नाटकात पडायचेच असेल तर; अडाणीपणे जगू नको आणि हौसेने फ्रस्ट्रेट होऊ नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 07:00 AM2019-02-21T07:00:00+5:302019-02-21T07:00:02+5:30

नाटक करू की नको करू? ही भूमिका अशी करू का तशी करू? प्रेक्षक कमी आहेत की जास्त आहेत, लोकप्रियता मिळेल की न मिळेल? बक्षिसे पदरात पडतील की न पडतील? टीव्हीवर मुलाखत होईल का न होईल? ही भूमिका पाहून सिरिअल मिळेल की न मिळेल? या नाटकातून सिनेमात ब्रेक मिळेल का न मिळेल? मोबाइल बंद करू की नको करू? सोशल मीडियावर जाहिरातबाजी करू का नको करू? फेसबुकवर सतत राहू की नको राहू? नाटक करू की इव्हेंट करू? नाटकातून पैसे मिळतील की न मिळतील?

well known theater artist & Director Atul Pethe shares his vision about Drama for new artist! | नाटकात पडायचेच असेल तर; अडाणीपणे जगू नको आणि हौसेने फ्रस्ट्रेट होऊ नको !

नाटकात पडायचेच असेल तर; अडाणीपणे जगू नको आणि हौसेने फ्रस्ट्रेट होऊ नको !

Next
ठळक मुद्दे‘ऊतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको’ या म्हणीसारखी ‘अडाणीपणे जगू नको आणि हौसेने फ्रस्ट्रेट होऊ नको !’ ही नवी म्हण लक्षात ठेवा !

अतुल पेठे

गेली
 अनेक वर्षे अत्यंत गांभीर्याने ‘थिएटर करणारा’ प्रतिभावान रंगकर्मी म्हणून अतुल पेठे यांची ओळख आहे.
मध्यंतरी तरुण रंगकर्मीना सतत पडणार्‍या प्रश्नांची उकल करण्यासाठी अतुल पेठे यांनी काही ‘संवाद’ लिहिले.
उधाणल्या ऊर्मीने ‘थिएटर’ करायचे वेड घेऊन बेभान निघालेल्या तरुण-तरुणींच्या मनाला भुंगे लावणारे काही कळीचे प्रश्न 
आणि त्या प्रश्नांना अतुल पेठे यांनी दिलेली ही उत्तरे. नागपूर येथे होणार्‍या नाटय़संमेलनाच्या निमित्ताने..

