Maharashtra Political Crisis: सीमोल्लंघन ठरलं! ठाकरेंचे १५ निष्ठावंत दसरा मेळाव्यात शिंदे गटात? शिवसेनेतील गळती वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 02:57 PM2022-09-07T14:57:21+5:302022-09-07T15:01:37+5:30

Maharashtra Political Crisis: दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्यासाठी शिंदे गटाने रणनीति आखल्याचे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) राज्यभरातून वाढता पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हेदेखील राज्यभर दौरे करत आहेत. दुसरीकडे, दसरा मेळाव्यावरूनही शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष वाढताना दिसत आहे.

दादरमधील शिवाजी पार्कच्या (Shivaji Park) मैदानावरील दसरा मेळाव्यावरुन (Dassera Melava) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. अशातच दसरा मेळाव्यात शिंदे गट ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.

शिवसेनेचे १०-१५ नेते विजयादशमीला शिंदे गटात 'सीमोल्लंघन' करणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटातील एक खासदार, दोन आमदार आणि पाच माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. या आठ लोकप्रतिनिधींसह एकूण दहा ते पंधरा शिवसेना नेत्यांनी शिंदे गटाचा रस्ता धरल्याची चर्चा सुरू आहे.

या सर्वांची वेगवेगळ्या महामंडळांवर वर्णी लागण्याची शक्यता आहे किंवा त्यांना महत्त्वाच्या पदांवर जबाबदारी मिळण्याची चिन्हे असल्याची कुजबूज आहे. अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गटाच्या शिवसेनेत सामील झालेल्या अनेक नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देऊन संघटना मजबूत करण्यावर भर दिल्याचे दिसत आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांची हरतऱ्हेने कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आधी ४० आमदार, मग १२ खासदार, काही माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले. आता एक खासदार आणि दोन आमदारही त्यात सहभागी झाल्यास हा आकडा वाढून ४२ आमदार १३ खासदार असा होईल, असे म्हटले जात आहे.

अनेक पदाधिकारी-शिवसैनिक यांना फोडल्यानंतर शिंदेंनी ठाकरेंचे विश्वासू आणि निकटवर्ती नेतेही गळाला लावण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी जुन्या जाणत्या नेत्यांनाही शिंदेंनी जवळ ओढण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह यावर दावा सांगितलेला असतानाच आता शिवसेना, ठाकरे आणि दसरा मेळावा हे समीकरणही भेदण्याचा प्रयत्न शिंदे करताना दिसत आहेत.

उद्धव ठाकरे यांना 'शिवतीर्था'वर दसरा मेळावा घेता येऊ नये आणि ठाकरेंची परंपरा खंडित व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने वेगळी रणनीती आखल्याची माहिती आहे. प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर शिवाजी पार्कच्या मैदानावर परवानगी दिली जात असल्यामुळे ठाकरेंचे पारडे जड मानले जाते. त्यामुळे शिंदे गटाने थेट शिवाजी पार्क मैदानच गोठवण्याची तयारी केल्याचे सांगितले जात आहे.

शिंदे गटाने बीकेसीतील एमएमआरडीए मैदानासाठीही अर्ज केल्याचे म्हटले जात आहे. तसेच मुंबईतील अनेक मोठ्या मैदानांसाठीही शिंदे गटाने फील्डिंग लावल्याची माहिती आहे. दोन्ही गटांनी शिवाजी पार्कसाठी दावा केल्यामुळे मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शिवाजी पार्कच्या परवानगीचा निर्णय गोठवला जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्क किंवा बीकेसीच काय, तर मुंबईतील कुठलेही मोठे मैदान दसरा मेळाव्याच्या सभेसाठी मिळू नये, यासाठी शिंदेंनी कोंडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.