Traffic Challan: ट्रॅफिक पोलिसांनी कधी तुमची कार, स्कूटर थांबविली; तर या चार गोष्टी जरूर करा...कमालीच्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 03:24 PM2023-01-05T15:24:46+5:302023-01-05T17:49:09+5:30

. जर कोणी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत असेल तर वाहतूक पोलीस त्याला चलन देतात. तसेच एक चूक सापडली की दुसऱ्या चुकाही सापडतात.

कार, बाईक, स्कुटरवरून जात असताना वाहतूक पोलीस नेहमी हात दाखवून थांबवतात. कागदपत्रे मागतात, आता एक सोय बरी झालीय की मोबाईलवर सारे काही दाखविता येते. नाहीतर आधी दंडाची पावती ठरलेली असायचीच.

जर कोणी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत असेल तर वाहतूक पोलीस त्याला चलन देतात. तसेच एक चूक सापडली की दुसऱ्या चुकाही सापडतात. यामुळे वाहतूक पोलिसांनी कधी हात दाखविला तर आधी चार गोष्टी करा, जेणेकरून दंड आणि पावत्यांपासून वाचू शकाल.

बिझनेस, सेल्समध्ये जसे टार्गेट असते तसे वाहतूक पोलिसांना देखील दंड गोळा करण्याचे टार्गेट असू शकते. यामुळे वाहतुकीचा नियम मोडताना दिसला की त्याला दंडाच्या पावत्या फाडतात. तुम्ही पुन्हा नियम मोडू नये म्हणून हा दंड असतो. अनेकदा तुमची दंडाशिवाय देखील तंबीवर सुटका होते. हे त्या वाहतूक पोलिसाच्या मनावर अवलंबून नसते तर तुमच्या वागण्यावर अवलंबून असते.

यामुळे वाहतूक पोलिसांसोबत एक चांगला नागरिक म्हणून वागा. आम्ही अशा चार गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत, ज्या तुम्हाला वाहतूक पोलिसांनी थांबविल्यानंतर कराव्या लागतील.

वाहतूक पोलिसांनी तुम्हाला थांबण्याचा इशारा केला तर तुम्ही थांबा, तिथून पळून जाऊ नका. जर तुम्हाला तुमच्या कारमध्ये किंवा बाईकवर बसून रहायचे असेल तर बसा, परंतू गाडी बंद करा. यानंतर तुम्ही पोलिसासोबत बोला.

पोलीस देखील माणूसच आहेत. उन, पाऊस, थंडी, रात्र अशा वातावरणात ते काम करत असतात. हे काम करणे सोपे नसते. त्यांमुळे ते देखील तणावात, वैतागलेले असू शकतात. यामुळे त्यांच्याशी सन्मानाने आणि विनम्रतेने वागा. असे केल्यास जर तुम्ही कोणत्याही गंभीर नियमांचे जरी उल्लंघन केलेले असेल तरी ते तुम्हाला तंबी देऊन सोडू शकतात.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले असेल तर तुम्ही तावातावाने बोलून नका. पोलीस अधिकाऱ्याला काय घडले हे नीट सांगा, जर गरज असेल तर गैरसमजाविषयी माफी मागा.

नियम असेल तर तो पाळावा लागतो, नियम सर्वांसाठी असतात. या दृष्टिकोनातून पोलिसांचे म्हणणे समजून घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर तुमचा मुद्दा त्यांना आरामात समजावून सांगा. न जाणो तुमच्या चांगल्या वागण्याने तुम्हाला मिळणारे जाणारे चलन दिले जाणारच नाही.