"लादेनचा पाहुणचार करणाऱ्यांनी उपदेश देऊ नये", जयशंकर यांनी पाकिस्तानला UN मध्ये सुनावले खडेबोल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 04:06 PM2022-12-15T16:06:12+5:302022-12-15T16:14:36+5:30

संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्ताननं काश्मीर प्रश्नावर टिप्पणी केल्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. जो देश ओसामा बिन लादेनचा पाहुणचार करत होता. ज्या देशानं आपल्या शेजारील देशाच्या संसदेवर हल्ला केला अशा देशाची संयुक्त राष्ट्रासारख्या शक्तिशाली मंचावर उपदेश देण्याची लायकी नाही, असं एस.जयशंकर म्हणाले.

जयशंकर मंगळवारी युनायटेड नेशन्समध्ये पोहोचले. जिथं सिक्युरिटी काऊन्सिलमध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली काऊंटर टेरिरिझम आणि रिफॉर्म्ड मल्टीलेटरिज्मवर दोन मोठे कार्यक्रम होत आहेत. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी सदस्य रुचिरा कंबोज यांच्या अध्यक्षतेखाली मल्टीलेटरिज्मवर चर्चा झाली. दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला.

जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांवर निशाणा साधला. ते म्हणाले, "साहजिकच आज आपण बहुपक्षीयतेतील सुधारणांवर लक्ष केंद्रित करत आहोत. ही एक चांगलीच गोष्ट आहे. दहशतवादाविरुद्ध जागतिक संघर्ष सुरू असताना अशा काळात काही लोक गुन्हेगारांना, दहशतवादी हल्ल्यांचा कट रचणाऱ्यांना मदत देत आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा गैरवापर करत आहेत"

ते म्हणाले, "जग आणीबाणी, युद्धे आणि हिंसाचारातून जात आहे, संघर्ष करत आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि मार्ग दाखवण्यासाठी महात्मा गांधींच्या आदर्शांची अजूनही गरज आहे. साथीचे रोग, हवामान बदल, दहशतवादाचा प्रभावीपणे सामना यावरच संयुक्त राष्ट्रांची पत अवलंबून आहे. दहशतवादासारख्या आव्हानांना प्रभावीपणे प्रतिसाद देणे." यूएन कार्यालयात गांधी पुतळ्याच्या अनावरणानंतर एस जयशंकर बोलत होते.

भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, "आज आपण दहशतवादाविरोधात मार्ग शोधत आहोत, मग अशा धोक्यांना हलक्यात घेऊ नये. ज्या गोष्टीचा संपूर्ण जग स्वीकार करत नाही मग अशा गोष्टींचं समर्थन करण्याचा प्रयत्न का केला जात आहे असा प्रश्न कुणी उपस्थित करत नाही. सीमेपलीकडील दहशतवादाला जे दहशतवादाला प्रोत्साहन देतात त्यांच्यासाठीही हे लागू आहे"

ते म्हणाले, "आपण ७५ वर्षांपेक्षाही आधी निर्माण केलेल्या बहुपक्षीय संस्थांच्या परिणामकारकतेवर चर्चा करण्यासाठी जमलो आहोत. त्यांच्यामध्ये सुधारणा कशा करता येतील हा आपल्या समोरचा खरा प्रश्न आहे. अलिकडच्या वर्षांत आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बदलाची हाक दिली जात आहे. जेव्हा क्लायमेट जस्टीस आणि क्लायमेट अॅक्शनचा प्रश्न येतो तेव्हाही बऱ्याच गोष्टी चांगल्या नाहीत. महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी आपण लक्ष विचलित करणारे आणि गोंधळात टाकण्याचे प्रयत्न पाहिले आहेत"

भारताला सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य बनवण्याच्या मागणीदरम्यान बिलावल भुट्टो यांनी काश्मीरचा प्रश्न अजूनही सुटलेला नसल्याचं विधान केलं होतं. "जर तुम्हाला (भारत) बहुपक्षीयतेचे यश पाहायचे असेल, तर तुम्ही काश्मीर प्रश्नावर UNSC ठरावाच्या अंमलबजावणीला परवानगी द्या. बहुपक्षवाद यशस्वी होईल हे तुम्ही सिद्ध करू शकता. तुमच्या (भारताच्या) अध्यक्षतेखाली UNSC आमच्या प्रदेशात (काश्मीर) शांतता प्रस्थापित करू शकतो हे तुम्ही सिद्ध केलं पाहिजे", असं बिलावल भुट्टो म्हणाले.

या वर्षाच्या डिसेंबर अखेरीस भारत १५ सदस्यीय संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा (UNCS) निवडून आलेला सदस्य म्हणून दोन वर्षे पूर्ण करेल. याआधी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर मंगळवारी दहशतवाद विरोधी बैठकांच्या अध्यक्षतेसाठी संयुक्त राष्ट्रात पोहोचले. भारताने १ डिसेंबर रोजी सुरक्षा परिषदेचे मासिक फिरते अध्यक्षपद स्वीकारले. ऑगस्ट २०२१ नंतर, भारत UNCS सदस्य म्हणून दोन वर्षांच्या कार्यकाळात परिषदेचे अध्यक्षपद भूषविण्याची ही दुसरी वेळ आहे.