हे आहेत जगातील 10 सर्वाधिक विषारी साप, काही मिनिटातच घेऊ शकतात जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 05:31 PM2021-09-01T17:31:28+5:302021-09-01T17:59:59+5:30

Deadliest Snakes: जागतिक आरोग्य संघटनेच्या मते साप दरवर्षी 54 लाख लोकांना चावतात.

जगात अनेक विषारी प्राणी आहेत. पण, प्रामुख्यानं सापामुळे सर्वाधिक मृत्यू होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते साप दरवर्षी 54 लाख लोकांना चावतात. त्यापैकी 81 हजार ते 1.38 लाख लोकांचा मृत्यू होतो. साप चावल्यानंतर काही मिनीटांत उपचार न मिळाल्यास मृत्यू होऊ शकतो. जगात अनेक जातीचे विषारी साप आहेत, आम्ही तुम्हाला त्यातील दहा सर्वाधिक विषारी सापांबद्दल सांगणार आहोत.

1. ब्लॅक मांबा- आफ्रिकेतील सर्वात घातक साप म्हणजे ब्लॅक मांबा. वैज्ञानिक भाषेत त्याला डेंड्रोअस्पिस पॉलीलेप्सिस म्हणतात. या सापाच्या विषामुळे मानवाच्या मज्जासंस्था आणि स्नायू निष्क्रिय होतात, ज्यामुळे अर्धांगवायू होऊ शकतो. 20 मिनिटांच्या आत उपचार न झाल्यास, व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

2. फेर-डी-लान्स- फेर-डी-लान्सला वैज्ञानिक भाषेत बोथ्रोप्स एस्पर म्हणतात. त्याचे विष मानवी शरीरात प्रवेश करताच शरीर काळं-निळं पडतं. हा साप प्रामुख्यानं दक्षिण अमेरिकेत आढळतो. मध्य अमेरिकेत साप चावण्याच्या सर्व प्रकरणांपैकी अर्ध्या प्रकरणात याच सापाचा हात असतो.

3. बूमस्लॅंग- या सापाला दक्षिण आफ्रिकेचा ग्रीन ट्री साप असेही म्हणतात. याचे वैज्ञानिक नाव डिस्फोलिडस टायपस आहे. या सापाचे लहान पिलूदेखील धोकादायक आहे. हा साप चावल्यास 24 तासांमध्ये प्रौढ माणसाच्या डोळे, फुफ्फुसे, मूत्रपिंड, हृदय आणि मेंदूमधून रक्तस्त्राव सुरू होतो.

4. इस्टर्न टायगर- हा साप दक्षिण-पूर्व ऑस्ट्रेलियाच्या पर्वत आणि गवताळ प्रदेशात आढळतो. याचे शास्त्रीय नाव नोटचिस स्कुटाटस आहे. टायगर साप हे नाव त्याच्या शरीरावरील पिवळ्या आणि काळ्या पट्ट्यामुळे दिले आहे. त्याचे विष 15 मिनिटांच्या आत एखाद्या व्यक्तीला मारू शकते.

5. रसेल वायपर- हा साप भारतात आढळतो. या सापामुळे दरवर्षी सुमारे 58 हजार लोक मरण पावतात. रसेल वायपरचे वैज्ञानिक नाव डबोइया रसेली आहे. दक्षिण भारतात आणि श्रीलंकेत अनेकदा भाताच्या शेतात शेतकऱ्यांना चावतात. या सापाच्या चाव्यामुळे किडनी निकामी होते.

6. सॉ-स्केल वायपर- या सापाचे वैज्ञानिक नाव इचीस कॅरीनॅटस आहे. भारतातातील चार मोठ्या सांपांमध्ये हा आकाराने सर्वात लहान आहे. पण, याची स्पर्धा रसेल वायपर, क्रेट आणि कोब्राशी आहे. हा साप चावल्यास भयंकर वेदना होतात. आणि एक किंवा दोन तासात मृत्यू होऊ शकतो.

7. बँडेड कॅरेट- हा हळू चालणारा साप आहे. हा साप सहसा अंधारात चावते. त्याच्या चाव्यामुळे अर्धांगवायू होऊ शकतो. शरीराचा डायाफ्राम काम करणे बंद करतो. तसेच, या सापाच्या चाव्यामुळे फुफ्फुसांमध्ये हवा जाणे थांबते. यामुळे माणूस दम लागून मरतो.

8. किंग कोब्रा-हा जगातील सर्वात लांब विषारी साप आहे. याची लांबी 18 फूटापर्यंत असू शकते. हा साप आपल्या शरीराचा एक तृतीयांश भाग उंच करू शकतो. या सापाचे शास्त्रीय नाव ओफीफॅगस हॅना आहे. याच्या चाव्यानंतर 7 मिलीलीटर विष शरीरात जाते. हा साप चावल्यावर फक्त 15 मिनिटात एक हत्ती मरू शकतो. तर, साधारण माणूस काही मिनिटातच जीव सोडून देतो.

9. कोस्टल टायपन- कोस्टल टायपनला वैज्ञानिकदृष्ट्या ऑक्सीयुरेनस स्कुटेलॅटस म्हणतात. हा साप चावल्यानंतर वेगाने पळून जातो. हा साप काही फुटापर्यंत हवेत उडून आपली शिकार पकडू शकतो. हा साप ओलावा असलेल्या ठिकाणी अधिक आढळतो.

10. इनलॅंड टायपन- हा जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक आहे. हा साप ऑस्ट्रेलियामध्ये आढळते. तो मानवांच्या संपर्कात पटकन येत नाही, त्यामुळे याच्या चाव्याने मानव कमी आणि प्राणी जास्त मरण पावतात.

Read in English

टॅग्स :सापsnake