परभणी : भर दुष्काळात बारवात चार फुटावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:46 PM2019-04-27T23:46:05+5:302019-04-27T23:47:14+5:30

तालुक्यात दुष्काळामुळे ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करीत असताना शहरातील मन्नाथ मंदिरातील पुरातन बारवामध्ये ४ फुटावर पाणी आहे़ त्यामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये ही बारव नागरिकांसाठी आशेचा किरण ठरत आहे़

Parbhani: Water over four feet in a time of drought | परभणी : भर दुष्काळात बारवात चार फुटावर पाणी

परभणी : भर दुष्काळात बारवात चार फुटावर पाणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): तालुक्यात दुष्काळामुळे ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करीत असताना शहरातील मन्नाथ मंदिरातील पुरातन बारवामध्ये ४ फुटावर पाणी आहे़ त्यामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये ही बारव नागरिकांसाठी आशेचा किरण ठरत आहे़
गोदावरी नदीच्या वास्तव्याने गंगाखेड तालुका सुजलाम सुफलाम झाला आहे़ तालुक्यात नदीचे पात्र वाहत असल्याने एकेकाळी बारमाही पाणी उपलब्ध असायचे; परंतु, परिस्थिती बदलली आणि सद्यस्थितीला अभावानेच गोदावरी वाहती दिसू लागली़ याचा परिणाम तालुक्यातील विहिरी आणि इतर ओढ्या नाल्यांवरही झाला़ दिवसेंदिवस पाणी पातळी खालावत गेली़ सद्यस्थितीला तर तालुक्यात दुष्काळ निर्माण झाला आहे़ मोठे तलाव, प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत़ अशा भिषण दुष्काळी परिस्थितीत शहरापासून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र मन्नाथ मंदिर येथील पुरातन शिवलिंगाचा आकार असलेली बारव सध्या नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे़ कारण इतर विहिरींनी तळ गाठला असताना या बारवात चार फुटावर पाणी आहे़ डोंगरी भागात जाणाऱ्या कोद्री रस्त्यावर मरगळवाडी शिवारात डोंगराच्या पायथ्याला श्रीक्षेत्र मन्नाथ मंदिर वसले आहे़ पुरातन कालीन दगडी बांधकाम असलेली २० फुट खोल आणि २० फुट रुंद बारव या ठिकाणी आहे़ या बारवातील पायºया उतरून सहज पाणी घेता येते़ भर उन्हाळ्यात या बारवातील पाण्याचा उपसा केल्यानंतर अवघ्या एका तासातच बारवातील पाणी जशाच्या तसे होत आहे़ पावसाळ्यात तर मंदिर परिसरातील ही बारव काठोकाठ भरलेली असते़ असे येथील भाविकांनी सांगितले़ श्रीक्षेत्र मन्नाथ मंदिराच्या स्थापनेचा कालखंड माहीत नसला तरी हे मंदिर साधारणत: ३०० वर्षापेक्षाही अधिक काळाचे असावे, असे सांगितले जाते़ श्रावण महिन्यात या ठिकाणी महिनाभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते़ श्रावणी सोमवारी पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत रांगा लागतात़ याच मंदिराच्या परिसरातील बारव सध्या चर्चेचा विषय झाली आहे़ तालुक्यामध्ये भिषण दुष्काळ निर्माण झाला असून, मासोळी मध्यम प्रकल्प कोरडा पडल्याने गंगाखेड शहराचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ ग्रामीण भागात तर पाणीसाठे शिल्लक नसल्याने ग्रामवासियांना टँकरने पाणी द्यावे लागत आहे़ विहीर आणि बोअर अधिग्रहणासाठीही पाणी शिल्लक नसल्याची स्थिती यावर्षी निर्माण झाली आहे़ अशा भिषण परिस्थितीमध्ये मन्नाथ मंदिर परिसरातील बारवेत मुबलक प्रमाणात पाणी असल्याने बारव निर्मिती विषयीही कुतूहल निर्माण झाले आहे़ विशेष म्हणजे केवळ २० फुटांचे खोदकाम करण्यात आले असून, अवघ्या २० फुटांवर उपलब्ध असलेला हा पाणीसाठा आकर्षण ठरत आहे़ या मंदिराची आणि बारवेची दुरवस्था झाली असून, जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे़

Web Title: Parbhani: Water over four feet in a time of drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.