Ola Electric Scooter: 'गाडी निकल चुकी', ओला इलेक्ट्रिक स्कूटर S1 व S1 Pro ची डिलिव्हरी 15 डिसेंबरपासून होणार; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 02:55 PM2021-12-14T14:55:46+5:302021-12-14T15:08:55+5:30

Ola Electric Scooter : डिलिव्हरी प्रक्रियेपूर्वी ओला इलेक्ट्रिकने आपल्या ग्राहकांसाठी जवळपास 30,000 टेस्ट राइड्स आयोजित केल्या आहेत.

ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) या आठवड्यापासून आपल्या ग्राहकांना S1 आणि S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरचा पहिला टप्पा सुपूर्द करण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे. घोषणा केल्याप्रमाणे, तामिळनाडू-आधारित ईव्ही स्टार्टअप बुधवार, 15 डिसेंबरपासून इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी सुरू करेल. डिलिव्हरी प्रक्रियेपूर्वी ओला इलेक्ट्रिकने आपल्या ग्राहकांसाठी जवळपास 30,000 टेस्ट राइड्स आयोजित केल्या आहेत. S1, S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरच्या टेस्ट राइडसाठी लवकरच आणखी काही शहरांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

तत्पूर्वी, ओला इलेक्ट्रिकचे सीईओ आणि सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी तामिळनाडू-आधारित फ्यूचरफॅक्टरी येथे इलेक्ट्रिक स्कूटरच्या उत्पादन आणि असेंबली लाइनची झलक ट्विटरवर शेअर केली. ओला इलेक्ट्रिकचे कर्मचारी डिलिव्हरीसाठी ओला इलेक्ट्रिक स्कूटरची पहिली बॅच तयार करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येते. ट्विटरवर फोटो शेअर करताना अग्रवाल म्हणाले, "फुल स्पीडने चालणाऱ्या मॅन्युफॅक्चरिंग लाइनपेक्षा सुंदर काहीही असू शकत नाही."

यानंतर संध्याकाळी भाविश अग्रवाल यांनी "गाडी निकल चुकी" असे एक अपडेट शेअर केले. ज्याद्वारे असे संकेत मिळतात की ओला इलेक्ट्रिक स्कूटरची पहिली बॅच डिलिव्हरीसाठी रवाना झाली आहे.

ओला इलेक्ट्रिक ग्राहकांना S1 आणि S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिलिव्हरीसाठी बराच वेळ वाट पाहावी लागली. यापूर्वी ओला इलेक्ट्रिकने जाहीर केले होते की, डिलिव्हरीची पहिली बॅच 25 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान होईल. मात्र, कंपनीला डिलिव्हरीची तारीख या महिन्यापर्यंत पुढे ढकलावी लागली.

जवळपास चार महिन्यांपूर्वी 15 ऑगस्ट रोजी लॉन्च केलेल्या ओला इलेक्ट्रिकने सप्टेंबरमध्ये स्कूटरसाठी दोन दिवसांचे बुकिंग केले होते. त्यानंतर कंपनीने तब्बल 1,100 कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचा दावा केला. 20 नोव्हेंबरपासून ग्राहकांसाठी टेस्ट राइड सुरू झाली.

ओला इलेक्ट्रिक स्कूटर S1 आणि S1 Pro ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या S1 व्हेरिएंटची किंमत 1 लाख रुपये आहे, तर S1 Pro व्हेरिएंटची किंमत 1.30 लाख रुपये आहे. ही किंमत एक्स-शोरूम आणि राज्य सबसिडीपूर्वीची आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत देखील देशातील विविध राज्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी देण्यात येणाऱ्या सबसिडीनुसार बदलू शकते.

Ola S1 व्हेरिएंट एकदा फुल चार्ज केल्यानंतर 121 किमी अंतर कापू शकते. तर S1 Pro प्रकार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 181 किमी पर्यंतचे अंतर कापू शकते. S1 व्हेरिएंट 3.6 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेगाने धावते, तर S1 Pro व्हेरिएंट 3 सेकंदात 0 ते 40 किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडू शकते. तसेच, या स्कूटरचा टॉप स्पीड 115 किमी प्रतितास आहे.

S1 आणि S1 Pro दोन्ही मॉडेल्स अनेक फीचर्ससह येतात. स्कूटर बिना चावी असून मोबाइल फोन अॅप वापरून सुरू करता येते. यामध्ये मल्टी ड्रायव्हर प्रोफाइल तयार करता येतात. भविष्यात, कंपनी अॅप अपडेटद्वारे पॅरेंटल कंट्रोल आणि जिओफेन्सिंग यांसारखी अनेक फीचर्स वाढवू शकते. या स्कूटरमध्ये प्रॉक्सिमिटी सेन्सर उपलब्ध आहेत, म्हणजेच तुम्ही पोहोचताच स्कूटर अनलॉक होईल. ओला स्कूटरचे बूट उघडणे आणि बंद करण्याच्या ऑप्शनसह जीपीएस आणि कनेक्टिव्हिटीची सुविधा सुद्धा देण्यात आली आहे.

ओला इलेक्ट्रिकचे हायपरचार्जर ई-स्कूटरची बॅटरी केवळ 18 मिनिटांत 0 ते 50 टक्क्यांपर्यंत चार्ज करते. यामुळे स्कूटरची बॅटरी 75 किमीच्या अर्ध्या सायकलची रेंज कव्हर करण्यासाठी पुरेशी चार्ज होईल. कंपनीच्या वेबसाइटमध्ये ज्या शहरांमध्ये चार्जर स्टेशन लावण्यात येणार आहेत, त्याची संपूर्ण यादी देण्यात आली आहे.

तसेच, टियर I आणि टियर II च्या बहुतेक शहरे त्याच्या चार्जिंग नेटवर्क अंतर्गत कव्हर केली जातील. हायपर चार्जर स्टेशन्सना बहुस्तरीय लेआउट मिळेल, ज्यामुळे अनेक ग्राहकांच्या स्कूटर एकाच वेळी चार्ज करता येतील.