कोणत्या गिअरमध्ये गाडी चांगले मायलेज देते...; 105 रुपयांच्या पेट्रोलमध्ये १४-१५ किमीच जाते? अनेकांना माहिती नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 01:53 PM2023-04-20T13:53:59+5:302023-04-20T13:59:48+5:30

How to Improve Car Mileage: १००-१०५ रुपयांचे पेट्रोल टाकायचे आणि कार चालणार १२-१५ किमी, नवी असो की जुनी मायलेजही मिळत नाहीय.

सध्या महागाईचे दिवस आहेत. पेट्रोल, डिझेलच्या किंमती कच्चे तेल घसरले तरी केंद्र सरकारने काही कमी केलेले नाहीय. असे असले तरी दुसरीकडे नव्या-जुन्या कारची विक्री वाढली आहे. लोक खासगी कार घेण्याकडे वळले आहेत. परंतू, या लोकांना कारचे मायलेज चिंतेत टाकत आहे. १००-१०५ रुपयांचे पेट्रोल टाकायचे आणि कार चालणार १२-१५ किमी, नवी असो की जुनी मायलेजही मिळत नाहीय.

जर कार मायलेज देत नसेल तर सर्व्हिस सेंटरला एकदा दाखवून घ्या. जर तरीही मायलेज वाढले नाही तर कार चालविण्याची तुमची पद्धत बदला. कारचे मायलेज हे तुमच्या चालविण्याच्या सवयीवर अवलंबून असते. एखाद्याला सेम कार २० -२२ चे मायलेज देते तर एखाद्याला तशीच कार १४-१५ चे. हे सारे अवलंबून असते ट्रॅफिक, गिअर आणि क्लच ब्रेकच्या वापरावर.

अनेकांना कोणत्या गिअरवर कार जास्त मायलेज देते आणि कोणत्या गिअरवर जास्त इंधन जाळते, हेच माहिती नसते. मग हे लोक यामुळे आपलेच नुकसान करून घेतात. मायलेज मिळत नाही मग ते इंधनावर जास्त खर्च करत बसतात. यामुळे आधी गिअर आणि इंधनाचे गणित जाणून घ्या...

गिअरचे काम प्रामुख्याने इंजिनची ताकद आणि वेग कारच्या चाकांपर्यंत नेण्याचे असते. अधिकतर कारमध्ये पाच गिअर असतात. मोठमोठ्या एसयुव्हीमध्ये किंवा काही कारमध्ये सहा, सात गिअर असतात. आपण ५ गिअरचा विचार करुयात.

यापैकी सर्वात शेवटचा म्हणजे ५ व्या गिअरमध्ये गाडी असेल तर इंजिनवरील लोड कमी होतो आणि कार वेगाने धावते. या गिअरमध्ये वेग ६० ते ८० किमी प्रति किमी असावा लागतो. हायवेवर कार या गिअरमध्ये असेल तर जास्त मायलेज मिळते.

परंतू पहिल्या आणि दुसऱ्या गिअरचे तसे नसते. हे गिअर इंजिनला जास्त ताकद निर्माण करण्यासाठी प्रवृत्त करतात. गाडीमध्ये कितीही वजन असुदे या गिअरमध्ये कार टाकली की ती पुढे जाते. चाकांना जास्त ताकद दिली जाते. यामुळे या गिअरला जास्त इंधन लागते.

बरेचजण ट्रॅफिकमधून जात असतात. अनेकदा बंपर टू बंपर ट्रॅफिक असते. तेव्हा फर्स्ट, सेकंड, थर्डच्या पुढे जाता येत नाही. अशावेळी जेव्हा कार थांबलेली असेल तेव्हाच गिअर टाकावा, अन्यथा क्लच प्लेट घासणे व इंधन जाळण्यात सारा पैसा वाया जाईल.

जेव्हा हायवेवर असाल तेव्हा ठराविक वेगात असल्यावरच तुम्हाला मायलेज चांगले मिळेल. उगाचच गाडी पळवत बसला तर मायलेजवर त्याचा परिणाम होतो. दुसरी महत्वाची गोष्ट ज्या रस्त्यावर तुम्हाला ओव्हरटेकसाठी सारखे गिअर बदलावे लागत असतील तर त्या रस्त्याऐवजी कमी रहदारीचा, जास्त लेन असलेला रस्ता निवडावा. वेळही वाचतो आणि इंधनही.

मायलेज मार खाते तेव्हा टायरदेखील तपासावेत. प्रवासाला निघताना टायरमध्ये योग्य प्रमाणात हवा भरून घ्यावी. व्हील अलायमेंट आणि बॅलन्सिंग करून घ्यावे. जेणेकरून टायरचे रस्त्यावर घर्षण कमी होते आणि मायलेज वाढते.

टॅग्स :कारcar