कुंभ संक्रांती: ३ राशींवर सूर्यकृपा, नव्या नोकरीची ऑफर शक्य; ५ राशींना संमिश्र, काय करु नये?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 01:55 PM2024-02-13T13:55:07+5:302024-02-13T14:04:23+5:30

सूर्याचा शनीच्या राशीतील प्रवेश कोणत्या राशींना शुभ ठरू शकेल? कोणत्या राशींनी काय काळजी घ्यावी? जाणून घेऊया...

ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य एका राशीत सुमारे महिनाभर विराजमान असतो. शनीच्या मकर राशीत विराजमान असलेला सूर्य आता शनीचेच स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत प्रवेश करत आहे. १४ मार्चपर्यंत सूर्य कुंभ राशीत असेल. त्यानंतर तो मीन राशीत जाईल.

सूर्याच्या या राशीसंक्रमणाला संक्रांती असे म्हटले जाते. त्यामुळे पुढील १४ मार्चपर्यंतचा काळ हा कुंभ संक्रांती म्हणून ओळखला जाईल. विशेष म्हणजे आताच्या घडीला कुंभ राशीत शनी विराजमान आहे. यामुळे आगामी महिनाभर कुंभ राशीत सूर्य आणि शनीचा युती योग जुळून येत आहे.

काही मान्यतांनुसार, सूर्य आणि शनी हे पिता-पुत्र असले, तरी एकमेकांचे शत्रू ग्रह मानले गेले आहेत. असे असले तरी काही राशींना सूर्याच्या कुंभ गोचराचा काळ अतिशय शुभ ठरू शकेल. असे सांगितले जात आहे. सूर्याच्या कुंभ राशीतील प्रवेशामुळे शनी अस्तंगत झाला आहे.

सूर्याच्या राशी बदलामुळे अनेक राशींच्या लोकांवर प्रभाव नक्कीच दिसून येईल. काही लोकांना नोकरी आणि व्यवसायावर परिणाम दिसू शकतो. काही लोकांचा आत्मविश्वास वाढेल ज्यामुळे अपूर्ण कामे पूर्ण होतील. सरकारी कामात यश मिळू शकते आणि आर्थिक लाभाचीही शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

काहींच्या मते, सूर्य आणि शनीचा युती योग चांगला मानला जात नाही. अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. नोकरी-व्यवसायात अडथळे येऊ शकतात. आर्थिक आणि आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, असे म्हटले जात आहे.

कुंभ राशीत सूर्याचा प्रवेश आणि शनीसोबतचा युती योग याचा कर्क, वृश्चिक, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या व्यक्तींवर संमिश्र प्रभाव पडू शकतो. काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाशी संबंधित काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी वाद आणि तणाव वाढू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना काही नुकसान होऊ शकते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनेक वेळा विचार करावा लागेल. अनावश्यक खर्च वाढू शकतो. कोणालाही उधारी, उसने पैसे वा कर्ज देणे टाळणे हिताचे ठरू शकेल.

कुंभ राशीत सूर्याचा प्रवेश आणि शनीसोबतचा युती योग हा मिथुन, तूळ आणि सिंह राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकतो. काही फायदा होऊ शकतो. कामात चांगले परिणाम दिसून येऊ शकतील. नोकरदारांना नवीन नोकरीसाठी चांगल्या ऑफर मिळू शकतात. काही जुने वाद मिटल्यामुळे दिलासा मिळू शकतो.

सूर्याचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी तसेच कुंडलीतील स्थिती मजबूत करण्यासाठी काही उपाय सांगितले जातात. सूर्याच्या मंत्राचे जप किंवा नामस्मरण करणे उपयुक्त मानले जाते. अर्घ्य अर्पण करण्यासह आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. पठण करणे शक्य नसेल, तर या स्तोत्राचे श्रवण करावे, असे सांगितले जाते.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.