***
प्रश्न - मला पूर्णवेळ नाटक करायचे आहे. मी काय आणि कसे करावे?

अतुल - उत्तम. पण माझे हे सांगणे हा ताईचा अथवा दादाचा सल्ला नव्हे. आपण गप्पा मारतो आहोत आणि संवाद करतो आहोत. त्यातून काही मुद्दे हाती लागतील. उपयोगी वाटले तर पाहा. तुला पूर्णवेळ नाटक करायचे आहे. फारच स्वागतार्ह गोष्ट आहे. पण ते तुला का करायचे आहे? 
आवडते म्हणून? 
अतुल -अजून..?
मला नट व्हायचं आहे? 
अतुल -उत्तम ! अजून..?
प्रसिद्ध व्हायचे आहे!
अतुल - हेही छानच! अजून..?
मग सिरिअल, सिनेमाही करायचाय. पैसे कमवायचे आहेत. वेगळे काही करणार्‍यांच्या पाठीशी उभे राहायचे आहे. चांगले नाटय़गृह बांधायचे आहे..
अतुल -अतिशय उत्तम कल्पना आहेत. 
- पण खरे सांगतो, की हे असे सुरुवातीच्या काळात सर्वच बोलतात. मी अनेक वर्षे पाहातोय. काहीच अपवाद सोडपण विजयाबाई.. आमच्या बाई किंवा दुबेजी असं गोडपणे म्हणत त्यांच्या अनेक स्वघोषित शिष्यांनी सुरु वातीचा उमेदीचा काळ सोडला तर नाटके करणे तर सोडाच; पण नाटके पाहिलीदेखील नाहीयेत. माझ्या मते डॉ. श्रीराम लागू यांच्या नंतर आस्थेने आणि आदराने नाटक करणारा नटच नाही. असा एक माणूस ठाम उभा राहिला तर नाटकाचा सारा चेहरामोहरा पालटतो. नाटय़ अवकाश सुसंस्कृत होते ! नाटक नावाच्या माध्यमाला डिग्नीटी म्हणजे  आब प्राप्त होतो. तर हा मार्ग प्रयोगशील रंगभूमी करून सिरिअल - सिनेमात डुंबलेल्या अनेक लोकांनी विसरलेला आहे. 
प्रश्न - तुम्ही सिरियल, सिनेमाच्या विरु द्ध आहात का?
अतुल - बिलकुल नाही. सिनेमा तर विलक्षण मोठे माध्यम आहे. श्रेष्ठ कला आहे ती ! तिची उपासना करणे फार फार अवघड काम आहे. त्यात नवे प्रयोग करायला बुद्धी आणि निष्ठा लागते. सिनेमा दिग्दर्शकाला तितक्याच ऊर्जेने नाटक करणे शक्यच होत नाही. पण नटाला एकवेळ शक्य आहे. परत डॉ. लागू हे उत्तम उदाहरण आहे. 
आता सिरिअलविषयी ! मुळात मला आजपावेतो असा एकही लेखक, नट, तंत्नज्ञ वा दिग्दर्शक भेटला नाही की ज्याने स्वतर्‍च्या सिरिअल करण्याविषयी आनंद अथवा समाधान व्यक्त केलेय. पैसे आणि रातोरात प्रसिद्धी मिळूनही हे असुखी ! असे का? तुम्ही ते काम निवडले आहे ना ? ते तुम्ही प्रेमाने आणि निष्ठेने का करत नाही? भले ती नोकरी असेल ! पण तन्मयतेने बुद्धी आणि प्रतिभा लावून करा नं ! तिथे प्रयोगशील नवे का निर्माण करता येऊ नये ? सारख्या खोटय़ा तक्र ारी का? खरे तर कुठलेही क्षेत्न आव्हानात्मक असते. आता सारखे पैसे पैसे का करता? ज्या कोणी आधी कलेची साधना समर्पित वृत्तीने केली त्यांना पोटे नव्हती ? त्यांना सुखाची आस नव्हती ? अनेक लोकांनी नोकर्‍या केल्या आणि व्यवसायही केले. काही वेळा काही गोष्टींना विचारपूर्वक नकार दिला. कळ सोसली. गरिबीत रहावे असे मला आणि कोणालाच वाटत नाही. पण त्या करता आपला मूळचा झरा आटता कामा नये. अजून एक सांगू? राग मानू नकोस. नाहीतर आजकाल सर्वाचे मन दुखावलेले असते.
प्रश्न - मला खोटे गोड गोड बोलण्याची, लिहिण्याची आणि ऐकण्याची सवय जडलीय. मोबाइलवर ईमोजी पाठविले की काम होते.
अतुल - धन्यवाद. मला मनापासून असे वाटते की तू रियाझ कर, तालीम कर आणि तपश्चर्या कर.  कदाचित हे भाबडेपणाचे आणि मूर्खही वाटेल; पण आनंद आणि शोध घेत काम कर. तुमचे काम पाहणारे अनेक लोक असतात. ते काम पाहून लोक तुला बोलावतील. तिथे तुझ्या ताकदीने तू अधिक कामात तुझ्याही न कळत डुंबू लागशील आणि मग तुला कळणारही नाही की तू पूर्णवेळ नाटकवाला कसा झालास, किंवा झालीस! असे होते किंवा असेच होत असते यावर माझा विश्वास आहे. आपण प्रत्येक पातळीवर सजग आणि सतर्क मात्न राहायला हवे. प्रत्येक टप्प्यावरचे कष्ट करायला हवेत. वाचणे, पहाणे, ऐकणे आणि अनुभवणे आवश्यक आहे. त्याला पर्याय असतील तर क्षमा कर; पण ते मला माहीत नाहीत.
‘ऊतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको’ या म्हणीसारखी ‘अडाणीपणे जगू नको आणि हौसेने  फ्रस्ट्रेट होऊ नको !’ ही नवी म्हण लक्षात ठेव.
तर तुझ्या प्रवासाला खूप खूप सदिच्छा !
*****
प्रश्न - अभिनेता/नट (यात अभिनेत्री  आणि नटय़ाही आल्या) स्वत: वर काम करावं म्हणजे नेमकं काय करायचं?

1) शरीर सक्षम करण्यासाठी - 
* ताकदीचे व्यायाम- जोर, बैठका, वजन उचलणे इ.
* श्वसन व्यायाम - चालणे, पळणे, टेकडी, पोहणे, सायकलिंग इ.
* लवचिकतेचे व्यायाम - नृत्य, योग, एरोबिक्स इ. 
* योग्य पुरेसा नियंत्रित आहार.

