Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्ध 9 मे रोजी संपणार? खास आहे या दिवसाचं महत्व, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 02:00 PM2022-04-21T14:00:55+5:302022-04-21T14:26:38+5:30

रशियानेही युक्रेनवरील हल्ले तीव्र करण्याबरोबरच अण्वस्त्र हल्ल्यांची धमकीही पुन्हा दिली आहे. येत्या १९ दिवसांत युद्धाचा खात्मा करण्याचा रशियाचा इरादा असल्याचे बोलले जात आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील लढाई आता अधिक तीव्र झाली आहे. युक्रेनने कडवा प्रतिकार चालू ठेवल्याने रशियन नेतृत्व कमालीचे बिथरले आहे. त्यामुळे अधिक आक्रमकपणे रशिया युक्रेनवर चाल करून येत आहे. आतापर्यंत ५० लाखांहून अधिक युक्रेनी नागरिकांनी देश सोडून इतरत्र आश्रय घेतला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हे युद्ध आता अंतिमतेकडे वाटचाल करत असल्याची चर्चा आहे. रशियाला ९ मेपर्यंत युद्ध संपवायचे आहे.

युद्धाची सद्य:स्थिती काय? - युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी युद्धाचा दुसरा टप्पा सुरू झाला असल्याचे अलीकडेच स्पष्ट केले. रशियानेही युक्रेनवरील हल्ले तीव्र करण्याबरोबरच अण्वस्त्र हल्ल्यांची धमकीही पुन्हा दिली आहे.

युक्रेनच्या खार्किव्ह, झोपोरिया आणि डोनेत्स्क या शहरांची रशियाने वाताहत केली आहे. येत्या १९ दिवसांत युद्धाचा खात्मा करण्याचा रशियाचा इरादा असल्याचे बोलले जात आहे.

‘९ मे’चे महत्त्व काय? - रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना ९ मे रोजी युक्रेनवर विजय हवा आहे. ९ मे या तारखेला रशियाच्या इतिहासात महत्त्व आहे. दुसऱ्या महायुद्धात याच दिवशी तत्कालीन सोव्हिएत संघाने ब्रिटन आणि अमेरिकेच्या साह्याने जर्मनीचा पाडाव केला होता.

३० एप्रिल १९४५ रोजी हिटलरच्या आत्महत्येनंतर जर्मन सैन्याची अवस्था निर्नायकी झाली होती. त्यामुळे पुढील आठ दिवसांत जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे शरणागती पत्करली. त्यावेळी रशियात ९ मे हा दिवस उजाडला होता.

तत्कालीन अध्यक्ष जोसेफ स्टॅलिन यांनी हा दिवस विजय दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते. हाच योग साधून पुतिन यांना युक्रेनचा ९ मेपर्यंत पाडाव करायचा आहे.

लष्करप्रमुख बदलले - पुतिन यांनी आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी युक्रेन मोहिमेची सूत्रे जनरल अलेक्झांडर ड्वोर्निकोव्ह यांच्याकडे सोपवली आहेत. चेचेन्या आणि सीरिया युद्धात ड्वोर्किनोव्ह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

पुतिन यांचा जनरल अलेक्झांडर ड्वोर्निकोव्ह यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. म्हणूनच ड्वोर्किनोव्ह यांच्याकडे युक्रेनची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.