भारतातलं 'हे' ठिकाण स्वित्झर्लंडपेक्षाही कमी नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 04:04 PM2018-05-16T16:04:42+5:302018-05-16T16:04:42+5:30

नाथुला: 14 हजार 200 फूट उंचीवर असलेलं हे ठिकाण भारत-चीन सीमेवर आहे. या भागात केलेला कोणताही प्रवास म्हणजे जणू आनंदयात्रा असते. धुक्यात बुडालेले डोंगर, नागमोडी वळणं घेत जाणारा रस्ता, अधूनमधून दिसणारे झरे असं मनमोहक दृश्य याठिकाणी पाहायला मिळतं.

पेलिंग : हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून वेगानं प्रसिद्ध होतंय. 6 हजार 800 फुटांवर असलेल्या पेलिंगवरुन जगातील तिसरं सर्वाधिक उंच शिखर कांचनगंगा पाहता येतं.

सिक्कीम रिसर्च: तिबेटबद्दलचा अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी ही राष्ट्रीय पातळीवरील एक महत्त्वाची संस्था आहे. अनेक दुर्मिळ ग्रंथ, प्राचीन पुस्तकं या ठिकाणी आहेत. या वास्तूची रचनादेखील अतिशय सुंदर आहे.

युक्सोम: या भागात आधी सिक्कीमची राजधानी होती. सिक्कीमचा इतिहास याच भागातून सुरू होत असल्यानं हे स्थान अतिशय पवित्र समजलं जातं. प्रसिद्ध शिखर कांचनगंगावर चढाईसाठी येथूनच सुरुवात केली जाते.

सोम्गो लेक: अंडाकार आकाराचं आणि एक किलोमीटर परिसरात पसरलेलं हे तलाव अतिशय पवित्र मानलं जातं. मे ते ऑगस्ट दरम्यान येथील दृश्य डोळ्यांचं पारणं फेडणारं असतं. या भागात अतिशय दुर्मिळ फुलंदेखील पाहायला मिळतात.