Top 5 Electric Two Wheelers: हिरो इलेक्ट्रिक पुन्हा टॉपवर, एथर आणि ओलाच्या विक्रीत कमालीची घट; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 07:56 PM2022-08-02T19:56:30+5:302022-08-02T20:06:08+5:30

Top 5 Electric Two Wheeler: हिरो इलेक्ट्रिक पुन्हा एकदा नंबर वन पोझिशनवर; 'या' आहेत टॉप-5 इलेक्ट्रिक टू-व्हिलर कंपन्या

Hero Electric- गेल्या काही महिन्यांपासून हिरो इलेक्ट्रिकच्या विक्रीक घट झाली होती. पण, जुलै 2022 मध्ये कंपनीने जबरदस्त कमबॅक केले आहे. विक्रीमध्ये हिरोने अनेक कंपन्यांना मागे टाकत नंबर-1 पोझिशन मिळवली आहे. जून महिन्यात हिरो तिसऱ्या स्थानावर गेली होती. कंपनीने जूनमध्ये फक्त 6,504 इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री केली. पण, जुलैमध्ये 8,786 इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री झाली. जुलै महिन्यात कंपनीच्या विक्रीत 35 टक्के वाढ झाली आहे.

Okinawa- इलेक्ट्रिक टू-व्हिलर सेगमेंटमध्ये काही काळ टॉपवर राहिलेल्या ओकीनावा ऑटोटेकने जुलै महिन्यात 17 टक्के वाढ नोंदवली. कंपनीने जून महिन्यात 6,944 यूनिट्सची विक्री केली होती, तर जुलैमध्ये 8,093 यूनिट्स विक्री झाली. गेल्या महिन्यात ओकिनावा दुसऱ्या स्थानावर आली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. कारण, गेल्या वर्षी कंपनीने फक्त 2,580 यूनिट्सची विक्री केली होती.

Ola Electric- एकीकडे हिरो इलेक्ट्रिक आणि ओकीनावाने विक्रीत मोठी वाढ नोंदवली आहे, तर दुसरीकडे ओला इलेक्ट्रिक, रिव्होल्ट आणि एथर एनर्जीच्या विक्रीत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. ओला इलेक्ट्रिकने जून 2022 मध्ये 5,886 यूनिट्सची विक्री केली, तर जुलैमध्ये ही विक्री 3,852 यूनिट्सवर आली आहे. म्हणजेच, कंपनीच्या विक्रीत 35 टक्के घट झाली आहे. अनेक ठिकाणी ओलाच्या गाड्यांना आग लागल्याच्या घटना घडत आहेत, हे यामागचे कारण असू शकते.

Revolt- RV400 इलेक्ट्रिक मोटरसायकल विकणाऱ्या रिव्होल्टने गेल्या महिन्यात घट नोंदवली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने फक्त 2,316 यूनिट्सची विक्री केली, त्यापूर्वी जूनमध्ये 2,424 यूनिट्सची विक्री झाली होती. अशाप्रकारे कंपनीच्या विक्रीत चार टक्के घट झाली आहे. परंतू, जुलै 2021 च्या तुलनेत कंपनीने विक्रीत 631 टक्के वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षी कंपनीच्या फक्त 317 यूनिट्स विकल्या गेल्या होत्या.

Ather Energy- एथर एनर्जीने गेल्या महिन्यात विक्रीत 67 टक्के घट नोंदवली आहे. एथरने यावर्षी जुलै महिन्यात 1,279 यूनिट्सची विक्री केली. त्यापूर्वी जून महिन्यात कंपनीने 3,829 यूनिट्स विकल्या होत्या. एका वर्षात एथरच्या विक्रीत 29 टक्के घट झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात एथरने 1,799 यूनिट्सची विक्री केली होती.