परभणी : पहिल्याच पावसात रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:31 AM2019-07-01T00:31:58+5:302019-07-01T00:32:21+5:30

शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पहिल्याच पावसाने अधिक गंभीर झाला आहे. शहर परिसरात समाधानकारक पाऊस झाला नसला तरी शहरातील रस्ते मात्र चिखलाने माखले आहेत. त्यामुळे या पावसाने रस्त्यांचे पितळ उघडे पाडले आहे.

Parbhani: Road showers in the first rain | परभणी : पहिल्याच पावसात रस्त्यांची दुरवस्था

परभणी : पहिल्याच पावसात रस्त्यांची दुरवस्था

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पहिल्याच पावसाने अधिक गंभीर झाला आहे. शहर परिसरात समाधानकारक पाऊस झाला नसला तरी शहरातील रस्ते मात्र चिखलाने माखले आहेत. त्यामुळे या पावसाने रस्त्यांचे पितळ उघडे पाडले आहे.
रस्त्यावरील खड्डे परभणीकरांसाठी नवीन नसले तरी दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने या खड्ड्यांचा त्रास वाढला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांबरोबरच वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाल्याने आणखी चार महिने शहरवासियांना हा त्रास सहन करावा लागणार आहे.
शुक्रवारी आणि शनिवारी परभणी शहर परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्यानंतर शहरातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. बाजारपेठ आणि शहराच्या मध्यवर्ती भागात नागरिकांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. तर वसाहतीमधील रस्त्यांची समस्या यापेक्षाही बिकट झाली आहे.
शहरालगत नव्याने वसलेल्या वसाहतींमध्ये रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. मागील चार वर्षांपासून शहरात नव्याने रस्ते झाले नाहीत. ज्या भागात रस्ते झाले तेही अर्धवट करण्यात आले आहेत. परिणामी शहराची बकाल अवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, २५ वर्षांपूर्वीच्या वसाहतीमध्येही चिखलाने माखलेले रस्ते महापालिकेची उदासिनता दाखवित आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शहरात रस्त्यांची समस्या नव्याने समोर आली आहे. मनपा प्रशासनाने स्वच्छतेची मोहीम हाती घेतली असून काही भागात नाल्यांची स्वच्छता केली जात आहे. आता रस्त्यांचा प्रश्न निर्माण झाल्याने महापालिका काय उपाययोजना करते, याकडे लक्ष लागले आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात रस्त्यांवर खड्डे आहेत. या मार्गावरुन कशीबशी वाहने चालविता येतात. मात्र वसमत रोड, जिंतूररोड, गंगाखेड रोड या भागातील वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात काळी माती आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरवस्थेत आणखीच भर पडली आहे. त्यामुळे पहिल्याच पावसाने शहरातील रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता महापालिका रस्त्यांच्या प्रश्नावर कशा पद्धतीने मार्ग काढते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सध्या तरी चिखल तुडवतच येथील नागरिकांना रस्ते पार करावे लागत आहेत.
रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी
४शहरातील रस्त्यांची दुरवस्था हा प्रश्न आता नव्याने निर्माण झाला असून संपूर्ण पावसाळ्यात नागरिकांना चिखल तुडवत वाहतूक करावी लागणार आहे. त्यामुळे या रस्त्यांची वेळीच दुरुस्ती करणे गरजेचे झाले आहे.
४मागील पावसाळ्यामध्ये महापालिकेने चिखल झालेल्या भागात मुरुम टाकण्याचे नियोजन केले होते. मात्र खूप उशिराने ही दुरुस्ती हाती घेतली होती. यावर्षी रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. ही बाब लक्षात घेऊन मनपाने वेळीच उपाययोजना करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
दुरवस्था झालेले शहरातील रस्ते
४परभणी शहरातील वसमतरोड, गंगाखेड रोड आणि जिंतूररोड या तीनही भागात नव्याने वसलेल्या वसाहतींमध्ये रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागाला लागून असलेल्या मोंढा परिसरातील रस्तेही अत्यंत खराब झाले आहेत. दत्तधाम परिसरातील आरोग्य कॉलनी, सत्कार कॉलनी, विक्रम सोसायटी, खानापूर परिसर, रचना नगर, वृंदावन कॉलनी, कृषीसारथी कॉलनी, गजानननगर, दत्तनगर, देशमुख हॉटेल परिसर.
४हडको, जिंतूर रोडवरील नगरपालिका कॉलनी, शांतीनगर, जुना पेडगावरोड, सहकार नगर, प्रताप नगर, नांदखेडा रोड परिसर, गंगाखेडरोडवरील काकडेनगर, साखला प्लॉट, लोहगाव रोडवरील वसाहती आदी भागातील वसाहतीमधील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले असून अनेक भागात चिखल तुडवत घर गाठावे लागत आहे.

Web Title: Parbhani: Road showers in the first rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.