Wattsuru ... where I learned to live there. | वाटसरू...जिथं गेलो तिथं जगायला शिकलो..

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात बालाघाट डोंगररांगांच्या पायथ्याशी वसलेले देवठाणा हे माझं गाव. गावात पहिंली ते चौथीपर्यंतची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. तिथंच माझं तिसरीपर्यंत शिक्षण झालं. आजोबांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. त्यामुळे लहानपणीच मला तुकाराम महाराजांच्या अभंगांची ओळख झाली. मी कीर्तनकार व्हावं ही त्यांची इच्छा होती. मात्र वडिलांवर डाव्या विचारांचा प्रभाव आणि त्यांना शिक्षणाची विशेष आवड असल्यानं माझी रवानगी तिसरीनंतर अंबाजोगाईला झाली. हे माझं पहिलं स्थलांतर. योगेश्वरी नूतन विद्यालयात मी चौथीला प्रवेश घेतला. अंबाजोगाई माझ्या गावापेक्षा मोठं, मात्र तसं छोटंसंच शहर होतं.
नवीन नवीन मी घाबरून गेलो. मात्र लवकरच मी इथल्या शहरी वातावरणात एकरूप झालो. शाळेत मी हुशार विद्यार्थी होतो. मला आठवतंय चौथीचा निकाल लागला आणि मी शाळेत दुसरा आलो तेव्हा मी राहत असलेल्या वसतिगृहातले संभाजी लांडे सर मला खांद्यावर घेऊन नाचले होते. ती प्रेरणा आजही मी माझ्या मनात जिवंत ठेवली आहे. आठवीत असताना त्यावेळेस आम्हाला इतिहासाला कराड सर होते. ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम करत होते. त्यांचा माझा व्यक्तिमत्त्वावर विशेष प्रभाव पडला तो आजही कायम आहे.
नववीत मला नवोदय विद्यालय, गढी (ता. गेवराई, जि. बीड) येथे प्रवेश मिळाला. हे झालं माझं दुसरं स्थलांतर. बारावीपर्यंत माझं शिक्षण तिथंच. आम्हाला दहावीला गणिताला विनोद सर होते. त्यांच्यामुळे मला गणिताची प्रचंड आवड निर्माण झाली. बारावीनंतर अभियांत्रिकी सीईटीच्या तयारीसाठी एक वर्ष लातूरला गेलो. येथे नरहरे सरांचं विशेष मार्गदर्शन मिळालं.
मला पुण्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अर्थात सी.ओ.ई.पी.त प्रवेश मिळाला. मी पुण्यात आलो. तिथून जवळच आळंदी आणि देहू होते. या गावांशी माझी भावनिक जवळीक होती. पुण्यातील दहीहंडीचा, गणपती उत्सवाचा मनसोक्त आनंद लुटला. जवळचे किल्ले पाहिले. मात्र पुण्यात आल्यावर प्रथमच मराठवाड्याचं मागासलेपण जाणवलं. लक्षात येत गेलं. पुढे पदवी पूर्ण झाली आणि माझी निवड महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात माझी नियुक्ती झाली. मी पुन्हा स्थलांतर केलं. तुळजापूर व परंडा तालुक्यात असताना विद्युत रोहित्र दुरु स्ती, नवीन वीज जोडणी यामुळे शेतकºयांच्या नेहमी संपर्कात आलो. शासकीय अधिकारी म्हणून काम करताना मी माझ्यातला शेतकºयाचा मुलगा कायम जिवंत ठेवला.
दरम्यान माझी एम.पी.एस.सी. मार्फत सहायक अभियंता म्हणून राज्य शासनात निवड झाली.
आता मी पाचव्यांदा स्थलांतर करत अकोला मुख्यालयी रु जू झालो. प्रथमच मला विदर्भ पाहायला, अनुभवायला मिळाला. इथली माणसं प्रेमळ, कष्टाळू व प्रामाणिक आहेत. वºहाडी भाषा बोलण्याचा प्रयत्न आता मी करतोय.
स्थानिक भाषा, परंपरा, रीती, परिस्थिती समजून घेतली की आपल्या वाट्याला उपरेपणा येत नाही हा माझा अनुभव आहे.
चौथीत घर सोडून स्थलांतर केलेला दिवस मला आजही आठवतोय. घरची संस्काराची शिदोरी सोबत घेऊन एक वाटसरू बनून निश्चित ध्येय पूर्ण करण्याचा प्रवास आजही सुरूच आहे. आज शासनात चांगल्या अधिकारी पदावर कार्यरत आहे. आई- वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं याचा आनंद मनाशी घेऊन प्रवास सुरू आहे..

- अजित सुदासराव सोळंके, सहायक अभियंता, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन.
रा. देवठाणा, ता. धारूर, जि. बीड