2) बुद्धी सक्षम करण्यासाठी - 
* स्वभाषा आणि इतर भाषांतील वाचन. पेपर ते ग्रंथ सारे काही.
* उत्सुकतेने पहाणे (यात विविध कला, विद्याक्षेत्ने आली)
* ऐकणे
* अनुभवणे
* करून पहाणे - रियाज आणि प्रयोग दोन्ही
* बुद्धिमान सर्जनशील आणि तुमचे थेट परिशीलन करणार्‍या व्यक्तींचा सहवास

3) मन सक्षम करण्यासाठी -
* स्वतर्‍ विचार करून योग्य अयोग्य ठरवणे.
* स्वतर्‍तील दोष समजावून ते प्रयत्नपूर्वक दूर करणे.
* स्वतर्‍विषयीचे भ्रम दूर करणे.
* आपल्या व्यवसायाविषयी भ्रम न बाळगणे.
* पाय जमिनीवर राखण्याकरता स्वतर्‍च प्रयत्न करणे.
* आपण करत असलेल्या कृतीतून आनंद आणि समृद्ध मजा यायला हवी.

 करके देखो !  हे महात्मा गांधींचे विधान मला महत्त्वाचे वाटते.
***
प्रश्न -  माझ्या ऐकण्यात कायम एक शब्द येतो, फोकस. याचा नेमका अर्थ काय?


नटाला फोकस हवा म्हणजे काय? तो कसा मिळवायचा ? 
अतुल र्‍ फोकस म्हणजे एकलक्ष्य, एककेंद्र, एकाग्र किंवा एकतानता ! हे साधताना मुख्यत्वे दोन अडथळे येतात. बाहेरच्या जगाचा कोलाहल आणि आतल्या जगाचा गोंधळ ! बाहेरच्या जगाचे दबाव, लोभ, आकर्षणे, मोह सतत खुणावत असतात तर आतल्या जगात या सार्‍याविषयी संभ्रम! 
या आतबाहेरच्या जगात आपले मन सतत सैरभैर होत असते.  इकडून तिकडे आणि वाटेल तिकडे  उडय़ा मारत असते. मनाचा तो स्वभावच आहे. श्रेष्ठ कवयित्नी बहिणाबाई चौधरींनी म्हटल्याप्रमाणे मन हे उंडारलेल्या वासराप्रमाणे आहे. पण आपण जर ठरवले तर या वासराला कासरा घालता येतो. 
वस्तुतर्‍ अनेक लोकांना व्यायामाचा कंटाळा असतो. शरीराला व्यायाम नकोच वाटतो. पण व्यायामात आनंद किती आहे हे जर कळले, तर शरीराला व्यायाम हवासा वाटू लागतो, त्याक्षणी व्यायामाचा कंटाळा जातो. आपल्याला व्यायाम हवा की नको गोंधळ तिथे नसतोच. पळताना पावले झपझप पडतात आणि आपल्या आजूबाजूची सृष्टी सतत बदलत राहते याची मोठी मौज वाटू लागते. त्यावेळी पळू की नको पळू, असा हॅम्लेटी विचार अनुपस्थित असतो. आता हाच न्याय मनाला लावता येतो. 
कलाकाराचे मन शांत आणि स्थिर असायला हवे. दिवसभर कदाचित हे असणार नाही; पण दिवसाच्या काही वेळात अथवा काही क्षणात ते राहावे, असा प्रयत्न मात्न नक्की करता येईल. मन सतत सैरभैर असेल तर सतत अडखळल्यासारखे होते. नटापुरते बोलायचे झाले तर प्रयोग करताना एकतानता कशी मिळवायची याचा रियाज ज्याचा त्याने करायचा आहे.
1) सर्वप्रथम म्हणजे आपल्याला आपण करत असलेले नाटक स्वतर्‍ला आवडलेले आहे आणि आपली भूमिका ही मनापासून पटलेली आहे म्हणून आपण काम करीत आहोत, हे विसरता कामा नये. 
2) नाटकाच्या तालमीमध्ये नाटकाविषयी आणि भूमिकेविषयी घमासान चर्चा झालेल्या असतील आणि भूमिका साकारण्याच्या अनेक शक्यता पडताळून पाहिल्या असतील तर प्रत्यक्ष प्रयोगांमध्ये मानसिक द्वंद्व उभे राहात नाही. 
3 ) तालमींमध्येच विचारांती भूमिका घडवत नेलेली असली तर प्रत्यक्ष प्रयोग करताना मनामध्ये विश्वास आणि आत्मविश्वास आपोआप तयार होतो.
4) भूमिका साकारताना शब्दोच्चार योग्य वजनांनी होऊ लागतात आणि हालचाली सुरात होऊ लागतात. 
5) काही वेळ नुसते डोळे मिटून श्वासाकडे लक्ष दिले तरी बराच उपयोग होतो.
6) वाचन, व्यायाम, पुरेशी झोप, योग्य आहार, संगीत ऐकणे वगैरे अनेक गोष्टी असतात, ज्यामधून आपण स्वसंवाद करू शकतो.

