४ बड्या ग्रहांचा राशीबदल: ‘या’ ४ राशींवर शुभ प्रभाव; ८ राशींवर कसा होईल परिणाम? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 09:46 AM2022-12-19T09:46:53+5:302022-12-19T10:02:01+5:30

२०२३ मध्ये शनी, गुरु, राहु आणि केतु हे ग्रह राशीपरिवर्तन करणार असून, तुमच्या राशीवर याचा कसा प्रभाव असेल, ते जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केल्यास २०२२ हे वर्ष अनेकार्थाने महत्त्वाचे ठरले. सन २०२३ मध्येही ४ मोठे ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. याचा प्रभाव केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर पाहायला मिळू शकतो, असे सांगितले जात आहे.

सन २०२३ मध्ये नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. यामुळे साडेसाती चक्रात बदल होईल. धनु राशीची साडेसाती संपुष्टात येईल, तर मीन राशीची साडेसाती सुरू होईल. तसेच मकर राशीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल, तर कुंभ राशीच्या साडेसातीचा मधला म्हणजेच दुसरा टप्पा सुरू होणार आहे.

तर गुरु ग्रह आपले स्वामित्व असलेल्या मीन राशीतून मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत प्रवेश करेल. सन २०२३ च्या अंतिम टप्प्यात छाया, मायावी ग्रह मानले गेलेले राहु आणि केतु अनुक्रमे मेष आणि तूळ राशीतून मीन आणि कन्या राशीत प्रवेश करतील. या ४ ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा कोणत्या राशीच्या व्यक्तींवर कसा प्रभाव असू शकेल? ते जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींवर राहु आणि शनीचे राशीपरिवर्तन संमिश्र ठरू शकेल. कामात अडचणी येऊ शकतात. अनेक कामे प्रभावित होत राहतील. कालांतराने पूर्ण होतील. संयम आणि धैर्याने काम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. घरगुती समस्या सोडवण्यातही अडचणी येऊ शकतील. एप्रिल ते मे दरम्यान चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात. या काळात तुमचे खर्चही जास्त राहतील. ऑक्टोबरमध्ये राहुने मीन राशीत प्रवेश केल्यावर स्थिती सुधारेल. वर्षाची शेवटची तिमाही चांगली जाऊ शकेल.

वृषभ राशीच्या व्यक्तींना २०२३ वर्ष काही प्रमाणात अनुकूल राहील. दुसऱ्याच्या वादात पडणे टाळावे. रागावर नियंत्रण ठेवा. अन्यथा कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागेल. फेब्रुवारी आणि मार्च हे महिने शुभ राहतील. राशीचा स्वामी शुक्राचे संक्रमण लाभ आणि प्रगती देईल. वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत तुम्ही विरोधक आणि शत्रूंपासून सावध राहा. जुलै ते सप्टेंबर दरम्यान आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक जीवनासाठी हे वर्ष संमिश्र जाईल.

मिथुन राशीच्या व्यक्तींना आगामी वर्ष काहीसे संमिश्र ठरू शकेल. उत्पन्नाचे स्रोत निर्माण होत राहतील. शनी राशीबदलाचा प्रभाव जाणवू शकतो. रागावर नियंत्रण ठेवावे. घाईने कामे करू नयेत. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आरोग्याबाबत सावध राहण्याची गरज आहे. आर्थिक बाबतीत ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी खूप चांगला आहे. कमाईही चांगली होईल. एकंदरीत आगामी वर्ष समाधानकारक जाईल.

कर्क राशीच्या व्यक्तींना आगामी वर्ष संमिश्र ठरू शकेल. शनीच्या कुंभ राशीतील प्रवेशाने या राशीच्या व्यक्तींवर ढिय्या प्रभाव सुरू होईल. या काळात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागू शकतो. एप्रिलनंतर तुमच्या राशीवर गुरूची शुभ दृष्टी असेल. कामात यश मिळत राहील. मंगळाच्या प्रभावामुळे अनेक कारणांमुळे चिडचिण होऊ शकते. रागावार नियंत्रण ठेवणे उपयुक्त ठरू शकेल.

सिंह राशीच्या व्यक्तींना आगामी वर्ष संमिश्र ठरू शकेल. कामांना विलंब होईल. मंगळाच्या प्रभावामुळे जास्त धावपळ करावी लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. वडिलांची आणि स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. गुरूची शुभ दृष्टी असल्यामुळे शुभ कार्याचे आयोजन करू शकाल. विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतील.

