मला नेमकं काय आवडतं?

By admin | Published: May 26, 2016 11:50 PM2016-05-26T23:50:48+5:302016-05-26T23:50:48+5:30

आपल्याला नेमकं काय आवडतं? - हेच कळत नाही!

What do I like? | मला नेमकं काय आवडतं?

मला नेमकं काय आवडतं?

Next
>-डॉ. श्रुती पानसे
(drshrutipanse@gmail.com) 
आपल्याला नेमकं काय आवडतं?
- हेच कळत नाही!
कधी वाटतं, सगळं आवडतं,
कधी वाटतं काहीच आवडत नाही!
हा पेच सोडवायचा कसा?
 
या प्रश्नाचं उत्तर इतरांना विचारून काय उपयोग? तुमचं तुम्हीच शोधा..
कुठे जाऊ?
 
आता पुढच्या महिन्यात कॉलेज अॅडमिशनची धावपळ सुरू होईल. कुठली साइड, कुठला कोर्स याचा खल बराच होतो; पण आपण आपल्या आवडीनुसार, आवडत्या कॉलेजमध्ये विशिष्ट शाखेतच प्रवेश घेतो. इथं शाळेच्या तुलनेत वातावरण मोकळं असतं. त्यामुळे ‘स्वत:चा शोध’ लागू शकतो. शाळेत आपल्याला सर्वच विषयांचा अभ्यास करणं अनिवार्य असतं. कॉलेजमध्ये मात्र अनेक संधी असतात. कॉलेजतर्फे, विविध शाखांतर्फे तज्ज्ञांची व्याख्यानं, कार्यशाळा आयोजित केल्या जातात. यामध्ये शास्त्रज्ञ, उद्योजक, बॅँकिंग क्षेत्र, लेखक-पत्रकार, नेते, अभिनेते असतात. ते आपली कामं, आपल्या क्षेत्रतली आव्हानं, गमती, आनंद समजावून सांगतात. नवेनवे विषय समजून घेण्यासाठी, जगातले नवे विचारप्रवाह जाणून घेण्यासाठी, एखाद्या विषयात सखोल काम करायचं असेल तर अशा कार्यक्र मांचा नक्कीच उपयोग होतो. आपल्याला आपली खरीखुरी आवड ठरवायला या वातावरणाचा उपयोग होतो. त्यात इंटरनेट आहेच मदतीला, त्याच्याही मदतीने आपल्याला काय आवडत नाही आणि काय आवडतं हे आपण सहज ठरवू शकतो. बरीच माहिती जमवू शकतो.
खरं तर करायचं ठरवलं तर किती सोपं आहे हे सारं. पण प्रत्येकाच्याच बाबतीत हे असंच घडत असतं. काही गोष्टी आपल्याला आवडतात आणि काही गोष्टी नाहीच आवडत. कितीही प्रय} केला तरी जे नाही आवडत ते नाहीच आवडतं. हे असं का होत असेल? 
कारण आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे असतो. आपल्या मेंदूची रचना एकसारखी असली तरी प्रत्येकात काही वेगळेपणा हा असतोच. म्हणूनच म्हणतात, व्यक्ती तितक्या प्रकृती. 
थ्री इडियट्स नावाचा सिनेमा पाहिलाय ना?
त्यातल्या तीन मित्रंची घट्ट मैत्री आहे. पण हे तिघंही जण एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत. त्यांच्यातल्या बुद्धिमत्ता पूर्णपणो वेगवेगळ्या आहेत. तसा खरं तर आपल्यापैकी प्रत्येक जण इडियटच असतो. फक्त आपला इडियट सेन्स कशात आहे हे  आपल्याला शोधून काढायचं असतं.
म्हणजे उदाहरण बघा, शाळेत किंवा आजपर्यंत नेहमी पहिल्या पाचात नंबर येतो, किंवा आपल्याला नेहमी ए ग्रेड मिळते याचा अर्थ आपण खूप भारी, खूप हुशार. आपल्याला जगातल्या सगळ्या गोष्टी करता येतील, असं काही मुलं समजतात. 
तर दुसरीकडे, आपल्याला कमी गुण मिळतात, कायम काठावर म्हणून आपण हुशार नाही, आपल्याला काहीच येत नाही असं समजणारे तर भरपूरच जण भेटतात. आपल्याला असं वाटतं की, ज्यांना परीक्षेत खूप चांगले गुण मिळतात, ज्यांचा नेहमी पहिला-दुसरा नंबर ठरलेला असतो, तेच फक्त हुशार!
पण खरं तर तसं काही अजिबात नाही. 
ज्यांचे पहिले-दुसरे नंबर येत नाहीत तेही अत्यंत हुशार असतात. तुम्हाला वाटेल की आपल्याला फसवण्यासाठी किंवा खोटं खोटं बरं वाटण्यासाठी हे सांगितलं जातंय. पण खरंच तसं नाहीये.  
तुम्हाला माहिती आहे, आपला जन्मही झालेला नसतो, तेव्हाच मेंदू तयार होत असतो. त्यावेळी अमुक मेंदूला हुशार करायचं, अमुक मेंदूला हुशार करायचं नाही, असं काही निसर्गानं ठरवलेलं नसतं. निसर्ग आपल्या पद्धतीनं प्रत्येक मेंदू तयार करतो. आणि त्या मेंदूत माहिती भरण्याचं काम आपल्यावर सोडतो. 
आपल्या सर्वांकडे एक चांगला मेंदू असतोच असतो. त्यात आपण काय साठवतो, कसं साठवतो, साठवतो की नुसतंच एका कानानं ऐकून दुस:या कानानं सोडून देतो, जे काही मेंदूत भरलं असेल त्याला आपण सराव देऊन ‘अपडेट’ ठेवतो की नाही, हे सगळं आपल्यावर आणि फक्त आपल्यावरच अवलंबून असतं.
त्यामुळे आपल्याला काय आवडतं हे ओळखायला शिका. आणि त्यानुसारच आपल्या अभ्यासाच्या, करिअरच्या दिशा ठरवा.
आपल्याला काय आवडतं, हे ओळखता येतं का, तर येतंच!
त्यासाठीची एक टेस्ट सोबत पहा..
आणि स्वत:चीच एक झलक पहा!
 
