Police firing ranges bullet hits youngster at Jintur | जिंतूरच्या पोलीस गोळीबार केंद्रातून सुटलेल्या गोळीने घेतला युवकाचा वेध
जिंतूरच्या पोलीस गोळीबार केंद्रातून सुटलेल्या गोळीने घेतला युवकाचा वेध

जिंतूर (परभणी ) : येथील पोलीस गोळीबार प्रशिक्षण केंद्रात गोळीबाराचा सराव करत असताना एका गोळीने केंद्राबाहेर अर्धा किलोमीटरवर उभे असलेल्या युवकाचा वेध घेतल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.११) सायंकाळी घडली. नितीन विष्णु पुंड (16 ) असे जखमी युवकाचे नाव असून त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे. 

तालुक्यातील मैनापुरी येथे पोलीस गोळीबार प्रशिक्षण केंद्र आहे. या ठिकाणी जिल्हाभरातून पोलीस गोळीबार प्रात्यक्षिक करण्यासाठी येतात. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान येथे काही पोलीस गोळीबाराचा सराव करत होते. या दरम्यान, सरावासाठीच्या भिंतीच्यावरून एक गोळी परिसराच्या बाहेर गेली. या गोळीने केंद्रापासून जवळपास ५०० मीटर अंतरावरील एका खाजगी वसतिगृहासमोर उभा असलेल्या नितीन या युवकाच्या पायाचा वेध घेतला. तब्बल एक ते दीड तासानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून त्यास पुढील उपचारासाठी तातडीने औरंगाबाद येथे हलवण्यात आले.

दरम्यान, या घटनेची कोणतीही नोंद जिंतूर पोलिसात नसल्याचे पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले यांनी सांगितले.


Web Title: Police firing ranges bullet hits youngster at Jintur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.