संपूर्ण जगाला हादरवून सोडणारे आतापर्यंतचे 5 मोठे शूटआउट; नेहमीच मुलांना केले लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 06:06 PM2022-10-06T18:06:13+5:302022-10-06T18:18:39+5:30

Thailand Mass Shooting : थायलंडमधील गोळीबारानंतर संपूर्ण जग हादरले.

थायलंडमध्ये चाइल्ड डे केअरमध्ये गोळ्या झाडणाऱ्या हल्लेखोराने जवळपास 35 लोकांना ठार मारले. या हल्ल्यानंतर संपूर्ण जग हादरले. हल्लेखोराने गोळीबारानंतर पत्नी आणि मुलाचीही हत्या केली आणि स्वत:ही आत्महत्या केली. मात्र, अशा गोळीबाराची ही भीषण घटना काही पहिली नाही. आज आम्ही तुम्हाला जगातील अशाच 5 घटनांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी संपूर्ण जग हादरले.

सप्टेंबर 2004 मध्ये उत्तर ओसेशियाच्या बेसलान शहरातील एका शाळेला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जग हादरले होते. दहशतवाद्यांनी तीन दिवस शाळेला वेढा घातला होता. या दहशतवादी हल्ल्यात 330 हून जणांना मारले गेले, ज्यात बहुतेक मुले होती. रशियाचे लोक दुखावले जावेत म्हणून दहशतवाद्यांनी जाणूनबुजून मुलांना लक्ष्य केले आणि तेथे भीतीचे वातावरण निर्माण झाले.

3 एप्रिल 2015 रोजी अल-कायदा संबंधित इस्लामिक दहशतवादी समूह अल-शबाबने केनियाच्या गारिसा कॉलेजवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी कॉलेजवर गोळ्या झाडून हल्ला केला. या हल्ल्यात 147 जणांचा मृत्यू झाला, तर 79 जण जखमी झाले. यामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यानंतर तपासात असे दिसून आले की दहशतवादी ख्रिश्चनांना लक्ष्य करत होते आणि मुस्लिमांना तेथून जाऊ देत होते.

16 डिसेंबर 2014 रोजी पाकिस्तानातील पेशावरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. दहशतवादी ग्रेनेड आणि अत्याधुनिक रायफल घेऊन स्कूलमध्ये घुसले होते. या दहशतवादी हल्ल्यात एकूण 150 जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये 134 विद्यार्थी होते.

6 जुलै 2013 रोजी काही दहशतवाद्यांनी नायजेरियातील योबे राज्याच्या मामुडो गावात एका सरकारी शाळेवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात 42 जणांचा मृत्यू झाला, त्यात बहुतांश विद्यार्थी होते.

24 मे 2022 रोजी अमेरिकेतील टेक्सासमधील एका शाळेत गोळीबार झाला होता. या गोळीबारात 19 मुले आणि इतर 3 जणांचा मृत्यू झाला. बंदूकधारी एक बंदूक आणि रायफल घेऊन उवालदे येथील राब एलिमेंट्री स्कूलमध्ये घुसला होता.