राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू होणार?; मोदी सरकारच्या स्पष्ट सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 08:02 PM2021-07-14T20:02:50+5:302021-07-14T20:10:19+5:30

नागरिक विनाकारण बाहेर पडत असल्यानं; नियमांचं पालन करत नसल्यानं केंद्राचं राज्यांना पत्र

देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यातच अनेक राज्यांनी निर्बंध काही प्रमाणात शिथिल केल्यानं सार्वजनिक ठिकाणांवरील गर्दी वाढली आहे.

डोंगराळ प्रदेशात असलेल्या पर्यटनस्थळी गेल्या काही दिवसांपासून गर्दी वाढत आहे. तिसऱ्या लाटेला आमंत्रण ठरू शकणाऱ्या या गर्दीचे फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबद्दल चिंतादेखील व्यक्त केली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन मोदी सरकारनं राज्यांसाठी नियमावली जारी केली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन होत असल्यास कठोर पावलं उचला, अशा सूचना केंद्रीय गृह सचिवांनी राज्यांना दिल्या आहेत.

कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळण्यात हयगय होत असल्यास त्यासाठी अधिकाऱ्यांना व्यक्तिगत स्वरुपात जबाबदार धरा, असे आदेश केंद्रानं राज्य सरकारांना दिले आहेत.

एखाद्या परिसरात, बाजारात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन होत नसल्यास त्या ठिकाणी कठोर निर्बंध लागू करा. तशा प्रकारचे निर्बंध लागू करण्याची जबाबदारी प्रशासनाची असेल, असं केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी पत्रात म्हटलं आहे.

पर्यटनस्थळी वाढत असलेल्या गर्दीबद्दल पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वीच चिंता व्यक्त केली. पर्यटनस्थळी गर्दी वाढत असून सोशल डिस्टन्सिंगचं पाळलं जात नाही. अनेक लोक मास्कही घालत नाही, अशा शब्दांत मोदींनी वाढत्या गर्दीबद्दल नाराजी बोलून दाखवली होती.

केंद्रीय गृह मंत्रालयानं नियमावली जारी केल्यानंतर आज राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. दुकानांच्या वेळा वाढवाव्यात आणि दोन डोस घेतलेल्यांना लोकलमधून प्रवास करू द्यावा अशा दोन मागण्या गेल्या काही दिवसांपासून केल्या जात होत्या. मात्र याबद्दल कोणताही निर्णय घेण्यात न आल्याचं मंत्रिमंडळ बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. तेदेखील तसेच लागू राहणार असल्याचं राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सध्या तरी राज्य सरकार कोणत्याच प्रकारचे निर्बंध शिथिल न करण्याच्या विचारात असल्याचं दिसत आहे.