दसरा मेळाव्याआधी भाऊ-बहीण भिडले; एक शिंदे समर्थक तर दुसरे ठाकरेंचे निष्ठावंत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 02:04 PM2022-10-05T14:04:04+5:302022-10-05T14:07:30+5:30

दसरा मेळाव्यानिमित्त ठाकरे-शिंदे गटाकडून जास्तीत जास्त गर्दी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खासगी बसेस, वाहनं, रेल्वे भरून लोक राज्याच्या कानाकोपऱ्यातून दसरा मेळाव्याला हजर राहत आहे. यंदा मुंबईत २ दसरा मेळावा आहेत त्यामुळे याच मेळाव्याच्या माध्यमातून वर्चस्व दाखवून देण्याची तयारी शिंदे-ठाकरे गटाने केली आहे.

दसरा मेळाव्याला सुरुवात होण्याआधी जळगावात आमदार किशोरी पाटील आणि त्यांच्या भगिनी वैशाली पाटील सूर्यवंशी यांच्यात शाब्दिक युद्ध रंगल्याचं दिसून आले. जबरदस्तीने वाहनं भरून लोकांना घेऊन जाणे. गर्दी करणे याला काय अर्थ नाही असा आरोप वैशाली पाटील सूर्यवंशींनी केला.

वैशाली पाटील सूर्यवंशी म्हणाल्या की, भाड्याने लोक मेळाव्यासाठी नेले जात आहेत. गद्दारी जिथे जिथे झाली तिथे शक्तीप्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न होतोय. परंतु हे फार थोड्या काळासाठी आहे. तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही. माणूस मनापासून ज्या गोष्टी करतो ते महत्त्वाचं आहे. शिवसेनेत वर्षानुवर्षे मेळाव्यासाठी स्वत:हून माणूस जातो असं त्यांनी सांगितले.

तसेच दसरा मेळाव्याला कुणाला घेऊन जाण्याची गरज भासत नाही. शिवसैनिक उत्स्फुर्त आहे. कुणाच्या मेळाव्याला किती गर्दी होते हे संध्याकाळी दिसणार आहे. आम्हाला वाहनं भरून नेण्याची आवश्यकता वाटत नाही असं म्हणत वैशाली पाटील सूर्यवंशींनी शिंदे गटावर टीका केली.

तर बीकेसी मैदान भरायला केवळ ठाणे खूप आहे. राज्यभरातून जी माणसं बीकेसीत मेळाव्यासाठी जातील त्याठिकाणी मैदानासोबत रस्त्यांवरही तीन पट गर्दी दिसेल. एवढी मोठी संख्या बीकेसीत एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यासाठी उपस्थित राहतील असा विश्वास आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केला.

त्याचसोबत गाड्या पाठवणे, शक्तीप्रदर्शन करणे हा मुद्दा नसतो. ज्यांचा आत्ताच शिवसेनेत प्रवेश झाला. त्यांना शिवसेना काय आहे हे माहिती नाही. दसऱ्याच्या दिवशी विचारांचं सोनं लुटण्यासाठी मेळाव्याला जातात. त्या विचारावर वर्षभर संघटनेचे काम करायचं असतं. त्यामुळे विजयादशमीनिमित्त लोक उपस्थित राहतात. गर्दी जमवण्यासाठी नाही असं प्रत्युत्तर आमदार किशोर पाटील यांनी वैशाली पाटील सूर्यवंशींना दिलंय.

गर्दी ही दर्दी महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यालाच प्रचंड गर्दी असेल यात तिळमात्र शंका नाही. बाळासाहेबांचे खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचे विचार एकनाथ शिंदेंकडून ऐकायला मिळतील असंही शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी म्हटलं.

ठाकरे गट आणि शिंदे गटाने आपापले दसरा मेळाव्यात तुफान गर्दीचे करण्यासाठी कंबर कसली असून, जास्त गर्दी कोणाच्या मेळाव्यात होणार, याबाबत कमालीची उत्सुकता आहे. ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर होणार असून, त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक येण्यास आधीच सुरुवात झाली आहे.

शक्तिप्रदर्शनाची ही कांटे की टक्कर कोण जिंकणार, हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ठाकरे, शिंदे एकमेकांना जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याने राज्याचे राजकारण ढवळून निघणार आहे. दोन्ही मेळाव्यांची वेळ साधारणत: सारखीच आहे. मात्र, आधी उद्धव ठाकरे बोलणार की एकनाथ शिंदे हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

शिवसेनेचे ५० आमदार आणि १२ खासदार शिंदे गटाकडे आहेत. त्यात आता दोन खासदार, पाच आमदारांचा बीकेसीच्या मैदानावर प्रवेश झालेला दिसेल असा दावा करत शिंदेसोबत आहे तीच खरी शिवसेना आहे, जी बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहे. शिवसेनेला सदैव शिव्या देणाऱ्यासोबत आम्ही गेलेलो नाही, या शब्दांत खासदार कृपाल तुमानेंनी निशाणा साधला आहे.