तुम्हाला काय आवडतं?
नवीन नवीन गोष्टी शिकू बघणारा, छान मेंदू निसर्गानं प्रत्येकाला दिलेला असला तरीही प्रत्येक मेंदू वेगवेगळ्या क्षेत्रत आपले गुण दाखवत असतो. 
म्हणजे असं की प्रत्येक मेंदूची आवड आणि  नावड, लाईक आणि डिसलाईक्स वेगवेगळी असतात. 
आपली ही आवड आपल्याला ओळखता येते का?
तर येते. कारण आपला मेंदू वैशिष्टय़पूर्ण असतो. आपल्या मेंदूत डोकावून बघणं आपल्याला शक्य असतं. त्यातून स्वत:च स्वत:ला शोधता येत, स्वत:त डोकावता येतं?
बघायचंय डोकावून? मग या प्रश्नाची उत्तरं शोधा आणि स्वत:लाच खरी खरी द्या.
 
* अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला पटकन जमते आणि जमल्यावर खूप आनंद होतो?
 
* अशी कोणती गोष्ट आहे की, आपल्याला जमावी असं खूप वाटतं, पण त्यासाठी थोडा सराव करावा लागतो.
* आणि असं काय आहे, जे आपण चक्क टाळायला बघतो. हे आपल्याला जमणारच नाही तर कशाला ते करायला जा, असं वाटतं. 
***
 
यातल्या तीनही गोष्टी आपण नेहमी करत असतो, 
हे नक्की !  
याचं कारण आहे आपल्या मेंदूत एक-दोन नव्हे तर आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. हे शोधून काढणा:या  शास्त्रज्ञाचं नाव आहे डॉ. हॉवर्ड गार्डनर. ते म्हणतात की, प्रत्येक माणसाला निसर्गानं विविध प्रकारच्या बुद्धिमत्ता बहाल केलेल्या आहेत. आपली बुद्धिमत्ता नेमकी कोणत्या क्षेत्रत आहे हे आपण शोधायचं असतं. 
हे कसं शोधायचं हे पुढच्या काही लेखांमधून समजून घेऊ. तोवर ही उत्तरं तर द्या स्वत:ला खरीखुरी!
 
(लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.)
 
 
 
 
 
 
 
 

Web Title: What do I like?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.