असेल, असे वाटत नाहीय. कारण त्याचे परिणाम सर्वोच्च न्यायालयात भोगावे लागू शकतात. उपलब्ध पुरावे पाहता आयोगाने योग्य निर्णय दिला आहे, असे वाटते.

आता उद्धव ठाकरेंकडे जे काही उरले आहे, तेही येणाऱ्या काळात निसटताना दिसेल. कारण आता आयोगानेही खरी शिवसेना शिंदे गटाला मान्यता दिली आहे. आता शिंदे गटाकडे शिवसेनेचे नाव आणि चिन्ह दोन्ही आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला धोका निर्माण झाला आहे, असे कुमार म्हणाले.

खरी-खोटी शिवसेना ही लढत कुणाच्या बाजुने जाताना दिसतेय हे सांगणे सध्यातरी कठीण आहे. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. ही लढाई दोन्ही बाजूंनी न्यायालयात लढली जाणार आहे. सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या आहेत, असे ते म्हणाले.

महापालिकांच्या निवडणुका होणे बाकी आहे. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होतील. या निवडणुकांमध्ये उद्धव गटाने चांगली कामगिरी केली आणि शिंदे गट काही कारणाने मागे पडला, तर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठी उलथापालथ होणार आहे. उद्धव गटाने निवडणुकीत चांगली कामगिरी केल्यास ते पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात परतू शकतात, असे कुमार म्हणाले.

परंतू जर या निवडणुकांत ठाकरे गटाची चांगली कामगिरी झाली नाही तर ठाकरे कुटुंबाच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील हस्तक्षेपाला सुरुंग लागेल आणि त्यांचे राजकारण संपुष्टात येईल. निवडणूक आयोगाने निर्णय दिला असला तरी. सुप्रीम कोर्टाचा निर्णयही येणार आहे. पण ठाकरे की शिंदे याचा केवळ निवडणुकाच निकाल लावू शकतात, असे मत कुमार यांनी व्यक्त केले.

याबाबतचा खरा निर्णय जनतेच्या दरबारात होणार आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जतन करण्याचा उद्धव यांच्याकडे जनतेचा पाठिंबा हाच एकमेव मार्ग आहे, असेही कुमार म्हणाले.