शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी परभणीत महिलांचे आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 03:41 PM2018-09-21T15:41:19+5:302018-09-21T15:42:04+5:30

जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी आज सकाळी महिलांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले.

In Parabhani Women's Movement for the demand of Government Medical College | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी परभणीत महिलांचे आंदोलन 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी परभणीत महिलांचे आंदोलन 

Next

परभणी : जिल्ह्याला शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी आज सकाळी महिलांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. महिलांच्या घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.

शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयासाठी खा.बंडू जाधव यांनी परभणीत आंदोलन उभे केले आहे. या अंतर्गत शुक्रवारी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी उचलून धरली. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात सकाळी ११ वाजेपासून महिला एकत्र आल्या. यावेळी महापौर मीनाताई वरपूडकर, कॉ.माधुरी क्षीरसागर, डॉ.मीनाताई परतानी, डॉ.संध्याताई दुधगावकर, आधार कामगार युनियनच्या अनिता सरोदे, लायन्स क्लबच्या प्रभावती अन्नपूर्वे, हेमाताई रसाळ, श्रृती जोशी, वर्षा चव्हाण, सरोज देशपांडे, लताबाई परभणे, परिचारिका मेघना देशमुख, विमल काकडे, विद्यार्थिनी कोमल विश्वब्रह्मा आदींनी उपस्थित महिलांसमोर मनोगत व्यक्त केले.

परभणी जिल्ह्यात कुठल्याही सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते. शासकीय रुग्णालयासाठी सर्व सुविधा उपलब्ध असताना तसेच या ठिकाणी महापालिका अस्तित्वात असताना वैद्यकीय महाविद्यालयासाठी जाणून बुजून डावलल्या जात आहे. परभणीकरांना आंदोलनाशिवाय काहीच मिळत नाही. त्यामुळे या महाविद्यालय मंजूर होईपर्यंत संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे महिलांनी यावेळी सांगितले. त्यानंतर महिला प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे यांना मागण्यांचे निवेदन दिले. 

वैद्यकीय महाविद्यालयाचा लढा तीव्र करणार : खा.बंडू जाधव 
परभणी येथे सर्व सुविधा आणि महापालिका असतानाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय का डावलले? असा सवाल करीत शासनाने त्याचा खुलासा करावा व वैद्यकीय महाविद्यालयास त्वरीत मंजुरी द्यावी, अशी मागणी खा.बंडू जाधव यांनी केली. वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास परभणीतील नागरिकांच्या आरोग्यासह शिक्षणाचाही प्रश्न निकाली निघणार आहे. त्यामुळे हे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करुन घेण्यासाठी उभारलेला हा लढा आणखी तीव्र करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: In Parabhani Women's Movement for the demand of Government Medical College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.