वजन कमी करण्यासाठी मदत करते मेथी; असा करा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 01:11 PM2019-04-01T13:11:58+5:302019-04-01T13:16:22+5:30

साधारणतः आपल्यापैकी प्रत्येकाच्याच घरात मेथीचा वापर करण्यात येतोच. फक्त पाल्याभाज्यांमध्ये समावेश होणाऱ्या मेथीच्या पालेभाजीचाच नाही तर मेथीच्या दाण्यांचाही अनेक पदार्थांमध्ये समावेश करण्यात येतो. मेथीच्या भाजीचे आणि मेथीच्या दाण्यांचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. मेथीच्या दाण्यांचा कढी आणि सांबार यांसारख्या पदार्थांमध्ये फोडणी देण्यासाठी वापर करतात. मेथी फक्त पदार्थांची चव वाढविण्यासाठी नाही तर ब्लड शुगर आणि बीपी यांसारख्या आजारांवरही परिणामकारक ठरते. परंतु तुम्हाला माहीत आहे का? मेथी वजन कमी करण्यासाठीही गुणकारी ठरते.

जर तुम्ही वाढणाऱ्या वजनामुळे त्रस्त असाल आणि ते कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर मेथी तुमची मदत करेल. फक्त तुम्हाला मेथीचा योग्य वापर करता आला पाहिजे. वजन कमी करण्यासाठी मेथीचा कसा वापर करावा त्याबाबत जाणून घेऊया...

वजन कमी करण्यासाठी तुम्ही मेथीचे दाणे एका पॅनमध्ये व्यवस्थित भाजून घ्यावे. त्यानंतर ते वाटून त्याची पावडर तयार करावी. दररोज सकाळी एक चमचा पावडर कोमट पाण्यासोबत घ्यावी.

मेथीच्या दाण्यांच पाणीही वजन कमी करण्यासाठी मदत करतं. रात्री दोन चमचे मेथी एक ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवावी. सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावं. दररोज असं केल्याने वजन कमी करण्यासाठी मदत होते. दरम्यान मेथीचं पाणी प्यायल्याने पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे तुम्ही ओव्हरइटिंगपासून दूर रहाता.

मेथीचे दाणे तुम्ही स्प्राउट्स म्हणूनही खाऊ शकता. परंतु लक्षात ठेवा की, दाण्यांना पूर्णपणे मोड आलेले असावेत. मेथी स्प्राउट्समध्ये मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, सी, ई, बी याव्यतिरिक्त कॅल्शिअम, झिंक आणि कॅरोटिन असतं. सकाळी रिकाम्यापोटी मोड आलेले मेथीचे दाणे खाल्याने अनेक तासांपर्यंत पोट भरल्याप्रमाणे वाटते.

मेथीचा चहा वजन कमी करण्यासाठी मदत करतो. आतापर्यंत तुम्ही मिल्क टी किंवा ग्रीन टी ट्राय केला असेल. परंतु आता वेट लॉस करण्यासाठी मेथीचा चहा ट्राय करा. हा वजन कमी करण्यासाठी मदत करण्यासोबतच डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत करतं. तसेच पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी हा चहा मदत करतो.