कन्या राशीच्या व्यक्तींना आगामी वर्ष अनुकूल ठरू शकेल. गुरुच्या शुभ दृष्टीमुळे कौटुंबिक जीवनात योग्य ताळमेळ राहू शकेल. कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभू शकेल. विवाहेच्छुकांसाठी चांगली स्थळे येऊ शकतील. धार्मिक आणि शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. मार्च ते जून आरोग्यासंबंधी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जवळचे लोकही तुमच्याशी अनोळखी व्यक्तींसारखे वागतील. मानसिक तणाव आणि आर्थिक नुकसान होऊ शकते.

तूळ राशीच्या व्यक्तींना आगामी वर्ष आनंददायी ठरू शकेल. शनी ढिय्या प्रभावापासून मुक्तता होईल. मार्च आणि एप्रिल महिना उत्तम जाऊ शकेल. अचानक आर्थिक लाभ आणि प्रगतीच्या संधी मिळतील. समाजात आणि कुटुंबात मान-सन्मान मिळेल. शुभ कार्यासाठी प्रवासही घडू शकतो. नोकरीत तुमचा प्रभाव वाढेल. वर्षाच्या शेवटी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जास्त तेलकट मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना संमिश्र ठरू शकेल. आगामी वर्षात शनीचा ढिय्या प्रभाव सुरू होईल. विविध क्षेत्रात संघर्ष करावा लागेल. परंतु वर्षाच्या मध्यापासून गुरूच्या शुभ स्थितीमुळे उच्च अधिकार्‍यांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील. कामाच्या ठिकाणी मेहनतीचा फायदाही मिळेल. मानसिक तणाव राहील. परंतु अनेक बाबतीत मिळालेले यश आनंद देऊ शकेल. आरोग्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा टाळा.

धनु राशीच्या व्यक्तींना आगामी वर्ष अनुकूल ठरू शकेल. शनीच्या कुंभ प्रवेशानंतर साडेसाती संपुष्टात येईल. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असू शकतो. गुरूकृपेमुळे जमीन, वाहन सुख मिळू शकेल. कामात अनेकविध अडचणी येऊ शकतात. मात्र, आखलेल्या योजना यशस्वी होतील. कौटुंबिक जीवनात ताळमेळ ठीक राहील. वादही होतील. तुम्हाला संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. काही कौटुंबिक समस्या उद्भवतील.

मकर राशीच्या व्यक्तींना आगामी वर्ष संमिश्र ठरू शकेल. शनीच्या कुंभ प्रवेशानंतर साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल. राहु प्रभावामुळ खूप धावपळ करावी लागेल आणि. खर्चही वाढेल. नातेवाईक आणि मित्रांशी वाद होऊ शकतात. राग विकोपाला जाऊ न देणे उपयुक्त ठरू शकेल. स्वतःची काळजी घ्यावी. जून-जुलैमध्ये संघर्ष अधिक असेल पण कमाईही राहील. वर्षाचा शेवटचा तिमाही तुमच्यासाठी एकंदरीत अनुकूल असणार आहे.

कुंभ राशीच्या व्यक्तींना आगामी वर्ष संमिश्र ठरू शकेल. शनीच्या या राशीतील प्रवेशानंतर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होऊ शकेल. खूप धावपळ करावी लागेल. कार्यक्षेत्रात अधिक मेहनत घ्यावी लागेल. खर्चही जास्त असू शकतो. व्यवसायात नवीन योजना कराल. घरातील समस्यांमध्ये अडकून राहू शकाल. नात्यांमध्ये अंतर येऊ शकते. कठोर परिश्रम करून यशाचे गोड फळ मिळू शकेल.

मीन राशीच्या व्यक्तींना आगामी वर्ष संमिश्र ठरू शकेल. शनीच्या कुंभ प्रवेशानंतर मीन राशीची साडेसाती सुरू होऊ शकेल. यानंतर कामाच्या ठिकाणी अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. उत्पन्नात घट होईल. खर्च जास्त असेल. गुरू आणि राहुच्या प्रभावामुळे जवळच्या नातेवाईकाकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये तुमच्या राशीत राहु प्रवेशानंतर पुन्हा नवीन समस्यांना सामोरे जावे लागेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.