खायचे वांदे, तरीही पाकिस्तान सुधरेना; पंतप्रधान शरीफ यांनी पुन्हा 'काश्मीर राग' आळवला!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 01:43 PM2023-02-06T13:43:27+5:302023-02-06T13:53:48+5:30

स्वत:ला डिफॉल्टपासून वाचवण्यासाठी, पाकिस्तानने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (IMF) हात पसरले आहेत. पण अशातच पुन्हा एकदा पाकिस्ताननं काश्मीरचा उल्लेख केलाय

स्वत:ला डिफॉल्टपासून वाचवण्यासाठी, पाकिस्तानने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (IMF) हात पसरले आहेत. पण अशातच पुन्हा एकदा पाकिस्ताननं काश्मीरचा उल्लेख केलाय. बॅकचॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून काश्मीरचा मुद्दा थोडा बाजूला ठेवण्याबाबात योजना आखल्याची चर्चा पाकिस्तानात सुरू होती. शेहबाज शरीफ यांनी प्रथमच या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'काश्मीर एकता दिना'च्या निमित्ताने रविवारी पाकव्याप्त काश्मीरच्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला संबोधित करताना शरीफ म्हणाले, “यापूर्वी, काही लोकांनी मला स्पीकरच्या चेंबरमध्ये सांगितलं की काश्मीरमधील जनमत चाचणी पुढील 20 वर्षांसाठी पुढे ढकलण्यात यावी यासाठी एक षड्यंत्र रचले गेले होते. काश्मिरींवर यापेक्षा मोठे षडयंत्र आणि क्रूरता असू शकत नाही. मला वाटतं पाकिस्तानचा कोणताही नेता किंवा सैनिक असा विचारही करू शकत नाही,” असं ते म्हणाले.

पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, काश्मीरच्या विधानसभेच्या सभागृहात पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान पीओकेचे पंतप्रधान सरदार तन्वीर इलियास, विरोधी पक्षनेते चौधरी लतीफ अकबर, पीएमएल-एनचे अध्यक्ष शाह गुलाम कादिर, पीपीपी अध्यक्ष चौधरी यासीन, जेकेपीपी प्रमुख सरदार. हसन इब्राहिम आदी प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी नेत्यांनी काश्मीर प्रश्नावर अनेक सूचना केल्या.

सर्व पक्षांकडून काश्मिरी सरकारचे कौतुक करताना पंतप्रधान शरीफ म्हणाले की, सरकारने या प्रदेशात एकता, सहमती कायम ठेवली आहे. यामुळे भारत सरकार आणि इतर शत्रूंची चिंता वाढवणारा संदेश जाईल. हाच हेतू देशाच्या इतर भागातही अमलात आणला, तर कोणतीही समस्या दीर्घ काळापर्यंत राहणार नाही.

'5 ऑगस्ट 2019 रोजी नरेंद्र मोदींनी काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतला आणि संपूर्ण प्रदेश तुरुंगाच्या रुपात बदलण्यात आलं. पण हा छळ फार काळ चालणार नाही. काश्मिरींनी काश्मीरसाठी जे बलिदान धाडसानं दिलं आहे, त्याचे फळ नक्कीच मिळेल, असंही ते कलम 370 हटवल्याबाबत बोलताना म्हणाले.

जगातील वादग्रस्त प्रदेशांचा संदर्भ देत पंतप्रधान शरीफ म्हणाले की, जगातील प्रमुख देशांनी धर्माच्या आधारावर पूर्व तिमोर आणि दक्षिण सुदानला इंडोनेशिया आणि सुदानपासून वेगळे करण्यासाठी सार्वमत घडवून आणले होते. जागतिक शक्तींवर ताशेरे ओढताना पाकिस्तानी पंतप्रधान म्हणाले की, बोस्नियाच्या मुद्द्यावर 'सुसंस्कृत जगा'ने हजारो बोस्नियन मुस्लिमांना केवळ मारलंच नाही तर सामूहिक कबरीतही फेकलं.

पॅलेस्टाईनच्या मुस्लिमांवर ज्या प्रकारचे अत्याचार होत आहेत, तेच भारतातील काश्मिरींवरही होत आहे. कारण त्यांचा दोष फक्त मुस्लिम असणं हा आहे. काश्मीर ही पाकिस्तानची रक्तवाहिनी असल्यानं पाकिस्तानच्या सरकारांनी मनापासून काश्मिरींच्या हिताचा पुरस्कार केला आहे, असं शरीफ यांनी सांगितलं.

आपल्या भाषणादरम्यान शरीफ यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख केला. ते काश्मीरमधील सार्वमतासाठी आपली वचनबद्धता दाखवत असत, परंतु भारतीयांनी सर्व व्यासपीठांवर खोटे बोलून आणि टाळाटाळ करून संपूर्ण जगाचा विश्वासघात केला असल्याचेही ते म्हणाले. यादरम्यान शरीफ यांनी भारताला धमकी देत अण्वस्त्र असलेल्या पाकिस्तानवर वाईट नजर ठेवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असंही म्हटलं