१०० कोटीत कॅबिनेट मंत्रिपद?; 5 स्टार हॉटेलमध्ये आमदारासोबत झाली बैठक अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 09:27 AM2022-07-20T09:27:27+5:302022-07-20T15:51:42+5:30

महाराष्ट्रातील सत्ता नाट्यानंतर मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली आहे. आता शिंदे-फडणवीस सरकारपुढे मंत्रिमंडळ विस्ताराचं आव्हान आहे. १५ दिवसांहून अधिक काळ झाला तरीही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही.

आमदारांच्या अपात्रेबाबत सुप्रीम कोर्टात याचिका प्रलंबित असल्याने मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत असल्याचं बोललं जात आहे. त्यात शिंदे-भाजपातील अनेक जण मंत्रिमंडळासाठी लॉबिंग करत असल्याचंही पुढे येत आहे.

राज्यातलं मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच काही महाठगांनी एका आमदाराला मंत्री बनवण्यासाठी जाळ्यात अडकवण्याचं षडयंत्र उघड झाले आहे.

एका आमदाराच्या खासगी सचिवाच्या तक्रारीवरून मुंबई क्राइम ब्रांचनं ४ आरोपींना अटक केली आहे. त्यात रियाज शेख, योगेश कुलकर्णी, सागर संगवई आणि जाफर उस्मानी यांचा समावेश आहे. किला कोर्टाने या सर्व आरोपींना २६ जुलैपर्यंत क्राईम ब्रांच कस्टडीत पाठवले आहे.

FIR नुसार, आमदार ते मंत्री बनण्यासाठी आरोपींनी १०० कोटींची मागणी केली होती. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बैठक झाली. मुंबई क्राईम ब्रान्चने मंगळवारी किला कोर्टात या प्रकरणात खुलासा केला. आरोपी रियाज शेखनं आमदाराच्या सचिवाला अनेकदा फोन करू आमदारांची ४ वाजता बैठक आहे परंतु ते फोन उचलत नाही अशी बतावणी केली.

त्याच संध्याकाळी ४.३० वाजता दक्षिण मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेल बैठकीला बोलावले. रियाजचा वारंवार आमदाराच्या पीएला फोन आला. त्यात तुम्हाला १०० कोटीमध्ये कॅबिनेट मंत्री बनवतो अशी ऑफर दिली.

आमदाराने पीएच्या माध्यमातून रियाजला ५.१५ वाजता कॅफेमध्ये भेटायला बोलावले. त्याठिकाणी रियाजसोबत आमदाराची बैठक झाली. रियाजनं ९० कोटीमध्ये व्यवहार फिक्स केला. परंतु १८ कोटी आगाऊ रक्कम देण्यास सांगितले.

आमदाराने १ दिवसाची मुदत मागत पीएला ही घटना सांगितली. त्यानंतर १८ जुलै रोजी रियाजला दुपारी १.१५ मिनिटांनी नरिमन पाँईटला बोलावले तेव्हा मुंबई क्राईम ब्रान्चने सापळा रचला होता. रियाज त्याठिकाणी आमदाराला भेटण्यासाठी पोहचला. तेव्हा साध्या कपड्यात असणाऱ्या अधिकाऱ्यांनी रियाजला पकडले.

चौकशीत रियाजनं इतर तिघांची नावे उघड केली. तपासावेळी रियाज म्हणाला की, योगेशने त्याची ओळख सागरशी केली होती. आमदाराला मंत्री बनवण्यासाठी दिल्लीत ५०-६० कोटी रेट आहे. योगेशनं रियाजकडून आमदाराचा बायोडेटा मागवून सागरच्या व्हॉट्सअपवर फॉरवर्ड केला होता.

सागरच्या चौकशीत त्याने जाफर उस्मानी मास्टर माईंड असल्याचं सांगितले. त्यानंतर पोलिसांनी जाफरला बेड्या ठोकल्या. आरोपींचे मोबाईल आणि सिम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत.