आपलं डोकं आहे ठिकाणावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 08:32 AM2018-03-29T08:32:57+5:302018-03-29T08:32:57+5:30

दिसली लिंक की, कर क्लिक असा ‘बावळटपणा’ आपण करणार असू, तर आपलं जगणं चव्हाट्यावर येणारच..

Where is your head? | आपलं डोकं आहे ठिकाणावर?

आपलं डोकं आहे ठिकाणावर?

Next

 - विनायक पाचलग

तुम्ही कोणते राजकारणी होणार? कोणते स्टारसारखे दिसणार? कधी मरणार? म्हातारे कसे दिसणार? कुठल्या सिनेमातलं कॅरेक्टर आहात? अशा तमाम क्विझ फेसबुकवर घेता तुम्ही? मग तुमचा डाटा चोरी होणार, तुमचं खासगीपण संपणारच..

गेला आठवड्यात एक नवच फॅड आलंय, फेसबुकवर टीका करायचं! का? तर म्हणे, त्यांनी आपला डाटा कोणाला तरी चोरू दिला वगैैरे वगैरे. लोक असं बोलत आहेत की जणू त्यांना यातलं काही आधी माहीतच नव्हतं आणि आजच कळलं की फेसबुक असे काही करते. आपला डाटा फेसबुक वापरते हे उघड गुपित आहे आणि ते सर्वांनाच माहीत आहे. परवा फक्त झुकरबर्गने ते मान्य केले इतकेच. मग त्याचा एवढा बाऊ कशाला?
बाऊ करायचाच असेल तर तो या गोष्टीचा करूया की आपण स्वत:हून हा डाटा का वापरायला देतो फेसबुकला? आपण स्वत:हून आपली माहिती फेसबुकला देतो हे आपल्याला माहीत आहे ना? आजकाल ते फेसबुकवर नवीन अ‍ॅप्स निघालेत बघा. तुम्ही राजकारणात कोण होणार? तुम्ही वीस वर्षांनीकसे दिसाल? इ. इ. आपण हौसेने अशा लिंकवर क्लिक करतो आणि शेअरपण करतो. पण या अ‍ॅप्सना आपण नक्की काय काय परमिशन देतो ते पाहिलं आहे का कधी? त्यांना आपण अगदी ओपनली आपल्या प्रोफाइलचा पूर्ण अ‍ॅक्सेस देत असतो. मग ते आपला डाटा वापरणार नाहीतर काय करणार? हे म्हणजे आपणच चोराला दार उघडून द्यायचे आणि मग त्याने वस्तू नेल्या की म्हणायच्या याने चोरी केली..
तीच गोष्ट मोबाइल अ‍ॅप्सबाबत. आजकाल प्रत्येक मोबाइल अ‍ॅप वापरताना त्याला परमिशन द्याव्या लागतात. त्या आपण किती वेळेला पाहतो. पाहिल्या तरी त्या सगळ्यांना परवानगी देतोच ना? गॅलरी, कॉण्टॅक्ट्स सगळ्यांना आपण अ‍ॅक्सेस देतोच ना? एका अ‍ॅप्लिकेशनला तर रूट परवानगी लागते, म्हणजे स्वत:च्या मोबाइलची अख्खी सिस्टीम बदलायची परवानगी! तरीही ही सर्व अ‍ॅप्स आपण बिनधास्त वापरत असतो आणि वापरत आहोत. त्या अ‍ॅपला ‘आय अ‍ॅग्री’ म्हणत असताना आपण कशा कशाला ‘हो’ म्हणतो ते कधीच माहीत नसते आपल्याला. असं का बरं?
जगात कोणतीही गोष्ट फुकट नसते हे आपल्याला पूर्णपणे माहीत आहे. मग तरीही काहीही पैसे न देता आपण फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इतर अ‍ॅप्स वापरतो. मग आपण पैसे देत नाही म्हणजे दुसऱ्या रु पात आपण काहीतरी किंमत देत असणारच ना? हे आपल्या लक्षात येत नाही का? या कंपन्या काय धर्मादाय संस्था नाहीत. त्यामुळे त्यांना पैसे कमावायचेच आहेत. आजच्या जगात डाटा हा पैशापेक्षा महाग आहे. म्हणून ते आपल्याकडून डाटा घेतात आणि म्हणून व्हॉट्सअ‍ॅप १९ बिलियन डॉलरला विकत घेतले जाते, जरी त्यातून आपल्याला शून्य रु पये मिळत असले तरी!
सांगायचा मुद्दा इतकाच की, हे सगळे आपण स्वत:हून या लोकांना दिले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने गळे काढत बसण्यात काही हाशील नाही. नव्या जगात प्रायव्हसी वगैरे काही उरलेले नाही हे मान्य करू आणि पुढे जाऊन यावर मार्ग काढूया. मग यावर काही लोक म्हणतील की आम्हाला माहीत आहे आमचा डाटा वापरला जातो आणि आम्ही त्याच्या नावाने गळे काढत नाही तर आम्हाला हे काही सांगू नका. तर दोस्त हो, तुमचा तर जास्त मोठा प्रॉब्लेम आहे. तुमच्या नकळत तुमची माहिती कोण तरी वापरत आहे आणि त्याने तुम्हाला काहीच फरक पडत नाही? आपली माहिती नक्की कोणकोणत्या गोष्टीसाठी वापरली जाणार आहे, त्याचे आपल्यावर व समाजावर काय परिणाम होणार आहेत, याची पूर्वकल्पना एक सजग नागरिक म्हणून आपल्याला नको का? उद्या तुमची गाडी कोण ८ दिवसांसाठी मागत असेल तर ती का आणि कुठं वापरली जाणार आहे, हे आपण विचारतो ना? मग आपल्या डाटाबाबत तसंच वागायला नको?
आपली माहिती वापरली जाणार ही रिअ‍ॅलिटी आहे, जी आपण बदलू शकत नाही. आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की ही माहिती नक्की कोण आणि कशासाठी वापरत आहे, याची जाणीव आपल्याला असायला हवी. जॉन हॅवन्स नावाच्या शास्त्रज्ञाने त्यांच्या हॅकिंग हॅपिनेस या पुस्तकात या गोष्टीला ‘कॉन्शस डाटा शेअरिंग’ असं म्हटलं आहे. म्हणजे काय तर, डोके ताळ्यावर ठेऊन स्वत:हून आपली माहिती वापरायची परवानगी देणे आणि त्याही पुढे जाऊन त्या माहितीच्या बदल्यात काहीतरी परतावा मागणे. म्हणजे उद्या फेसबुकने तुमच्या माहितीच्या जिवावर हजार रु पये कमावले तर त्यातले निदान १० रुपये किंवा १० रु पये किमतीची सुविधा तुम्हाला परत मिळायला हवी ना! आज या कंपन्या आपल्या जिवावर कोट्यवधी रु पये कमावतात आणि आपल्याला ठेंगा मिळतो. कारण, एकतर आपल्याला त्याची जाणीव नाही आणि असल्यास आपण निव्वळ त्यांना नावे ठेवण्याशिवाय दुसरे काही करत नाही. किंबहुना रोजच्या १ जीबी डाटाने आपली मती इतकी गुंग झाली आहे की हा रोजचा डाटा वापरण्यासाठी आपण काय काय पणाला लावले आहे हे समजण्याचे भानच आपल्याला उरलेले नाही.
‘डाटा इज न्यू आॅइल’ अशी म्हण आहे. फक्त या आॅइलचा फायदा आपण घ्यायचा, का दुसºयाला घेऊ द्यायचा? ते ठरवायचे आहे...

सोशल मीडिया वापरताना त्यातल्या त्यात धोका कसा कमी करायचा, कशी काळजी घ्यायची.

काय करावं...
* फेसबुकवरच्या सेटिंग्समधील सर्व आॅप्शन एकदा पाहा, त्यातले कमीत कमी आॅप्शन पब्लिक ठेवा.
* ज्या ज्या विजेट्सना प्रोफाइलला जायची परवानगी दिली असेल ती काढून टाका, फक्त आत्यंतिक गरजेच्या विजेट्सना ती परवानगी ठेवा.
* मोबाइलमधील फ्रीवेअर, ब्लॉटवेअर अ‍ॅप काढून टाका.
* आपण भरमसाठ अ‍ॅप्सना सगळ्या परमिशन देत नाही आहोत ना, हे पाहा.
* स्टेप आॅथेंटिकेशन वापरा.

काय करू नये..
* फेसबुकवर मजा म्हणून कोणत्याही गेमवर किंवा विजेटवर क्लिक करू नका. तेच कुठल्या स्टारसारखे दिसता, नि म्हातारे कसे दिसाल, नि कधी मराल टाइप्स.
* व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या ‘हा फॉर्म भरला की ते फुकट’ अशा एकाही लिंकवर क्लिक करू नका व आपली माहिती देऊ नका.
* जीपीएस सतत चालू ठेवू नका.

Web Title: Where is your head?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.