ब्रिटिश राजघराण्यात मोठा वाद, प्रिंस हॅरीने मोठा भाऊ विल्यम्सवर केले गंभीर आरोप, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 05:38 PM2022-12-16T17:38:14+5:302022-12-16T17:41:26+5:30

British Royal Family : प्रेमासाठी ब्रिटनचं शाही राजघराणं सोडणार प्रिंस हॅरी आणि त्याची पत्नी मेघन पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्याला कारण ठरलाय त्यांच्यावर आधारित डॉक्युमेंट्रीचा नवा भाग. या भागात प्रिंस हॅरीने ब्रिटिश रॉयल्सवर गंभीर आरोप केले आहेत.

प्रेमासाठी ब्रिटनचं शाही राजघराणं सोडणार प्रिंस हॅरी आणि त्याची पत्नी मेघन पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्याला कारण ठरलाय त्यांच्यावर आधारित डॉक्युमेंट्रीचा नवा भाग. या भागात प्रिंस हॅरीने ब्रिटिश रॉयल्सवर गंभीर आरोप केले आहेत.

शाही जीवन सोडण्याच्या माझ्या विचारावर मोठा भाऊ विल्यम याने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. असे प्रिन्स हॅरीने म्हटले आहे. एकेकाळी आई प्रिन्सेस डायना हिच्या अंत्यसंस्कारावेळी सोबत चालणाऱ्या दोघा भावांचा फोटो लोकांच्या मनात कोरला गेला आहे. मात्र आता दोन्ही भाऊ एकमेकांशी बोलतही नाहीत. त्याला कारण ठरलाय तो हॅरी आणि मेघन यांचा कॅलिफोर्नियामध्ये राहण्याचा निर्णय.

हॅरी अँड मेगनच्या शेवटच्या भागात हॅरीने परदेशात जाण्याच्या विचारावर २०२० मध्ये झालेल्या एका कौटुंबिक चर्चेची आठवण काढली आहे. त्यात तो आरोप करतो की, त्याचा मोठा भाऊ प्रिन्स विल्यम अत्यंत वाईटपणे ओरडू लागला. वडील असे काही बोलू लागलेत की जे खरे नव्हते. तर आजी गप्प राहून सारं काही ऐकत होती.

हॅरी म्हणाला की, माझे वडील आणि भावाने परिस्थितीचा चुकीचा अर्थ लावला. मात्र मी आणि मेगन आपल्या निर्णयावर पुढे गेलो. हॅरी आणि मेगन यांनी मार्च २०२० मध्ये त्यांच्या शाही जबाबदाऱ्यांपासून मुक्तता स्वीकारली होती.

तसेच हॅरीने विल्यमच्या सहकाऱ्यांवर मीडियामध्ये आपल्या आणि आपल्या पत्नीबाबत नकारात्मक न्यूज प्लँट केल्याचा आरोपही केला आहे. मेगनच्या गर्भपाताचं कारण हे प्रसारमाध्यमांमध्ये छापून येणाऱ्या बातम्या होत्या.

दरम्यान, बर्किंघम पॅलेस आणि विल्यमचे कार्यालय केंसिंग्टन पॅलेसने डॉक्युमेंट्रीवर कुठल्याही प्रकारची टिप्पणी करण्यास नकार दिला आहे.