'आयसिसमध्ये अनेक भारतीयांचाही समावेश', ISIS कमांडरचा दावा; प्लानही सांगितला...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 03:03 PM2021-08-29T15:03:19+5:302021-08-29T15:10:01+5:30

अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर आयसिस ही दहशतवादी संघटना देखील आता सक्रीय झाली आहे. यातच एक मोठा गौप्यस्फोट आयसिसनं केला आहे.

अफगाणिस्तानची राजधानी काबुल विमानतळावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात १६९ जणांचा मृत्यू झाला. यात अफगाणी नागरिकांसह १५ अमेरिकेच्या सैनिकांचाही समावेश होता. या हल्ल्याची जबाबदारी आयसिस या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे.

आयसिसनं केलेल्या या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात अमेरिकेनंही तातडीनं कारवाई करत काबुल विमानतळावरील हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या ठिकाणांवर ड्रोन हल्ला केला. यात आयसिसचे अनेक दहशतवाद मारले गेल्याचा दावा अमेरिकेनं केला आहे.

अमेरिकेतील सीएनएन वृत्तसंस्थेनं आयसिस-के या दहशतवादी संघटनेच्या कमांडरची मुलाखत घेतली होती. यात भारताबाबत एक धक्कादायक बाब दहशतवादी कमांडरनं उघड केली आहे.

आयसिस या दहशतवादी संघटनेत पाकिस्तानसोबतच अनेक भारतीयांचा देखील समावेश आहे, असा दावा आयसिसच्या कमांडरनं केला आहे.

आयसिसच्या कमांडरनं एका हॉटेलमध्ये सीएनएनला मुलाखत दिली. यात काबुलमध्ये आयसिसला कोणताच धोका किंवा कसलीच तपासणी केली जात नाही असा दावा केला. नाव आणि ओळख उघड न करण्याच्या अटीवर या कमांडरनं सीएनएनला मुलाखत दिली आहे. या कमांडरच्या नेतृत्त्वाखाली एकूण ६०० दहशतवादी काम करत असल्याचं त्यानं म्हटलं आहे. यात अनेक पाकिस्तानी, भारतीय आणि सेंट्रल एजंट्सचा समावेश आहे.

यात काही ठिकाणी आम्ही तालिबानसोबतही संघर्ष करत असल्याचं त्यानं म्हटलं आहे. तालिबानसोबत कोणतीच हातमिळवणी वगैरे केलेली नाही आणि त्यांच्यासोबत काम करण्यास आम्ही इच्छुक नाही, असंही आयसिसच्या कमांडरनं म्हटलं आहे.

इस्लामिक शरिया कायदा लागू करणं हाच आमचा मुख्य उद्देश आहे. यासोबतच तालिबानवर अनेक परदेशी ताकदींचा प्रभाव आहे असंही कमांडरनं सांगितलं. "शरिया कायदा लागू करण्यासाठी जे आमच्यासोबत आहेत ते आमचे भाऊच आहे. तर जे विरोधात आहेत त्यांच्याविरोधात युद्धाची घोषणा याआधीच आम्ही केलेली आहे", असंही तो कमांडर म्हणाला.

अमेरिकेच्या स्पेशल फोर्ससोबत कधी युद्ध झालंय का? याबाबत विचारण्यात आलं असताना या दहशतवाद्यांना त्याबाबत पुष्टी केली. ''होय आम्ही अनेकदा अमेरिकेच्या स्पेशल फोर्सचा सामना केला आहे. त्यांनी आमच्यावर अनेकदा एअरस्ट्राइकही केलाय", असं आयसिसच्या कमांडरनं सांगितलं.

तालिबानच्या सत्तेमुळे आयसिसच्या वाढीला प्रोत्साहन मिळेल असंही त्यानं म्हटलं आहे. पहिल्यापेक्षा आता वेगानं विस्तार करायला मदत होईल आणि पुढील ऑपरेशन्स आम्हाला सुरू करता येतील, असंही आयसिसचा कमांडर म्हणाला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील हल्ल्यांबाबत विचारण्यात आलं असता कमांडरनं त्यास स्पष्ट नकार दिला आमचं अधिकार क्षेत्र फक्त अफगाणिस्तान पुरतं मर्यादित आहे. त्यामुळे मी तुम्हाला फक्त अफगाणिस्तान संदर्भातील माहिती देऊ शकतो, असं आयसिसच्या कमांडरनं सांगितलं.