अभिनेता अमीर खान अन् किरण राव झाले वेगळे; आता महाराष्ट्रात ‘पानी फाऊंडेशन’चं पुढे काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 12:54 PM2021-07-03T12:54:32+5:302021-07-03T13:00:43+5:30

Aamir Khan and Kiran Rao announce divorce after 15 years of marriage: अभिनेता अमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी १५ वर्षाच्या संसारानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांच्या निर्णयामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

मागील ४ दशकं महाराष्ट्रात दुष्काळानं थैमान घातलं होतं. करपलेली पिकं, कोरडा दुष्काळ, पिण्यासही पाणी नाही अशा विविध समस्यांचा सामना राज्यातील जनतेला करावा लागत होता. अभिनेता अमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी हीच समस्या ओळखून या क्षेत्रात काम करायचं ठरवलं.

मानवावर हे संकट स्वत:च्या कृतीतून ओढावून घेतलेले आहे. हवामानबदलामुळे पाणी अन्य नैसर्गिक स्त्रोतांचा वापर बेसुमार झाला. या संकटावर मात करण्यासाठी जलसंधारण, जलव्यवस्थापन आणि पर्यावरण पुनरुज्जीवन या पद्धतींचा उपाय केला जाऊ शकतो असं तज्त्रांनी सांगितले.

यासाठी अमीर खाननं राज्यातील गावोगावी जाऊन गावकऱ्यांना एकत्रित करून बदल घडवून आणण्याचा चमत्कार केला. पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून अमीर खान, किरण राव यांच्या टीमने राज्यात जलक्रांती घडवण्याचं काम हाती घेतलं. लोकं मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन एक चळवळ उभी राहिली.

लोकांच्या एकजुटीतून उपाय आणि तंत्रज्ञानाला अधिकाधिक वाव देऊन महाराष्ट्र दुष्काळमुक्त आणि संपन्न करण्याच्या ध्येयातून पानी फाऊंडेशनची स्थापना झाली. २०१६ ते २०१९ या कालावधीत सत्यमेव जयते वॉटर कप नावाची स्पर्धा घेण्यात आली. उत्कृष्ट मृदा आणि जलसंधारण करण्यासाठी ही स्पर्धा आयोजिक करण्यात आली होती.

या स्पर्धेमुळे गावपातळीवर लोकांना एकत्र आणून अतिशय सकारात्मक वातावरणात दुष्काळाची समस्या सोडवण्याची संधी गावकऱ्यांना मिळाली. श्रमदान आणि प्रशिक्षण या माध्यमातून अनेक गावांनी या स्पर्धेत सहभाग घेत भरीव योगदान दिले.

पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून झालेल्या या कामामुळे गेल्या ४ वर्षात सत्यमेव जयते स्पर्धेत सहभागी असणाऱ्या गावकऱ्यांच्या सहकार्याने राज्यात ५५० अब्ज लीटर क्षमतेचा पाणीसाठा तयार होऊ शकला. पानी फाऊंडेशनतर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रशिक्षणासाठी प्रत्येक सहभागी स्पर्धक गावाने ५ गावकऱ्यांना पाठवले जात होते.

२०१६ मध्ये राज्यात हा प्रयोग सुरू झाला. या कामाला एका चळवळीचं स्वरूप प्राप्त झालं. पानी फाऊंडेशन याची संकल्पना आणि स्थापना अभिनेता अमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी केली होती. पानी फाऊंडेशनच्या जलसंधारण कामांमुळे संपूर्ण राज्याला फायदा झाला अनेक गावांचा पाणी प्रश्न मिटला.

मात्र आज पानी फाऊंडेशनचे संस्थापक असलेले अमीर खान आणि किरण राव यांनी १५ वर्षाच्या संसारानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. अमीर खान आणि किरण राव यांनी संयुक्त निवेदनाच्या माध्यमातून घटस्फोटाची घोषणा केली आहे.

अमीर खान आणि किरण राव यांच्या वेगळे होण्याच्या निर्णयाचा अनेकांना धक्का बसला आहे. या दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री होती. नेमका हा घटस्फोटाचा निर्णय या दोघांनी का घेतला? असा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे. पण महत्त्वाचं म्हणजे आता पाणी फाऊंडेशनचं पुढे काय होणार? असंही विचारलं जात आहे.

मात्र अमीर खानने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, काही दिवसांपासून आम्ही वेगळे होण्याचा विचार करत होतो. पण आता ती वेळ आली आहे. आम्ही नवरा-बायको म्हणून वेगळं होतोय. परंतु आमचं वैवाहिक नातं संपुष्टात आलं असलं तरी व्यावसायिक नातं कायम आहे. फिल्म, पानी फाऊंडेशन आणि इतर प्रकल्पांवर आम्ही एकत्र काम करणार आहोत असं त्याने स्पष्ट सांगितले आहे.

Read in English