परभणी जिल्हा आरक्षणासाठी कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:52 AM2018-07-25T00:52:36+5:302018-07-25T00:53:25+5:30

औरंगाबाद येथील मराठा युवकाच्या मृत्यूनंतर आक्रमक झालेल्या मराठा संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जिल्ह्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला़ सकाळपासूनच बाजारपेठेतील एकही दुकान उघडले नाही़ संपूर्ण जिल्हाभरात कडकडीत बंद पाळून राज्य शासनाचा निषेध नोंदविण्यात आला़ परभणी शहरात झालेल्या किरकोळ दगडफेकीच्या घटना वगळता जिल्हाभरात बंद शांततेत पार पडला़

For the reservation of Parbhani district, the ban was stopped | परभणी जिल्हा आरक्षणासाठी कडकडीत बंद

परभणी जिल्हा आरक्षणासाठी कडकडीत बंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : औरंगाबाद येथील मराठा युवकाच्या मृत्यूनंतर आक्रमक झालेल्या मराठा संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जिल्ह्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला़ सकाळपासूनच बाजारपेठेतील एकही दुकान उघडले नाही़ संपूर्ण जिल्हाभरात कडकडीत बंद पाळून राज्य शासनाचा निषेध नोंदविण्यात आला़ परभणी शहरात झालेल्या किरकोळ दगडफेकीच्या घटना वगळता जिल्हाभरात बंद शांततेत पार पडला़
मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आठ दिवसांपासून मराठा समाजबांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत़ परभणी जिल्ह्यात मानवत, सोनपेठ, पाथरी येथे धरणे आंदोलन सुरू आहे़ सोमवारी गंगाखेड येथे बंद पाळण्यात आला़ याच दरम्यान, औरंगाबाद येथील काकासाहेब शिंदे या युवकाने आरक्षणासाठी जलसमाधी घेतल्याने आंदोलनाला उग्र स्वरुप प्राप्त झाले़ रात्री उशिरा महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली़ या बंदला परभणी जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़
मंगळवारी सकाळपासूनच परभणी शहरातील बाजारपेठेतील बहुतांश दुकाने बंद ठेवली होती़ सकाळी १० वाजेच्या सुमारास १०० ते १५० युवकांनी बाजारपेठेत फिरून बंदचे आवाहन केले़ यावेळी बंद न केलेल्या दुकानांवर दगडफेक करण्यात आली़ शनिवार बाजार, नानलपेठ कॉर्नर येथून युवक बंदचे आवाहन करीत असताना शिवाजी चौक ते नानलपेठ कॉर्नर भागात एका स्वीटमार्टवर दगडफेक झाली़ तेथून निघालेला हा जमाव शिवाजी चौकात पोहचला़
तेथून पुढे गांधी पार्क येथे युवकांच्या जमावाने काही दुकानांवर दगडफेक केली़ हा जमाव जिल्हा स्टेडियमसमोरून जात असताना स्टेडियम आणि जलतरिणका परिसरातील वृत्तपत्रांच्या दोन कार्यालयांवरही दगडफेक झाली़ तसेच देशमुख हॉटेल परिसरातही एका दुकानावर दगडफेक करण्यात आली़
जमावाने केलेल्या दगडफेकीत दोघे जण जखमी झाले आहेत़ त्यापैकी एका जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ हा जमाव दर्गा रोड परिसरातही बंदचे आवाहन करीत फिरत असताना आझम चौक भागात दगडफेक झाल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ या ठिकाणची सर्व दुकाने बंद झाली़ त्यापूर्वी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील ग्रँड कॉर्नर, अपना कॉर्नर परिसरातही दगडफेकीच्या घटना घडल्या़ त्यामुळे मोठा जमाव जमला होता़
अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे हे फौजफाट्यासह दाखल झाले़ त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली़ दुपारी १२़३० वाजेपर्यंत झालेल्या या दगडफेकीच्या घटना वगळता परभणी शहरात बंद शांततेत पार पडला़ दुपारी २ वाजेनंतर शहरातील परिस्थिती नियंत्रणात आली होती़
परभणीत आंदोलकांवर सौम्य लाठीमार
बंद दरम्यान सकाळी युवक शहरात आवाहन करीत फिरत होते़ काही दुकाने सुरू असल्याने या दुकानांवर दगडफेकीच्या घटना घडल्या़ बंदचे आवाहन करीत हे युवक दर्गा रोडवरील आझम चौकात आले़ या ठिकाणचे दुकाने बंद केल्यानंतर हा जमाव तेथून पुढे निघाला़ मात्र या ठिकाणी काही युवक जमा झाले होते़ त्यामुळे परिस्थिती तणावाची बनली़ या परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही लावला होता़ परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकची कुमक मागवून घेतली़ यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला़ त्यानंतर काही वेळातच जमाव पांगला़ त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली़ दुपारी २ वाजेनंतर मात्र शहरातील तणाव निवळला होता़
२० मिनिट रोखली सचखंड
मराठा समाजबांधवांच्या वतीने मंगळवारी रेलरोकोचेही आवाहन केले होते़ या आवाहानानुसार सकाळी १० वाजेच्या सुमारास येथील रेल्वेस्थानकात समाजबांधव मोठ्या संख्येने एकत्र आले़ राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलकांनी रेल्वे रुळावर ठिय्या मांडला़ आदिलाबाद-परळी आणि हैदराबाद-औरंगाबाद या दोन पॅसेंजर रेल्वे गाड्या रोखून धरल्या़ त्यानंतर ११़१० मिनिटांनी सचखंड एक्सप्रेस रेल्वेस्थानकावर दाखल झाली़ ही गाडीही आंदोलकांनी २० मिनिटे रोखून धरत जोरदार घोषणाबाजी केली़