अशा वेळेस मन आपोआप शांत आणि स्थिर होते. नाटक करू की नको करू, ही भूमिका अशी करू का तशी करू, प्रेक्षक कमी आहेत की जास्त आहेत, लोकप्रियता मिळेल की न मिळेल, बक्षिसे पदरात पडतील की न पडतील, टीव्हीवर मुलाखत होईल का न होईल, ही भूमिका पाहून सिरिअल मिळेल की न मिळेल, या नाटकातून सिनेमात ब्रेक मिळेल का न मिळेल, मोबाइल बंद करू की नको करू, सोशल मीडियावर जाहिरातबाजी करू का नको करू, फेसबुकवर सतत राहू की नको राहू, नाटक करू की इव्हेंट करू, नाटकातून पैसे मिळतील की न मिळतील असली अनेक अनाठायी द्वंद्व उभी राहात नाहीत.
थोडक्यात काय तर सतत बाहेर लक्ष असण्यापेक्षा आपल्या आत स्वतर्‍वर लक्ष असणे म्हणजे फोकस.
संगीतश्रेष्ठ कुमार गंधर्व यांची एक गोष्ट सांगून मी हा मुद्दा थांबवतो. 
कुमारजींच्या एका मैफलीला अपेक्षेपेक्षा कमी श्रोते हजर होते. आयोजकाने घाबरत येऊन कुमारजींना मैफल रद्द करण्याविषयी विचारले. तेव्हा कुमारजी आयोजकाला म्हणाले, देखो भय्या, हम अंदर देखके गाते है बाहर देखके नही।
तेव्हा प्रथम सूर साधे .
***

प्रश्न - नाटकवाल्यांकरता विविध स्पर्धा असतात. त्यात किती अडकून पडावे? 
नाटय़ स्पर्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा ?
 

