ही आहेत भारतातील प्रसिद्ध मंदिरं जिथे पुरुषांना आहे प्रवेशबंदी, अशा आहेत अख्यायिका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 01:18 PM2021-07-01T13:18:21+5:302021-07-01T13:26:34+5:30

Culture in India: काही मंदिरांमध्ये महिलांना प्रवेशबंदी असल्याचे आणि त्यावरून वाद झाल्याचे तुम्ही ऐकलेच असेल, पण या देशात काही अशीही मंदिरे आहेत ज्यामध्ये पुरुषांना प्रवेश करण्यास मनाई आहे.

हिंदू धर्म हा भारतातील प्रमुख धर्म आहे. मात्र या हिंदू धर्मामध्येही चालीरीती, प्रथा परंपरा याबाबत मोठ्या प्रमाणात वैविध्य आहे. वेगवेगळ्या हिंदू मंदिरांतील प्रवेशाबाबतही वेगवेगळे नियम आहेत. भारतात अनेक अशी मंदिरे आहेत जिथे पुरुषांना जाण्यास मनाई आहे. तर अनेक मंदिरांमध्ये वर्षातील काही दिवस केवळ महिलांनाच पूजा करण्याची परवानगी आहे, जाणून घेऊयात अशा मंदिरांविषयी.

अट्टूकल भगवंती मंदिर, केरळ - केरळमधील अट्टूकल भगवंती मंदिरामध्ये एका उत्सवाचे आयोजन केले जाते. ज्याच्या आयोजनाची जबाबदारी केवळ महिलांच्या हातात असते. यामधील प्रमुख सण अट्टूकल पोंगलमध्ये सर्वत्र केवळ महिला भक्तांची गर्दी दिसून येते.

कुठल्याही धार्मिक ठिकाणी महिलांची एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थिती असल्याने याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. सुमारे १० दिवसच चालणारा हा उत्सव फेब्रुवारीपासून मार्चपर्यंत साजरा केला जातो.

ब्रह्मा मंदिर, राजस्थान - हे मंदिर ब्रह्म देवाच्या सर्वात दुर्मीळ मंदिरांपैकी एक आहे. या प्रसिद्ध मंदिरामध्ये विवाहित पुरुषांना ब्रह्मदेवाच्या पूजेसाठी गर्भगृहात जाण्याची परवानगी नाही आहे. मंदिरामध्ये एका देवतेची पूजा होत असूनही आजपर्यंत इथे पुरुषांना जाण्याची परवानगी नाही आहे.

धार्मिक मान्यतेनुसार भगवान ब्रह्मदेव सरस्वतीसोबत यज्ञ करणार होते. मात्र देवी सरस्वती तिथे उशिरा पोहोचली. तेव्हा ब्रह्मदेवांनी देवी गायत्रीसोबत मिळून यज्ञ पूर्ण केला. तेव्हा सरस्वतीने शाप दिला की या मंदिरामध्ये आजपासून कुणी पुरुष येणार नाही. जर कुणी पुरुष आला तर त्याचे वैवाहिक जीवन दु:खी होईल.

माता मंदिर, मुझफ्फरनगर - हे मंदिर आसाममधील कामाख्या मंदिराप्रमाणे एक शक्तीस्थळ आहे. इथे देवीची मासिक पाळी सुरू असताना पुरुषांना मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी नसते. यादरम्यान मंदिरात देखभाल करण्यासाठी केवळ महिलाच प्रवेश करू शकतात.

याबाबत खूप कडक नियम लागू करण्यात आले आहेत. या शुभ प्रसंगी मंदिराचे पूजारीसुद्धा परिसरात येऊ शकत नाहीत. मंदिरामध्ये पूजा आणि आरतीची जबाबदारीसुद्धा महिलांचीच असते.

देवी कन्याकुमारी, कन्याकुमारी - भारताच्या दक्षिण भागामध्ये स्थित असलेल्या या मंदिरामध्ये वर्षातील ३६५ दिवसांपैकी कुठल्याही दिवशी पुरुषांना जाण्याची परवानगी मिळत नाही. मंदिराच्या दरवाजावर केवळ संन्यासी पुरुषांना जाण्याची परवानगी आहे. तर विवाहित पुरुषांना मंदिरात प्रवेश मिळत नाही.

या मंदिरामध्ये देवी भगवतीची पूजा केली जाते. हे मंदिर ५२ शक्तीपीठांपैकी एक असल्याचे मानले जाते. पुराण कथांनुसार माता सतीचा उजवा खांदा आणि मणक्याचा काही भाग इथे पडला होता.

कामाख्या मंदिर, आसाम - आसाममधील गुवाहाटी येथील नीलांचल पर्वतावर कामाख्या मंदिर आहे. येथे दरवर्षी अंबुबाची जत्रेचे आयोजन केले जाते. त्यासाठी लांबलांबून भक्तमंडळी येतात. मात्र या दरम्यान, चार दिवसांसाठी मंदिराचे दरवाजे बंद राहतात.

ही वेळ देवीच्या मासिक पाळीची असते. त्यामुळे त्या दिवसांत पुरुषांना मंदिरामध्ये जाण्याची परवानगी मिळत नाही. पूजा पाठ किंवा इतर कामांसाठी केवळ महिला किंवा संन्यासी पुरुषांनाच मंदिर परिसरात प्रवेश करू शकतात.