"राजकीय अर्थ काढू नका", मनोहर जोशींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 09:38 PM2022-07-28T21:38:37+5:302022-07-28T21:46:35+5:30

Eknath Shinde : विशेष म्हणजे, मनोहर जोशी आणि एकनाथ शिंदे यांच्यासमोर बुद्धिबळाचा डावही मांडलेला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना आता शिवसेनेवर (Shivsena) वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. दुपारी शिवसेनेचे कार्यकारिणीचे सदस्य लिलाधर डाके (Liladhar Dake) यांची भेट घेतल्यानंतर आता संध्याकाळी मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची भेट घेतली.

मनोहर जोशी यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनोहर जोशी हे शिवसेनेचे प्रमुख नेते होते. त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. त्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा नेहमीच कामाला येईल. आज मनोहर जोशी यांनी मला ६० योजनांचे एक पुस्तक दिले, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

याचबरोबर, या योजनांची युती सरकारच्या काळात घोषणा केली होती. त्यांनी या योजना राबविण्याचा सल्ला दिला. बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित योजनांची माहिती मनोहर जोशी यांनी दिली, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

याशिवाय, या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नाही. त्यामुळे कोणताही राजकीय अर्थ काढू नका. आम्ही शेतकरी, कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, मनोहर जोशी आणि एकनाथ शिंदे यांच्यासमोर बुद्धिबळाचा डावही मांडलेला होता. त्यामुळे या भेटीत एकनाथ शिंदे आणि मनोहर जोशी यांनी एखादा नवा राजकीय डाव रचण्याविषयी चर्चा केली का? हे आगामी काळात स्पष्ट होईल.

यावेळी शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार सदा सरवणकर, शिवसेना सचिव किरण पावसकर, मनोहर जोशी यांचे सुपुत्र उन्मेष जोशी तसेच त्यांचे नातूही उपस्थित होते.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या ज्येष्ठ शिवसेना नेत्यांना आपल्या गटात सामील करण्यासाठी एकनाथ शिंदेनी खास रणनीती आखल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार एकनाथ शिंदेंनी गाठीभेटी घ्यायला सुरूवात केली आहे. गेल्या आठवड्यात एकनाथ शिंदे यांनी शस्त्रक्रिया झालेले खासदार गजानन किर्तीकरांची भेट घेतली होती.

बुधवारी रामदास कदम यांच्या निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होता. तर गुरुवारी सकाळी ज्येष्ठ शिवसेना नेते लीलाधर डाके यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेतली. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांण उधाण आले आहे.