मी सुरु वातीला हे स्पष्ट करतो की, मी कुठल्याही नाटय़ स्पर्धेत भाग घेण्याच्या विरुद्ध नाही; पण आयुष्यभर नाटय़ स्पर्धेतच अडकून पडण्याचा मात्न विरु द्ध आहे. स्पर्धेत जरूर भाग घ्यावा. जोमाने आणि उत्साहाने तयारी करून एकांकिका/ नाटक करावे. बक्षीस मिळाले तर आनंद मानावा आणि बक्षीस नाही मिळाले तर फार काळ दुर्‍ख करून घेऊ नये. कुठल्याही नाटकवाल्यांच्या आयुष्यात पहिल्या टप्प्यावर आपल्याकडे नाटय़ स्पर्धा येतातच. आंतरशालेय, आंतरमहाविद्यालयीन आणि राज्य नाटय़ स्पर्धा असा तो आलेख असतो. या एका अर्थी पायर्‍याच आहेत. (अर्थात या पायर्‍या न चढलेलेही काही नाटकवाले आहेतच.) 
कुठल्याही स्पर्धेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन निकोप असेल तर स्पर्धेत भाग घेण्याचे पर्यावसान आनंदात आणि शिक्षणात होते. स्पर्धेत भाग घेऊन बक्षीस मिळवणे म्हणजे आयुष्याची इतिकर्तव्यता झाली असे कुठलाही सृजनशील कलावंत मानणार नाही. बक्षीस मिळाले तर त्याचा आत्मविश्वास नक्कीच दुणावेल; पण नाही मिळाले तर सृजनशील खचूनही नक्कीच जाणार नाही. (किंवा खचता कामा नये.)
खरी कसोटी ही बक्षीस न मिळणार्‍यांची असते. बक्षीस मिळाले तर बक्षीसपात्न माणसाला आपसूकच उत्साह येतो; पण नाही मिळाले तर निराशा पदरी पडते. बक्षीस, मानसन्मान, पारितोषिके वगैरे न मिळताही आपण आपल्या आवडीचे काम निष्ठेने करत राहणे ही परीक्षा असते. (नाकारले गेलेले असतानाही असे काम करणार्‍या व्यक्तीला आयुष्यात कुठल्या ना कुठल्यातरी स्वरूपात केलेल्या कामाचे बक्षीस मिळत असते. अर्थात हे आयुष्याच्या एका टप्प्यानंतर कळते.) 
खूप बक्षिसे मिळवूनही काहीही भरीव कामे न केलेली माणसेपण असतातच. कधी कधी असेही दृष्टिपथास येते की, सुरुवातीच्या महाविद्यालयीन काळात बक्षीस मिळालेले अनेक लोक पुढे प्रगतीच करत नाहीत. जुन्या बक्षिसांच्या आणि जुन्या नाटकांच्या रम्य आठवणीवर वर्तमानात काही जण जगत असतात. घरामध्ये शोकेस करून जुन्या बक्षिसांची चळत ठेवून त्याविषयीच्या रम्य आठवणी इतरांना सतत सांगत राहणे हा आजारच आहे. बक्षीस मिळवण्याचे तंत्नही काहींना अवगत असू शकते. जिद्द, ईर्षा आणि महत्त्वाकांक्षा या एका मर्यादेत उपयुक्त असतात; पण त्याच्या आहारी जाऊन आपले स्वभान हरपेल इतपत जाऊ नये. त्यातही आयुष्याच्या अजून एका टप्प्यावर आणखी एक गोष्ट कळते की कधी आपल्याला बक्षीस मिळते, कधी दुसर्‍याला ! याबाबतची सुजाण समज आपल्याला लवकर येईल तेवढे बरे ! 
तर मुद्दा असा, की या बक्षिसांचे फार काही मनावर घेऊ नये. ज्याला नाटक करत राहायचे आहे त्याने ते आपल्या आनंदात  करत राहावे. आपल्या नाटकात काही अर्थ असेल तर, अभंग नदीत तरले तसे नाटकही तरेल. आपला दृढ विश्वास आपल्या कामावरच हवा. 
या प्रवासात सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला स्वतर्‍ला आपल्या कायमचे मूल्यमापन करता आले पाहिजे. त्याकरता प्रामाणिकपणा आणि नम्रता हवी. हिमालयाची उंची माहीत असेल तर आपले नाटक हे  दिवाळीतला किल्ला  आहे की  हनुमान टेकडी आहे की कळसूबाईचे शिखर आहे हे निश्चित कळेल.
ज्यांना सातत्याने नाटक करायचे आहे त्यांना नित्यनूतन राहावे लागते. वाचावे लागते, पहावे लागते, लिहावे लागते आणि  प्रत्यक्ष नाटक करून बघावे लागते. नाटक करण्यापूर्वी, नाटक करताना आणि नाटक झाल्यावर अनेक दृष्टांत आपलेच आपल्याला होतात. कौतुक, टीका आणि दुर्लक्षही होते. अनेक अपमान होतात. अपघात होतात. क्षमा करावी लागते आणि  मागावीही लागते. काहीवेळा सन्मान सहज मिळतात तर काहीवेळा डोळ्यासमोरून निसटून जातात. हजारो माणसे भेटतात. प्रत्येकाची मानसिकता वेगवेगळी असते. राग, लोभ, रु सवे-फुगवे, मत्सर, द्वेष, बोलाचाली, बाचाबाची होते. नाटक सोडून द्यावे असेही वाटते. सिरिअल-सिनेमाची वाट धरावी, असेही मनात येते. आपली छळवणूक करून घेत आहोत असेही वाटते. हे सारे सारे या प्रवासात होते. 
- तेव्हा एका टप्प्यानंतर स्पर्धा, बक्षिसे आणि सन्मान गोष्टी छोटय़ा होतात. त्या अचिव्हमेंटच्या लिस्टमध्ये जातात. अचिव्हमेंट  आणि  वर्क  यात फरक आहे. अचिव्हमेंटपेक्षा  वर्क मध्ये  आपला शोध  महत्त्वाचा असतो. त्या शोधातून शास्र आणि मूल्य मिळते. ते महत्त्वाचे ! शेवटर्पयत टिकून राहिलो तर अंतिमतर्‍ असे व्यापक शहाणपण येते. 
सर्व पर्याय आपल्यासमोर असतात आणि निवड करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला असते हे विसरू नये.
 

Web Title: well known theater artist & Director Atul Pethe shares his vision about Drama for new artist!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.