Russia - Ukraine War: युक्रेनच्या हाती लागली मॉन्स्टर रायफल; स्नायपर हेलिकॉप्टर, टँकही भेदू लागले, तेही ७ किमीवरून..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 05:28 PM2022-10-02T17:28:07+5:302022-10-02T17:34:23+5:30

Russia - Ukraine War: रायफल सोडा, नुसत्या गोळ्या पहाल तर हवेत उडाल... समोर टँक असुदे की हेलिकॉप्टर भेदलेच म्हणून समजा. ही रायफल आपल्या सैनिकांच्या हाती आली तर...

युक्रेनने सात महिन्यांनी अवघ्या जगाचे पुन्हा लक्ष वेधून घेतले आहे. रशियन सैन्याच्या तावडीत गेलेला भूप्रदेश पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. रशियन सैन्याची हालत एवढी बेकार करून ठेवलीय की रशियाच्या बुलेटप्रूफ गाड्या, रणगाडे, तोफा आणि विमाने देखील उद्ध्वस्त होऊ लागली आहेत. युक्रेनी स्नायपरनी हे थैमान घातले आहे.

एक गोळी सुटली की ती समोर असेल त्याचा वेधच घेऊन थांबत आहे. युक्रेनी स्नायपर हे थोड्या थोडक्या नव्हे तर सात किमीवरून करत आहेत. या रायफलचा आवाज होऊ नये म्हणून तिला सायलेन्सरही लावण्यात येत आहे. या बंदुकीचे नाव आहे स्निपेक्स एलिगेटर. ही एक अँटी मटेरिअल रायफल आहे. या बंदुकीतून कोणत्याही धातूच्या टार्गेटवर हल्ला केला जाऊ शकतो. ही रायफल खूपच शक्तीशाली आणि अत्याधुनिक आहे.

स्निपेक्स एलिगेटरचे उत्पादन २०२० मध्ये सुरु करण्यात आले होते. ही बंदूक युक्रेन, जर्मनी आणि नेदरलँडमध्ये बनविली जाते. XADO होल्डिंग लिमिटेड या कंपनीची ही रायफल आहे. या स्नायपर रायफलचे वजन 25 किलो आहे. एकूण लांबी 2000 मिलीमीटर म्हणजेच 6.56 फूट आहे. बॅरलची लांबी 1200 मिलीमीटर म्हणजेच 3.93 फूट आहे. ही रायफल अचूक लक्ष्य दोन किमीपर्यंत भेदू शकते. तर ही बंदूक ७ किमीपर्यंतचे लक्ष्य आरामात उडवू शकते.

या बंदुकीतून निघालेल्या गोळाचा वेग किती असेल? विचारही करणार नाही. या बंदूकीतून सुटलेली गोळी सेकंदाला एक किमीचे अंतर पार करते. एकदा का गोळी सुटली की दोन सेकंदांत समोर दोन किमीवर मग तो रणगाडा का असेना भेदून आरपार जाते. या बंदुकीची मॅगझिन ही काढता येते. म्हणजे पुन्हा गोळ्या भरून लोड करता येते. एका मॅगझीनमध्ये पाच गोळ्या असतात.

स्निपेक्स एलिगेटर रायफलच्या गोळ्यांचा व्यास हा 14.5 मिमी म्हणजेच अर्धा इंच असतो. गोळीची लांबी 4.48 इंच असते. जर ही गोळी कोणाला लागली तर तो पाणी देखील मारणार नाही, तर चिंधड्या उडवत आरपार जाते. ही गोळी जेव्हा टार्गेटवर आदळते तेव्हा १२ टन उर्जा निर्माण करते. म्हणजेच चिलखती वाहने देखील या गोळीसमोर फेल आहेत. युक्रेनने याच रायफलने रशियाची हेलिकॉप्टर, रणगाडे आणि सैनिकांना मारले आहे.

ही रायफल युक्रेनचे पुरुष सैनिकच नाहीत तर महिला स्नायपर देखील वापरत आहेत. युक्रेनच्या महिला स्नायपरचा इतिहास खूप मोठा आहे. याच महिला सैनिकांनी या रायफलने युक्रेनचे शहर मारियुपोलला रशियाच्या हवाई हल्ल्यांपासून वाचविले होते.

रशियाच्या सैन्याची इथे हालत खूप खराब करून टाकली होती. या बंदुकीतून सुटणाऱ्या गोळ्या सात किमीवर जाऊन पडत असल्या तरी या बंदुकीचे रेकॉर्ड अद्याप साडेतीन किमीवरील लक्ष्याला भेदल्याचे आहे. समोर टँक असुदे की हेलिकॉप्टर भेदलेच म्हणून समजा. ही रायफल आपल्या सैनिकांच्या हाती आली तर...