भारतातील 'या' ट्रेन्सनं तुम्ही थेट परदेशात जाऊ शकता; फक्त VISA असणं गरजेचं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 02:16 PM2023-02-24T14:16:58+5:302023-02-24T14:21:24+5:30

भारतात मोठ्या संख्येने लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात. अशा परिस्थितीत रेल्वे ही भारताची लाईफ लाईन मानली जाते. देशात भारतीय रेल्वेचे जाळे खूप मोठे आहे आणि त्यातून प्रवास करून प्रवासी देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपर्‍यात सहज पोहोचू शकतात.

पण, तुम्हाला माहिती आहे का की काही अशा ट्रेन्स देशात धावतात, ज्यात बसलेल्या प्रवाशांना एका देशातून दुसऱ्या देशात घेऊन जातात. होय, भारतात अनेक आंतरराष्ट्रीय रेल्वे गाड्या आहेत ज्या देशाला शेजारील देशांशी जोडण्याचे काम करतात.

बहुतेक वेळा जेव्हा इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंगचा विचार केला जातो तेव्हा फक्त फ्लाइटने प्रवास करण्याचा विचार आपल्या मनात येतो. पण, तसं नाही. भारतीय रेल्वे देखील बाहेरच्या देशात जातात. ज्यामुळे काही तासांतच तुम्ही देशातून परदेशात जाऊ शकता.

समझौता एक्सप्रेस - भारत आणि पाकिस्तान दरम्यान समझौता एक्सप्रेस नावाची ट्रेन धावते. ही ट्रेन नवी दिल्ली स्टेशन ते अटारी आणि नंतर अटारी बॉर्डर ते पाकिस्तानात लाहोर पर्यंत धावते. ही ट्रेन आठवड्यातून दोनदा चालवली जाते.

ही ट्रेन १९७६ मध्ये पहिल्यांदा चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर १९९४ पर्यंत ही ट्रेन रोज धावत होती. या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी तुमच्याकडे व्हिसा असणे आवश्यक आहे. या ट्रेनमध्ये बसून पंजाबमधील अमृतसरपासून २७ किलोमीटरचा प्रवास करून अटारी ओलांडून तुम्ही अवघ्या ३ ते ४ तासात पाकिस्तानातील लाहोरला पोहोचाल.

मैत्री एक्सप्रेस - जर तुम्हाला भारतातून बांगलादेशला जायचे असेल तर तुम्ही मैत्री एक्सप्रेसने सहज प्रवास करू शकता. ही ट्रेन भारतातील कोलकाता ते बांगलादेशातील ढाका पर्यंत धावते. ही ट्रेन आठवड्यातून ६ दिवस धावते.

२००८ मध्ये ही ट्रेन सुरु करण्यात आली होती. या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांकडे बांगलादेशचा व्हिसा असणे आवश्यक आहे. ही ट्रेन एकूण ३७५ किलोमीटर अंतर कापते. २०१७ मध्ये भारत आणि बांगलादेश दरम्यान आणखी एक ट्रेन सुरू झाली. बंधन एक्सप्रेस असे या ट्रेनचे नाव आहे

बंधन एक्सप्रेस - या ट्रेनची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. ही ट्रेन भारतातील कोलकाता ते बांगलादेशातील खुलना पर्यंत धावते. ही एक एसी ट्रेन आहे ज्यामध्ये प्रवास करण्यासाठी तुमच्याकडे बांगलादेशचा कायदेशीर व्हिसा असणे आवश्यक आहे.

थार लिंक एक्सप्रेस - भारत आणि पाकिस्तान दरम्यान दुसरी ट्रेन धावते जिचं नाव आहे थार लिंक एक्सप्रेस. हे भारतातील जोधपूरमधील भगत की कोठी स्टेशनपासून पाकिस्तानमधील मुनाबाओ जंक्शनपर्यंत धावते. ही ट्रेन एकूण ३२५ किलोमीटरचे अंतर कापते आणि अवघ्या ६ तासात पाकिस्तानात पोहोचते.