किम जोंगच्या उत्तर कोरियाची एक खास गोष्ट जी जगात कुठेच नाही, अगदी अमेरिकाही फेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 03:30 PM2022-09-20T15:30:03+5:302022-09-20T15:34:19+5:30

जगात एक असा देश आहे की जिथं आजही हुकूमशाहीचं अस्तिस्व आहे. तो देश म्हणजे उत्तर कोरिया. हुकूमशाह किम जोंग याच्या क्रूरतेच्या अनेक बातम्या आजवर समोर आल्या आहेत. पण कोरियाच्या बाबतीत एक अशी वाखाणण्याजोगी गोष्ट आहे की ज्यामुळे जगात उत्तर कोरिया आघाडीवर आहे.

उत्तर कोरियात पसरलेली गरिबी आणि बेरोजगारीच्या बातम्याही आजवर तुम्ही वाचल्या असतील. पण या सर्वांमध्ये एक क्षेत्र असं आहे की ज्यामध्ये उत्तर कोरिया जगाच्या पातळीवर अव्वल क्रमांकावर आहे. ते क्षेत्र म्हणजे शिक्षण.

उत्तर कोरियामध्ये औपचारिक शिक्षण फार पूर्वीपासूनच सुरू झालं होतं. १८८२ मध्ये किंग कोजोंग यांनी उत्तर कोरियामध्ये शिक्षण हा देशाचा प्रमुख आधारस्तंभ मानला. यातून सर्व मुला-मुलींसाठी शिक्षणाची दारं खुली झाली. सध्या उत्तर कोरियाची शिक्षण व्यवस्था पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. देशातील सर्व नागरिकांना ११ वर्षे अभ्यास करावा लागतो.

उत्तर कोरियातील शिक्षण व्यवस्था समाजवादी आदर्शांवर आधारित आहे. मुलांना कोरियन भाषा, गणित, साहित्य शिकवलं जातं. उत्तर कोरियाची खास गोष्ट म्हणजे देशात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अगदी मोफत दिलं जातं.

बालवाडीपासूनच येथे शिक्षण सुरू होतं. इथं विद्यार्थ्यांना वर्षभर अभ्यास करावा लागतो. यानंतर, ते वयाच्या सहा ते नऊ वर्षांच्या प्राथमिक शाळेत जातात. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांचे माध्यमिक शाळेत शिक्षण होतं. जिथं विद्यार्थी 10 ते 16 वर्षे वयापर्यंत शिक्षण घेतात.

लक्षात घेण्याजोगा मुद्दा म्हणजे माध्यमिक शाळेत मुलांना त्यांच्यात कलागुणांनुसार अभ्यास करण्याची संधी दिली जाते. या सगळ्याचा परिणाम म्हणजे उत्तर कोरिया हा जगातील सर्वात साक्षर देश मानला जातो.

युनेस्कोच्या मते, उत्तर कोरियामध्ये साक्षरतेचे प्रमाण ९८ ते १०० टक्क्यांपर्यंत आहे. मात्र, हे आकडे उत्तर कोरियानेच दिले आहेत. त्यामुळे साक्षरतेच्या या आकडेवारीवर अनेकांना शंका आहे. याचं कारणही स्पष्ट आहे, उत्तर कोरियाच्या आतून कोणत्याही प्रकारची माहिती बाहेर येणं फार कठीण आहे.