केसगळतीमुळे आहात हैराण? असा असावा डाएट प्लान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 06:43 PM2019-01-14T18:43:31+5:302019-01-14T18:54:11+5:30

लांबसडक आणि घनदाट केस असावेत, प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असते. पण हल्ली केसगळतीच्या समस्येचा सामना प्रत्येक स्त्रीला करावाच लागतो. विरळ केसांमुळे व्यक्तिमत्त्वावर परिणाम दिसून येतोच. पण केसगळतीमुळे लवकर टक्कलदेखील पडण्याची शक्यता असते. अशातच केस तुटू नयेत, गळू नयेत, यासाठी बहुतांशी स्त्रीया महागडे प्रोडक्ट्स आणि ट्रिटमेंटचा आधार घेतात. पण याचा परिणाम केवळ काही कालावधीपुरताच मर्यादीत असतो. केसगळती होऊ नये, असे वाटत असल्यास पौष्टिक आहाराचे सेवन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

1. ओमेगा 3 तत्त्व असणारे पदार्थ - कमकुवत, पातळ केसांसाठी ज्या पदार्थांमध्ये ओमेगा 3 भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात, अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा. ओमेगा थ्री मिळण्यासाठी आहारात मासे, अक्रोड, अळशी, भोपळा यांचे सेवन करावे. या पदार्थांपासून केसांना भरपूर पोषकतत्त्वं मिळतात. शिवाय, केस घनदाट होण्यासही मदत होते.

2. प्रोटीन्सयुक्त पदार्थ - केसांना भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळणं फार आवश्यक आहे. केसांची वाढ होईल, त्यांना भरपूर प्रमाणात पोषकतत्त्वं मिळतील, असे पदार्थ आहारात असावेत. केसांना प्रोटीन्स मिळावे, यासाठी अंडे, मासे, डाळी, दूध आणि त्यापासून तयार करण्यात येणाऱ्या पदार्थ खावेत.

3.झिंक - लांबसडक, घनदाट आणि काळेशार केसांसाठी शरीराला पदार्थांद्वारे झिंक मिळणे फार महत्त्वाचे आहे. केसांचे बाहेरील सौंदर्यही टिकून राहावे, यासाठी झिंक अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावते. यासाठी खजूर खावेत.

4. व्हिटॅमिन बी 7 - केसगळती होऊ नये, यासाठी बहुतांश स्त्रीया केरेटिन मसाजचा आधार घेतात. याद्वारे केसांना व्हिटॅमिन बी - 7 मिळते. पण केरेटिन मसाजमुळे केसांना केवळ वरील बाजूने व्हिटॅमिन बी-7 मिळते आणि याचा प्रभाव केवळ आठवडाभरच दिसतो. केसांना मुळापासून चांगले पोषण मिळावे, यासाठी बदाम, अक्रोड, शेंगदाणे इत्यादी ज्यांमध्ये व्हिटॅमिन बी 7चे भरपूर प्रमाण असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

5. व्हिटॅमिन सी - केसांना व्हिटॅमिन सी मिळणे,अतिशय आवश्यक आहे. व्हिटॅमिन सी केवळ केसांसाठीच नव्हे तर शरीरासाठीदेखील फायदेशीर असते. व्हिटॅमिन सीमुळे केसांमध्ये कोलेजनचे प्रमाण वाढते. केस मजबूत व्हावेत यासाठी संत्रे, ब्रोकली, आवळा यांसारखे फळे खावीत.