चीननं चुना लावला? JF-17 बनवून पाकिस्तानला 'बनवलं'; ड्रॅगनमुळे हवाई दल चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 01:03 PM2021-08-13T13:03:39+5:302021-08-13T13:11:15+5:30

चायना मेड जेएफ-१७ विमानं ठरताहेत पाकिस्तानसाठी डोकेदुखी

पाकिस्तानी माध्यमांमध्ये जेएफ-१७ लढाऊ विमानांची चर्चा आहे. या विमानांमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आढळून येत आहेत. चीनकडून मिळालेली ही विमानं पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

चीननं तयार केलेल्या जेएफ-१७ विमानं पाकिस्तानच्या अडचणींमध्ये भर घालत आहेत. इंजिन समस्या, खराब सेवाक्षमता, त्यांच्या देखभालीसाठी येणारा खर्च यामुळे पाकिस्तानी हवाई दल वैतागलं आहे.

जेएफ-१७ विमानांच्या खरेदीसाठी पाकिस्ताननं १९९९ मध्ये चीनसोबत करार केला. पाकिस्तान आणि चीननं मिळून जेएफ-१७ ची निर्मिती केली. या विमानांची तुलना सुखोई-३० एमकेआय, मिग-२९ आणि मिराज-२००० सोबत केली जाते.

पाकिस्तानसोबत करार करताना चीननं जेएफ-१७ लढाऊ विमानाचे अनेक फायदे सांगितले होते. मात्र आता पाकिस्तानी हवाई दलाला या विमानाचे तोटेच अधिक जाणवत आहेत.

जेएफ-१७ च्या तांत्रिक समस्यांची माहिती पाकिस्ताननं चीनला दिली. विमानांमधील त्रुटींबद्दल चीनकडे तक्रार करण्यात आली. मात्र चीननं पाकिस्तानच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं.

चीननं जेएफ-१७ विमानांचं इंजिन बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र यातील आरडी-९३ इंजिन रशियन आहे. निर्बंधांमुळे चीनला रशियाकडून सुटे भाग आणि अन्य मदत मिळत नाहीत.

आता चीन जेएफ-१७चं इंजिन बदलण्यासाठी गुइझोऊ डब्ल्यूएस-१३ ताईशान इंजिन विकसित करत आहे. मात्र हे काम प्राथमिक टप्प्यात आहे. त्यामुळे याला बराच वेळ लागू शकतो.

पाकिस्तानकडून कायम चीनचे गोडवे गायले जातात. मात्र अनेकदा चीननं पाकिस्तानला खरे रंग दाखवले आहेत. तरीही पाकिस्तानतकडे चीनवर विसंबून राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. या सगळ्याचा फटका पाकिस्तानच्या लष्करी सामर्थ्यावर होत आहे.