Coronavirus: कोरोना व्हायरसबाबत हैराण करणारा रिपोर्ट; केवळ २ दिवसांत दिसतात ‘ही’ ५ लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 07:05 PM2022-02-07T19:05:21+5:302022-02-07T19:10:39+5:30

देशात कोरोना(Coronavirus) रुग्णसंख्येत आता हळूहळू घट होताना पाहायला मिळत आहे. कोरोना महामारीमुळं मागील अडीच वर्षापासून लोकांच्या मनात दहशत निर्माण केली आहे. आतापर्यंत कोरोना व्हायरसचे विविध व्हेरिएंट समोर आले आहेत.

कोरोनाच्या दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंटमुळं यातील लक्षणांमध्येही काही बदल पाहायला मिळत आहेत. कोविड लक्षणांवर अलीकडेच झालेल्या रिसर्चमध्ये हैराण करणारा खुलासा उघड झाला आहे. नेमकं काय आहे या रिपोर्टमध्ये जाणून घेऊया.

या रिपोर्टनुसार, दावा करण्यात आला आहे की, कोरोना व्हायरसची लक्षणं आता १० अथवा १४ दिवस नव्हे तर २ दिवसांतही आढळून यायला लागले आहेत. हा रिसर्च इम्पिरियल कॉलेज, लंडनच्या DHSC आणि रॉयल फ्री एनएचएस फाऊंडेशन ट्रस्टनं संयुक्तरित्या बनवला आहे.

या स्टडी रिपोर्टमध्ये निरोगी लोकांना कोरोना व्हायरसनं संक्रमित केले गेले. त्या सर्वांना देखरेखीखाली ठेवण्यात आले. जेणेकरुन संक्रमित झाल्यानंतर व्हायरसच्या शरीरातील संसर्ग आणि त्याच्या लक्षणांबाबत बारकाईनं अभ्यास करता येईल.

ही स्टडी आतापर्यंतच्या सर्व स्टडीपेक्षा वेगळी आहे. कोरोना संक्रमणाची सुरुवात गळ्यापासूनच होते. ५ दिवसांत संसर्ग पीकवर पोहचतो असं स्टडीत आढळलं आहे. या स्टडीनंतर संशोधकांनी कोरोनापासून वाचण्यासाठी नाक, तोंड मेडिकल मास्कनं झाकून ठेवणं गरजेचे असल्याचं सांगितले.

या स्टडीत ३६ लोकांचा समावेश करण्यात आला होता. त्या लोकांनी कोरोनाची लस घेतली नव्हती. आणि हे कधीही संक्रमित झाले नव्हते. सर्वांचे वय १८ ते ३० या वयोगटातील आहे. ३६ स्वयंसेवकांपैकी केवळ १८ जणांना कोरोनाची लागण झाली.

तर १६ लोकांमध्ये कोरोनाचे सौम्य आणि गंभीर लक्षणं जाणवली. जे संक्रमित झाले त्यांच्या नाकातून पाणी येणे, थंडी वाजणे, सर्दी, घसा खवखवणे, वास न येणे यांच्यासह मध्यम स्वरुपाची लक्षणं आढळली. कुठल्याही रुग्णांमध्ये गंभीर स्वरुपाची लक्षण दिसून आली नसल्याचं सांगितले.

१३ लोकांमधील वास घेण्याची क्षमता संपली. जे ९० दिवसांनंतर पुन्हा आली. स्टडीत सहभागी झालेल्या सर्व स्वयंसेवकांवर १२ महिने देखरेख ठेवण्यात आली होती. भारतात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यापासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली होती. ती अलीकडे कमी होताना दिसून येते.

गेल्या २४ तासांत देशभरात ८३ हजार ८७६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ८९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात १ लाख ९९ हजार ५४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनाचा सकारात्मक दर आता ७.२५ टक्क्यांवर आला आहे.

राज्यात रविवारी ९,६६६ नवीन रुग्णांचे निदान आणि ६६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे, तर दिवसभरात २५,१७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ७५,३८,६११ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात १,१८,०७६ रुग्ण उपचाराधीन आहेत.