जुनी कार खरेदी करणे फायद्याचा सौदा? इकडे लक्ष द्या, नाहीतर फसाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 12:55 PM2023-10-23T12:55:32+5:302023-10-23T13:00:27+5:30

भारतीय बाजारात वाहनांच्या किंमती वाढल्याने जुन्या कारच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे जुन्या कारच्या किंमतीदेखील वाढल्या आहेत.

जुनी कार खरेदी करायची असेल तर काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास ते नुकसानीचे ठरत नाही. परंतू. त्याकडे जर लक्ष दिले नाही तर वापरलेली कार तुमच्या डोक्याचा ताप ठरू शकते हे नक्की. युज्ड कार (Used Car) खरेदी करताना कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करावा, चला पाहुया...

भारतीय बाजारात वाहनांच्या किंमती वाढल्याने जुन्या कारच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे जुन्या कारच्या किंमतीदेखील वाढल्या आहेत. अनेकांना ८-१० वर्षांपूर्वी ज्या किंमतीत कार घेतलेल्या त्याच किंमतीत वापरलेल्या कार विकता येत आहेत. यामुळे या कार मालकांना लॉटरीच लागली आहे. जुन्या कार स्क्रॅपमध्ये काढण्यासाठी सरकार विचाराधीन आहे. परंतू. लोक ग्रीन टॅक्सची सोय अजूनही असल्याने जुन्या कारकडे वळत आहेत.

जेव्हा तुम्ही स्वतःसाठी जुनी कार खरेदी करायला जाल तेव्हा त्या कारची संपूर्ण माहिती मिळवावी लागेल. एजंट किंवा कार मालक तुम्हाला तेवढीच माहिती देईल जी तुम्हाला भुलवायला उपयोगी असते. कारचा अपघात झालाय का, कुठे कुठे डेंटिंग पेंटिंग केलेले आहे. बंपर बदललेला आहे का, सर्व्हिस हिस्ट्री आदी गोष्टी तुम्हाला शोरुम, एखाद्या मेकॅनिकला दाखवून तपासाव्या लागतील.

अनेकजण इंजिन काम असेल किंवा अन्य कोणते मेजर काम असेल तर कार तशीच विकून टाकतात. यामुळे तुम्हाला यातील काही कळत नसेल तर तुमच्या ओळखीच्या चांगल्या गॅरेजवाल्याला नेऊन ती कार तपासावी. त्याचा थोडा चार्ज सोसावा लागेल परंतू, पुढच्या मोठ्या खर्चापासून वाचाल.

कार खरेदी करताना बजेट देखील पाहणे गरजेचे आहे. अनेकदा बजेटबाहेरच्या कार मिळतात. जर त्या खरेदी केल्या तर भविष्यात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यामुळे जुनी कार घेताना आधी तुमचे बजेट ठरवा. नंतर कोणती कार तुमच्या बजेटमध्ये बसते ते पहा.

अनेकदा पैसे वाचविण्यासाठी खूप जुनी कार म्हणजेच ११-१२ वर्षे झालेली कार खरेदी करतात. असे केल्याने फायद्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. या कारचे सस्पेंशन, इंजिन, एसीचे मेजर काम येऊ शकते. कारण आधीचा जो चालविणारा/चालविणारे होते त्यांनी एवढ्या वर्षांत कशी कार चालवलीय याची काहीच माहिती मिळत नाही.

खूप जुनी कार घ्यायला जाल तर त्या कारची लाईफदेखील भविष्यात कमी होऊ शकते. तसेच सध्याच्या नियमानुसार १५ वर्षेच कारचे आयुष्य आहे. त्यानंतर ग्रीन टॅक्स भरून घेतला जातो. असे असले तरी जर केंद्राच्या मनात आले तर कारचे आयुष्य १५ वर्षेच होऊ शकते. त्यामुळे तुमची कार खूप जुनी असेल तर तुमच्या हातात फार कमी वेळ असू शकतो.

कोणतीही जुनी कार घेण्यापूर्वी ती चांगल्या प्रकारे चालवून पहा. कारचे ब्रेकिंग कसे आहे, कारचे सस्पेंशन ठीक आहे की नाही, कारमध्ये काही वेगळा आवाज आहे का, कारच्या इंजिनमध्ये काही समस्या आहे का हे समजेल. खड्ड्यांच्या रस्त्यावर, तसेच चकाचक रस्त्यावर थोड्या वेगात कार चालवून पहा. पिकअप, बॅलन्स, ब्रेकिंग आदी गोष्टी तुमच्या लक्षात येतील.

टॅग्स :कारcar