बसस्थानकाचे दोन्ही गेट बंद
बंदच्या काळात बसेसवर दगडफेकीच्या घटना होत असल्याने मंगळवारी एसटी महामंडळ प्रशासनाने बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला़ परभणी विभागातील परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सातही आगारातून मंगळवारी एकही बस धावली नाही़ याच दरम्यान, वसमत आगारामध्ये घुसून उभ्या बसवर दगडफेक झाल्याची घटना घडल्यानंतर परभणीत महामंडळ प्रशासनाने बसस्थानकाचे दोन्ही गेट बंद करण्याचा निर्णय घेतला़ अनेक वर्षानंतर प्रथमच स्थानकाचे गेट बंद करण्यात आले होते़ दिवसभर बसस्थानकात एकही बस उभी केली नाही़ तसेच प्रवासीही नसल्याने हे बसस्थानक ओस पडले होते़
पूर्णेत मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
पूर्णा- शहरासह तालुक्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ आंदोलकांनी तीव्र निदर्शने करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला़ मंगळवारी पूर्णा, चुडावा, ताडकळस, झिरोफाटा आदी ठिकाणच्या बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्या़ नांदेड टी पॉर्इंट येथे शेकडो युवकांचा जमाव जमा झाला़ तेथून शहराकडे मोर्चा काढण्यात आला़ यावेळी ठिक ठिकाणी टायर जाळून शासनाचा निषेध करण्यात आला़ हा मोर्चा शिवाजी चौक येथे आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले़ शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली़ तहसीलदार श्याम मदनूरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डिले यांना मागण्यांचे ेनिवेदन देण्यात आले़ तसेच चुडावा येथे मराठा समाजातील युवकांनी सकाळी ९ वाजता रास्ता रोको आंदोलन केले़ या आंदोलनामुळे पूर्णा-नांदेड राज्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती़
गंगाखेड दुसºया दिवशीही बंद
गंगाखेड- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजबांधवांनी दुसºया दिवशीही बंद पाळला़ दिवसभर बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली़ सोमवारच्या बंदला हिंसक वळण मिळाले होते़ मंगळवारी मात्र शांततेत बंद पार पडला़ सकाळी १० वाजेच्या सुमारास युवकांनी रॅली काढून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले़ त्यामुळे दुसºया दिवशीही संपूर्ण बाजारपेठ बंद राहिली़ गंगाखेड आगारातून एकही बस बाहेर न पडल्याने प्रवाशांची गैरसोय झाली़ सोमवारी तालुक्यात वाहनांची तोडफोड व जाळपोळ झाली होती़ या प्रकरणी सुमारे २५ लाख ६२ हजार रुपयांचे नुकसान केल्या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांच्या फिर्यादीवरून सुमारे २०० ते २५० जणांविरूद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पोलिसांनी आतापर्यंत २५ जणांना ताब्यात घेतले आहे़ उपनिरीक्षक भाऊसाहेब मगरे तपास करीत आहेत़
टायर पेटविले
पालम तालुक्यात सलग दुसºया दिवशी बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली़ मंगळवारी बंदची तिव्रता वाढली होती़ युवकांनी सकाळपासूनच राज्य रस्त्यावर टायर पेटवून देत शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला़
पाथरीत २० आंदोलनकर्त्यांनी केले मुंडण
पाथरी-मराठा समाजाच्या वतीने पाथरी येथे १९ जुलैपासून सुरू झालेल्या धरणे आंदोलनाची तीव्रता वाढत असून, २४ जुलै रोजी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले़ २० आंदोलकांनी मुंडण करून शासनाचा निषेध नोंदविला़
४येथील तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे़ आंदोलनाचा सहावा दिवस असून, औरंगाबाद जिल्ह्यात एका युवकाने आरक्षणासाठी जलसमाधी घेतल्याची घटना सोमवारी घडली़
४या घटनेनंतर आंदोलक अधिकच संतप्त झाले असून, घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी पाथरी तालुक्यात बंद पाळण्यात आला़ शहरातील संपूर्ण बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये बंद होती़
४शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी आंदोलकांनी मुंडण केले़ यात मुस्लीम समाजातील शेख समीर या युवकाने मुंडण करून आंदोलनास पाठिंबा दर्शविला़ पंचायत समितीचे सदस्य ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह तुकाराम पौळ, भागवत कोल्हे, संदीप टेंगसे, कृष्णा शिंदे, विष्णू काळे, अमोल टाकळकर, सोमेश गरड, अनिल काळे, तुकाराम शिंदे, विशाल घांडगे, गणेश टाकळकर यांच्यासह २० जणांनी मुंडण केले़

Web Title: For the reservation of Parbhani district, the ban was stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.