युद्धकाळात पाकिस्तानचा 'डबल' गेम; यूक्रेनकडून कमावले कोट्यवधी, जाणून घ्या कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 08:11 PM2023-11-14T20:11:31+5:302023-11-14T20:21:35+5:30

रशियासोबत युद्ध करणाऱ्या युक्रेनला शस्त्रास्त्रे विकल्याचा आरोप पाकिस्तानवर सातत्याने करण्यात आला आहे, मात्र या देशाने नेहमीच याचा इन्कार केला आहे. परंतु पाकिस्तानने युक्रेनला दारूगोळा पुरवून ३६४ मिलियन अमेरिकन डॉलर्स कमावल्याचा रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे.

रशियाने पाकिस्तानच्या लोकांना गहू आणि स्वस्त कच्चे तेल दिले. पण बदल्यात पाकिस्तानने रशियाच्या शत्रूशी मैत्री करायला सुरुवात केली. पाकिस्तानने गेल्या वर्षी दोन खासगी अमेरिकन कंपन्यांसोबत ३६४ मिलियन डॉलर्सचा शस्त्रास्त्र विक्री करार केला होता

ही शस्त्रे रशियाविरुद्ध युद्ध लढण्यासाठी युक्रेनला पाठवण्यात आल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी २४ फेब्रुवारीला रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले होते. या कंपन्यांसोबत शस्त्रास्त्रे विकण्याचा करार केला होता. या पुरवठ्यासाठी त्यांनी ब्रिटिश लष्करी मालवाहू विमानांचा वापर केला.

रिपोर्टनुसार, ब्रिटिश मालवाहू विमाने पाकिस्तानातील रावळपिंडी येथील नूर खान येथून सायप्रसमधील अक्रोटिरी येथील ब्रिटिश लष्करी तळापर्यंत उड्डाण करत होते. त्यानंतर युक्रेनला शस्त्रे पुरवण्यासाठी लष्करी विमाने तेथून एकूण पाच वेळा रोमानियाला पोहोचले. मात्र, इस्लामाबादने याचा इन्कार केला आहे.

पाकिस्तानचा हा डबल गेम जगासमोर आल्यानंतर तो स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करतोय. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने युक्रेनला शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा विकल्याचा इन्कार केला आहे. पाकिस्तान दोन्ही देशांदरम्यान 'कठोर तटस्थ' धोरण पाळतंय असं म्हटलं आहे.

यापूर्वीही अशा अनेक संघटना आहेत ज्या पाकिस्तान युक्रेनला शस्त्रे विकत असल्याचा दावा करत आहेत. मात्र, अद्याप कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. आता हा रिपोर्ट समोर आला आहे. ज्या वेळी शस्त्रे देण्याची चर्चा होती, त्यावेळी पीडीएम पक्ष सत्तेत होता, ज्यांनी इम्रानला हटवले होते असं पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी या बातमीत नमूद केले आहे.

पाकिस्तानचे अंतरिम पंतप्रधान म्हणतात की, जर युक्रेनमध्ये पाकिस्तानी शस्त्रे सापडली तर ती काळ्या बाजारातूनच पोहोचली असती. मात्र, या खुलाशामुळे पाकिस्तानचा तटस्थ असल्याचा दावा उघड झाला आहे.

रिपोर्टनुसार, ग्लोबल मिलिटरी आणि नॉर्थरोप ग्रुमन या दोन अमेरिकन खासगी कंपन्यांनी पाकिस्तानसोबत १५५ मिमी तोफगोळे खरेदी करण्याचा करार केला आहे. ग्लोबल मिलिटरीने २३.२ कोटी डॉलर करार केला होता आणि १३.१ कोटी डॉलर करार दुसर्‍या कंपनीने केला होता. हा करार गेल्या महिन्यात रद्द करण्यात आला होता.

यूएस फेडरल प्रोक्योरमेंट डेटा सिस्टीमच्या कराराच्या तपशीलाचा हवाला देत अहवालात ही शस्त्रे पाकिस्तानकडून खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही शस्त्रे नूर खान हवाई तळावरून ब्रिटिश लष्करी मालवाहू विमानातून पोहोचवण्यात आली होती, असेही अहवालात म्हटले आहे.

हे विमान पाच वेळा रावळपिंडीत उतरले होते. माजी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा जेव्हा यूकेमध्ये रॉयल मिलिटरीच्या पासिंग आऊट परेडला संबोधित करत होते तेव्हा असे पहिले विमान रावळपिंडीत उतरले. यावेळी त्यांनी पाकिस्तान-ब्रिटन संबंध अधिक उंचीवर नेण्याची शपथ घेत होते.