कॉम्प्युटरच्या माऊसला 'माऊस' का म्हणतात? जाणून घ्या यामागचा मजेशीर इतिहास...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 05:47 PM2021-10-27T17:47:52+5:302021-10-27T17:50:20+5:30

कॉम्प्युटरच्या माऊसला 'टर्टल' म्हणजेच कासव असेही नाव देण्यात आले होते.

संगणकावर काम करण्यासाठी आपण सर्वजण माउस वापरतो. स्क्रीनवर 'अॅरो'ला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा आयकॉनवर क्लिक करण्यासाठी माउसची गरज असते. पण तुम्ही कधी विचार केला का, की या डिव्हाइसला 'मऊस' नाव का पडलं ? जगभरात अनेक लहान प्राणी आहेत, पण उंदराचंच नाव का देण्यात आलं? जाणून घेऊया संगणकाच्या या माऊसबद्दल...

खरतर जेव्हा माऊसचा शोध लागला तेव्हा त्याला 'पॉइंटर डिव्हाइस' असे नाव देण्यात आले होते. 1960 च्या दशकात डग्लस कार्ल एंगेलबार्टने याचा शोध लावला होता. विशेष म्हणजे, जगातील पहिला माऊस लाकडापासून बनवण्यात आला होता आणि त्याला 2 धातूची चाके होती. त्या काळात फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटरचा शोध लागला होता. त्या काळात संगणकाचा आकार खोलीएवढा असायचा.

कॉम्प्युटरचे माऊस हे लहान डिव्हाइस आहे आणि उंदराचाही आकार लहान असतो. तसेच, माऊसची वायर उंदराच्या शेपटीप्रमाणे दिसते. याशिवाय, ज्याप्रमाणे उंदीर चपळ असतो आणि आपली कामे वेगाने करतो, त्याच प्रमाणे हे माऊस काम करायचे. हा सर्व विचार करुन या पॉइंटर डिव्हाइसला माऊस नाव देण्यात आले.

कॉम्प्युटरच्या या माऊसबद्दल आणखी एक कथा प्रचलित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माऊसला पूर्वी कासव असेही नाव देण्यात आले होते. कॉम्प्युटरच्या या माऊसचे कवच कासवासारखे कठीण आहे आणि आकारही काहीसा सारखाच आहे. त्यामुळे काही काळ याला कासव(Turtle)असे नाव देण्यात आले होते. पण, कासवाचा वेग कमी आहे आणि उंदराचा जास्त असल्यामुळे याला माऊस नाव देण्याचं पक्क झालं.

कॉम्प्युटरच्या सुरुवातीपासून आतापर्यंत यात अनेक बदल झाले. सुरुवातीला खोलीच्या आकाराचे कॉम्प्युटर होते. पण, नंतर हळुहळू याची साईज कमी होत गेली आणि आता आपल्या हातात मावतील असे लहान कॉम्प्युटर उपलब्ध आहेत. कॉम्प्युटरसह याचे इतर डिव्हाइसही लहान होत गेले. सध्या वायरलेस माऊस उपलब्ध आहेत. तर, लॅपटॉवर पॅड असल्यामुळे माऊसची गरज भासत नाही.

Read in English