कोरोनासारखाच औषधांवरील प्रयोग चीनसाठी ठरणार घातक?, रहस्यमयी आजाराबाबत खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 12:31 PM2023-11-24T12:31:08+5:302023-11-24T12:43:44+5:30

चीनच्या ईशान्य भागात असलेल्या लियाओनिंग प्रांतातील मुलांमध्ये रहस्यमयी आजाराची ही लक्षणे वेगाने पसरत आहेत.

फुफ्फुसात सूज येणं, श्वास घेण्यात अडचण, खोकला आणि खूप ताप... चीनच्या ईशान्य भागात असलेल्या लियाओनिंग प्रांतातील मुलांमध्ये या रहस्यमयी आजाराची ही लक्षणे वेगाने पसरत आहेत. रुग्णालयांमध्ये बेड मिळणं कठीण झालं आहे.

शाळेमध्ये कोणत्याही वर्गातील मुलांमध्ये ही लक्षणे दिसल्यास संपूर्ण क्लास रद्द करण्यात येत आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की काही काळ सर्व शाळा बंद ठेवण्याचाही विचार केला जात आहे.

चीनचा लियाओनिंग प्रांता हे सर्व घडत आहे, ते राजधानी बीजिंगपासून सुमारे 700 किलोमीटर अंतरावर आहे. राजधानी बीजिंगमध्येही काही प्रकरणे दिसून आली आहेत, परंतु लियाओनिंग या आजाराचा सर्वाधिक फटका बसला आहे.

चीनमधील लोक या रहस्यमय आजाराच्या भीतीने जगत आहेत. हा आजार न्यूमोनियासारखाच आहे असं म्हटलं जाते, परंतु त्याच्या प्रसाराचा वेग न्यूमोनियापेक्षा खूप जास्त आहे. हा आजार विशेषतः लहान मुलांना विळखा घातल आहे.

वेगाने पसरणाऱ्या या आजाराने साथीचे रूप धारण केले असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. कारण सध्या जी परिस्थिती चीनच्या लियाओनिंगमध्ये आहे, तशीच परिस्थिती डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या वुहान शहरात निर्माण झाली आणि कोरोना नावाच्या साथीचा जन्म झाला.

महामारीच्या भीतीने चीन तसेच संपूर्ण जगाला आणि जागतिक आरोग्य संघटनेलाही घाबरवले आहे. हा रहस्यमयी आजार समोर आल्यानंतर हाही कोरोनासारख्या औषधाच्या वापराचा परिणाम आहे की काय अशी शंका अधिक गडद होत आहे. कारण कोरोवर वुहानच्या प्रयोगशाळेत केलेल्या प्रयोगानंतर कोरोना पसरल्याचं म्हटलं जातं.

डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनासाठी चीनला जबाबदार धरलं होतं. चीनला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी त्यांनी दिली होती. आता प्रश्न उपस्थित केला जात आहेत की, सध्या चीनमध्ये पसरलेला 'रहस्यमयी न्यूमोनिया' चीनच्या प्रयोगशाळेतून बाहेर आला आहे का?

13 नोव्हेंबर 2023 या दिवशी पहिल्यांदाच लोकांना चीनमधील रहस्यमय़ी आजाराची माहिती मिळाली. या दिवशी चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने पत्रकार परिषद घेतली. लियाओनिंग आणि बीजिंगमध्ये श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, याबाबत स्पष्टपणे काहीही सांगण्यात आले नाही.

जगभरातील आजारांवर काम करणाऱ्या ProMed या संस्थेने 19 नोव्हेंबर रोजी या रहस्यमय आजाराचा खुलासा केला. ProMed जगभरातील संसर्गजन्य रोगांबद्दल अहवाल प्रकाशित करते. चीनच्या उत्तर-पूर्वेकडील शहर लियाओनिंगमध्ये हा आजार अत्यंत वेगाने पसरत असल्याचा दावाही या संघटनेने केला आहे.

22 नोव्हेंबर रोजी जागतिक आरोग्य संघटनेने रहस्यमय न्यूमोनियाबाबत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये WHO ने चीनला या आजाराबाबत सविस्तर माहिती देण्यास सांगितले. प्रयोगशाळेत तपासलेल्या नमुन्यांबाबतही सांगितले. मात्र अद्याप चीनकडून कोणतीही आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

चीनमधील लियाओनिंगमध्ये पसरलेल्या या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांना बीजिंगमध्ये दाखल केले जात असल्याच्या बातम्या आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये सातत्याने प्रसिद्ध होत आहेत. जवळपास 1200 मुलांना आपत्कालीन वॉर्डात दाखल करण्यात आले आहे.

अल जझीराचे रिपोर्टर कॅटरिना यू यांनी बीजिंगच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांची संख्या सातत्याने कमी होत आहे असं म्हटलं आहे. मुलांच्या पालकांना अत्यंत सावध राहण्याचा इशारा देत आहेत. आरोग्य विभागाचे अधिकारीही चिंतेत आहेत. थंडी जसजशी वाढत जाईल तसतशी संसर्गाची प्रकरणेही वाढू शकतात, असा इशारा त्यांनी दिला आहे.

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोग यामागे लॉकडाऊन उठवणं असल्याचं म्हणत आहे. दीर्घ लॉकडाऊनमुळे चिनी लोकांची प्रतिकारशक्ती कमी झाल्याचे चिनी तज्ञांचे मत आहे. त्यामुळे फुफ्फुसाशी संबंधित आजार झपाट्याने पसरत आहेत. 'मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया' हा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे पसरतो, ज्याचा लहान मुलांना फटका बसतो.