परभणी पंचायत समिती :घरकुल योजनेला लागली घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:15 AM2018-05-30T00:15:05+5:302018-05-30T00:15:05+5:30

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी परभणी पंचायत समितीला ४०५ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र दुसरे वर्ष सुरु झाले तरी केवळ २५४ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे परभणी तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेला मरगळ आल्याचे दिसून येत आहे.

Parbhani Panchayat Samiti: Gharakul Yojana was started in the house | परभणी पंचायत समिती :घरकुल योजनेला लागली घरघर

परभणी पंचायत समिती :घरकुल योजनेला लागली घरघर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी परभणी पंचायत समितीला ४०५ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र दुसरे वर्ष सुरु झाले तरी केवळ २५४ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे परभणी तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेला मरगळ आल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील व ज्या नागरिकाकडे कच्चे बांधकाम असलेले घर आहे, त्या नागरिकाला केंद्र शासन व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमानातून पक्के घर मिळावे, यासाठी २०१६ पासून प्रधानमंत्री आवास योजनेला अंमलात आणली. या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला व प्रत्येक पंचायत समितींना प्रत्येकी एका वर्षाचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यानुसार परभणी पंचायत समितीला २०१६-१७ या आर्थिक वर्षात ४०५ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यानुसार पंचायत परभणी समितीकडून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले. त्यानुसार परभणी तालुक्यातील ६३३ लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव दाखल केले. त्यापैकी ५६३ लाभार्थ्यांची परभणी पंचायत समिती प्रशासनाकडून जिओ टॅगिंग करण्यात आली. त्यातून ४०५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या लाभार्थ्यांना प्रति एका घरकुलासाठी १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान चार हप्त्यात दिले जाते.
३९५ लाभार्थ्यांना पहिल्या हप्प्त्याची रक्कम वर्ग करण्यात आली. दुसऱ्या हप्त्यातील रक्कम ३९५ पैकी ३४० लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केली. त्यामुळे या लाभार्थ्यांची हक्काची घरे वेळेत पूर्ण होतील, अशी लाभार्थ्यांसह वरिष्ठ अधिकाºयांना अपेक्षा होती. २०१६-१७ हे आर्थिक वर्ष संपून २०१७-१८ या वर्षातीलही पाच महिने पूर्णत्वास आले आहेत. मात्र परभणी पंचायत समितीला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दिलेले घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. त्यामुळे परभणी तालुक्यात या योजनेला मरगळ आल्याचेच दिसून येत आहे.
गतवर्षीचे जिल्ह्याचे उद्दिष्टही अर्ध्यावर
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी २ हजार ६७१ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी केवळ १ हजार ८०६ घरकुले पूर्णत्वास गेली आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्याला या योजनेअंतर्गत दिलेले उद्दिष्टही अर्ध्यावरच दिसून येते. यामध्ये गंगाखेड तालुक्याला ३४० घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी २३० घरकुले पूर्णत्वास गेले आहेत. जिंतूर तालुका ५६१ पैकी ३५९, मानवत १४६ पैकी १११, पालम ३५८ पैकी २५८, परभणी ४०५ पैकी २५४, पाथरी २२४ पैकी १८२, पूर्णा २४१ पैकी १४०, सेलू २१३ पैकी १६७, सोनपेठ १८३ पैकी १०५ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे.
ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचा अडथळा
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांची कामे करताना वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कामांची विभागणी करण्यात आली आहे. परभणी पंचायत समिती प्रशासनामार्फत लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारुन छाननी, मंजूर व प्रशासकीय मान्यता देणे आदी कामे केली जातात. मात्र घरकुलांचे जिओ टॅगिंग करण्यासाठी औरंगाबाद येथील एका खाजगी कंपनीने गृहनिर्माण अभियंता या पदाचे कंत्राटी पद्धतीने दोन पदे भरली आहेत. या अभियंत्यांनी जिओ टॅगिंग करुन पं.स. प्रशासनाला अहवाल सादर करावयाचा असतो. त्यानंतर लाभार्थ्याला घरकुलाची रक्कम अदा केली जाते. मात्र घरकुल लाभार्थ्यांचे रजिस्ट्रेशन व घरकुलांचे अंतिमीकरण याची प्रगती परभणी तालुक्यात असमाधानकारक आहे.
यावरुन परभणी पंचायत समितीच्या वतीने तीन ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस १७ एप्रिल रोजी पाठविण्यात आली आहे. मात्र अजूनही या अभियंत्याचे काम समाधानकारक झाले नाही. त्यामुळे या ग्रामीण गृहनिर्माण अभियंता पदाचाच या योजनेला अडथळा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यावर वचक ठेवून प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट पूर्णत्वास न्यावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Parbhani Panchayat Samiti: Gharakul Yojana was started in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.