१५० एकर जागा, ५० जेसीबी, २५ लाख लोकं; जरांगे पाटलांच्या सभेसाठी कोण करतंय खर्च?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 12:15 PM2023-10-12T12:15:25+5:302023-10-12T12:19:27+5:30

मराठा आरक्षणासाठी जालनातील अंतरवाली सराटी इथून राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी गावात जय्यत तयारी सुरू आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी जरांगो पाटील यांनी उपोषण केले होते. जरांगे पाटलांच्या या उपोषणाला समाजाची मोठी साथ मिळाली. त्यातूनच पुन्हा एकदा मराठा आंदोलन राज्यभरात उभे राहिले.

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे घेण्यासाठी सरकारच्या नाकीनऊ आले. सरकारने जीआर काढला, खुद्द मुख्यमंत्री शिंदे जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्यासाठी अंतरवाली सराटी गावात पोहचले होते. या उपोषणानंतर जरांगे पाटील राज्यभरात दौरा काढत आहेत. ठिकठिकाणी जरांग पाटील यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. त्यात १४ ऑक्टोबरला होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे १४ ऑक्टोबर रोजी सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू असून, युद्धपातळीवर सभेच्या ठिकाणी कामे सुरू आहेत. सभास्थळी १० फूट उंच स्टेज सभेसाठी उभारण्यात येणार आहे.

बीडमधून अंतरवाली सराटी इथं ५० जेसीबी पोहचले आहेत. जरांगेच्या सभेसाठी जवळपास १०० एकर जागा निश्चित होती. परंतु एवढी जागा अपुरी पडेल या दृष्टिकोनातून परिसरातील आणखी जागा साफ करण्यासाठी बीड जिल्ह्यातून पन्नास जेसीबी मागवण्यात आले. मराठा समाज बांधव लोक वर्गणी आणि सहभाग घेत सभेसाठी आपले योगदान देत आहेत.

ही सभा अंतरवाली सराटी शिवारातील १०० एकर परिसरात होणार होती. परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या राज्य दौऱ्याला मिळणारा प्रतिसाद पाहता सभेला २५ लाख लोकं जमतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सभेच्या जागेच्या साफसफाईसाठी जेसीबी, ट्रॅक्टरद्वारे लेवलिंग सुरू आहे. जागेसाठी शेतकऱ्यांनी शेतातील सोयाबीनही काढण्याचे काम सुरू आहे.

धुळे -सोलापूर महामार्गापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या अंतरवाली सराटी येथे सभेचे ठिकाण आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धुळे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या वडीगोद्री ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ६० एकर, अंतरवाली सराटी येथील २० एकर, नालेवाडी येथील २० एकर जागेवर वाहनांची पार्किंग ठेवण्यात आली आहे.

सभास्थळ व वाहन पार्किंगच्या जागेची जेसीबी ट्रॅक्टरच्या साहाय्याने साफसफाई करण्याचे काम सुरु आहे. गावातील तरुण मंडळींनी तूर उपटली आहे. . या सभेच्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला असलेले काटे व गवतही काढण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील १२३ गावांनी मिळून सभेचा खर्च उचलला आहे.

महाशक्ती रुग्णवाहिका रुग्णवाहिका संघटनेकडून सभास्थळी ६० रुग्णवाहिका सेवा देणार आहेत. सभेच्या ठिकाणी आरोग्य संदर्भात काही समस्या उद्भवल्यास तत्पर सेवा म्हणून ३० कार्डियाक रुग्णवाहिका व अजून ३० रुग्णवाहिका सेवेसाठी राहणार आहेत. ३० कार्डियाक रुग्णवाहिकेत एक डॉक्टर, नर्स व अत्यावश्यक सेवा मध्ये व्हेंटिलेटर, सर्व प्रकारचे औषध उपलब्ध राहतील जेणेकरून रुग्णांवर ताबडतोब उपचार केले जाणार आहेत.

सभेचा आढावा स्थानिक आयोजक व पोलीस प्रशासनाच्या इतर विभागांकडून घेतला जात आहे. राज्यभरातून येणाऱ्या मराठा बांधवांना वाहतुकीचा त्रास होणार नाही, याची खबरदारी घेतील जाईल. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सभेच्या स्टेजची पाहणी करून मनोज जरांगे यांना कोणत्या बाजूने आणणार, त्यांची काय खबरदारी घेतली. आदी बाबींची पोलीस योजना आखत आहेत.

एकच मिशन... ५० टक्क्यांच्या आत मराठा आरक्षण, अशा प्रकारचे बॅनर सभास्थळी लागले आहेत. अंतरवाली सराटीपासून ५० कि. मी. अंतरावरील सर्व गावातील मराठा बांधवांनी दुचाकी अथवा पायी सभास्थळी यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. मुक्कामी येणाऱ्यांसाठी विविध ठिकाणी सोय करण्यात आली आहे.