Brake to connect 24 bus ferries to 10 villages due to a bad road in Parbhani | परभणीत खराब रस्त्यामुळे १० गावांना जोडणा-या २४ बसफेर्‍यांना ब्रेक
परभणीत खराब रस्त्यामुळे १० गावांना जोडणा-या २४ बसफेर्‍यांना ब्रेक

परभणी : दररोज १५ हजार रुपये उत्पन्न देणार्‍या परभणी ते कुंभारी या मार्गावरील बसफेर्‍या बंद करण्याचा निर्णय एस.टी. महामंडळाने घेतला आहे. रस्ता चांगला नसल्याने महामंडळ या निर्णयापर्यंत आले आहे. यामुळे प्रवाशांच्या त्रासाबरोबरच महामंडळाला उत्पन्नावरही पाणी सोडावे लागणार आहे.

कुंभारी ते परभणी हे २५ कि.मी.चे अंतर आहे. या मार्गावर टाकळी, शहापूर, तुळजापूर, आर्वी, वाडी, गोविंदपूर, इस्माईलपूर, कुंभारी बाजार, डिग्रस, कार्ला, कुंभारी दुधना आदी १० गावांतील प्रवासी दररोज एस.टी. बसने प्रवास करतात. परभणीला कामानिमित्त येणार्‍या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे परभणी आगाराला या बससेवेतून मोठे उत्पन्नही मिळते. मात्र एक -दोन वर्षापासून टाकळी कुंभकर्ण ते कुंभारी बाजार या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. काही महिन्यांपूर्वी शहापूर ते कुंभारी बाजार हा रस्ता दुरुस्त करण्यात आला. मात्र टाकळी कुंभकर्ण ते शहापूर हा रस्ता ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे महामंडळाच्या बस या रस्त्यावरुन ये-जा करताना टायर पंक्चर होणे, स्प्रिंग तुटणे यासह इतर आर्थिक नुकसान महामंडळाला सहन करावे लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यातून बस चालविताना चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

चालक व वाहकांच्या अनेक तक्रारी आगारप्रमुख डी.बी.काळम पाटील यांच्याकडे आल्या होत्या. त्यावरुन काळम पाटील यांनी तहसीलदार, विभागीय नियंत्रक, ग्रामपंचायत यांना पत्र पाठवून समस्येची माहिती दिली. मात्र रस्ता दुरुस्तीकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे २८ डिसेंबर रोजी आगारप्रमुख  काळम पाटील यांनी रस्त्याअभावी परभणी ते कुंभारी ही बस ७ जानेवारीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बस बंद झाल्यास १० गावातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी लक्ष देऊन या प्रश्नी तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

अवैध वाहतुकीला मिळणार  चालना
परभणी- कुंभारी या रस्त्यावरुन ये-जा करणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या रस्त्याला जवळपास १० गावे जोडली गेली आहेत. त्यामुळे या गावातील प्रवाशांसह विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. पर्यायाने प्रवासी या रस्त्यावर चालणार्‍या अवैध वाहतुकीकडे वळतील. त्यामुळे यावर जिल्हा प्रशासनाने तोडगा काढून ७ जानेवारीपासून बंद करण्यात येणारी बस पूर्ववत चालू ठेवावी. प्रवाशांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याकडे एसटी महामंडळ व जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले
टाकळी कुंभकर्ण ते शहापूर या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे बसेस नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक वेळा संबंधितांना पत्र व्यवहार केला. परंतु, कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे परभणी ते कुंभारी बस ७ जानेवारीपासून बंद करावी लागत आहे.
- डी.बी.काळम पाटील, आगारप्रमुख

काम सुरु आहे 
टाकळी कुंभकर्ण ते शहापूर रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला आहे. या रस्ता कामाच्या निविदा प्रक्रियेचे काम सुरु आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल. 
-शिराढोणगावकर, अभियंता


Web Title: Brake to connect 24 bus ferries to 10 villages due to a bad road in Parbhani
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.