Maharashtra Politics: “…तर शिंदे गटाला धनुष्यबाण मिळणार नाही, शिवसेनेचं निवडणूक चिन्हच गोठवलं जाईल”

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 07:36 AM2022-10-04T07:36:44+5:302022-10-04T07:42:00+5:30

Maharashtra Politics: अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर आता धनुष्यबाण कोणाला मिळणार, यावरून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. एकीकडे पक्ष, संघटना वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) झटताना दिसत आहे. तर दुसरीकडे, शिंदे गटाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे.

यानंतर शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. यातच अंधेरीतील पोटनिवडणूक जाहीर झाल्याने आता शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा होऊ लागली आहे. उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत मोठा दावा केला आहे.

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये शक्तिप्रदर्शनाची चढाओढ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. दसरा मेळाव्यानंतर पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल. मात्र, शिवसेना आणि शिंदे गटाच्या संघर्षात धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार, यावरून अनेक तर्क-वितर्क दिले जात आहेत.

याच पार्श्वभूमीवर विशेष सरकारी वकील आणि कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत मोठे भाष्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात ही बाब स्पष्ट केली आहे की, निवडणूक चिन्ह किंवा राजकीय पक्षाची मान्यता हा विषय केंद्रीय निवडणूक आयोगाने सोडवायचा आहे, असे निकम यांनी सांगितले.

अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत कोणते पक्ष उभे राहणार आहेत? ते बघावे लागेल. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपसह शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून उमेदवार जाहीर केले, तर निवडणूक आयोगासमोर पेच निर्माण होईल. तसेच अंधेरी पोटनिवडणुकीच्या तारखेआधी हा पेच मिटवता आला नाही. तर निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचे निवडणूक धनुष्यबाण चिन्ह गोठवले जाऊ शकते, असा दावा उज्ज्वल निकम यांनी केला आहे.

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या माध्यमातुन राज्यात सत्तांतरानंतर पाहिलीच निवडणुक होत आहे. या निवडणुकीच्या माध्यामातून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात थेट लढत होत आहे.

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत जर शिंदे गटाने उमेदवार दिला नाही तर उद्धव ठाकरे गटाला धनुष्यबाण मिळू शकते. परंतु, शिंदे गटाने या पोट निवडणुकीत आपला उमेदवार दिला तर मात्र निवडणूक आयोगापुढे पेच निर्माण होऊ शकतो, असेही उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे.

शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटांनी निवडणुकीत आपले उमेदवार जाहीर केले, तर निवडणूक चिन्ह कोणाला द्यायचे, याचा निर्णय निवडणूक आयोगाला घ्यावा लागेल. दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगासमोर पुरावे सादर करावे लागतील. ही प्रक्रिया किती दिवस चालेल, याबाबत स्पष्टपणे सांगता येणार नाही.

अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या आधी दोन्ही गटांना निवडणूक आयोगासमोर पुरावे सादर करता आले नाहीत. तर आयोगापुढेच एकच पर्याय उरतो, तो म्हणजे निवडणूक चिन्ह गोठवणे, असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाला सहा महिन्यांच्या आत चिन्हासंदर्भात निर्णय घेणे बंधनकारक आहे, असे उज्ज्वल निकम यांनी नमूद केले आहे. धनुष्यबाण कुणाचा? ठाकरेंचा की शिंदेंचा? पुढची लढाई कोण जिंकणार? या सगळ्याचा निर्णय आता निवडणूक आयोगच देणार आहे.

अंधेरी पूर्व मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाले आहे. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीसाठी ०३ नोव्हेंबरला मतदान होणार असून ०६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

शिवसेनेने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. तर, शिंदे – फडणवीस यांच्यातील बैठकीत पोटनिवडणूकीमध्ये भाजप आपला उमेदवार उतरवणार असल्याचे सांगितले जात आहे.