काही हवंय? मग रेन्ट कर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 03:13 PM2019-01-10T15:13:50+5:302019-01-10T15:14:11+5:30

एखादी गोष्ट भाडय़ानं आणलीये, रेन्ट केली, उसनवार आणली, असं तरुण मुलं सहज सांगतात. ना लपवाछपवी, ना संकोच. ते कसं?

Want something? Then make a rent! | काही हवंय? मग रेन्ट कर!

काही हवंय? मग रेन्ट कर!

Next
ठळक मुद्देरेन्ट केलं? उसनं आणलं? -चालतंय!

जनरेशन रेन्ट.
असं पूर्वी कोणत्या पिढीला म्हणता आलं असतं का?
भाडय़ाच्या घरात राहाणं ही एक मनात रुखरुख असायची. ऐन पंचविशीत स्वतर्‍चं घर बांधलं, चारचाकी गाडी आली यात एक सेन्स ऑफ अचिव्हमेन्ट, आत्मविश्वासही असायचा. आजही असतो. मात्र काळाचा बदल असा की अमुकच एका शहरात कायमचं राहणार असं आता तरुण पिढीला वाटत नाही. कारण नोकरी बदलते, नोकरीच्या जागा बदलतात, राज्य-देश बदलतात. मग एका शहरात घर घेणं आणि त्यापायी डोक्यावर भलमोठं कर्ज घेत हप्ते भरत राहाणं हे अत्यंत मानसिक दबावाचं होतं. याशिवाय काहींना असंही वाटतं की कर्ज घेतलं की हप्ते भरण्यापायी आपण आपलं नोकरी करण्या-सोडण्याचं स्वातंत्र्य गमावतो. त्यापेक्षा हप्त्यापेक्षा कमी पैशात जर उत्तम घर भाडय़ानं मिळत असेल तर ते घेतलेलं बरं असाही एक दृष्टिकोन असतो.
मात्र या बाजूला छेद देणारीही एक दुसरी बाजू आहे.
हौसेनं काही कुणी भाडय़ाच्या घरात राहात नाहीत, तर घरांच्या किमती इतक्या वाढल्या आहेत की त्यापायी सगळा पगार हप्त्यात जातो. डाउनपेमेन्ट करायला पैसे नाहीत म्हणूनही घर घेणं अनेकजण टाळतात. 
दोन्ही बाजू प्रसंगी खर्‍या वाटत असल्या तरी ‘रेन्ट‘ करणं म्हणजेच भाडय़ानं अनेक गोष्टी घेणं यात काहीही कमीपणा न वाटण्याचा हा काळ आहे. घर घेणं तर मोठी गोष्ट झाली मात्र कॉलेजात जाणारे आता सर्रास कपडे भाडय़ानं आणतात, लग्नात अनेकजणी दुल्हनसेट, घागरे भाडय़ानं घेतात. तेवढय़ापुरतं वापरायचं नि परत करायचं असा हा अ‍ॅटिटय़ूड आहे.
यामागची मानसिकता अशी की, पैसे नाहीत म्हणून मन मारायचं नाही.  आपल्याकडे पैसे येतील मग आपण हौसमौज करू या भावनेनं अनेकजण सगळं तारुण्य घालवतात. आणि मग हाती पैसे आले तर वय गेलं आता काय करणार म्हणून झुरत बसतात. हे सारं मागच्या पिढीचं लक्षण होतं, आता मात्र आज आत्ता हवं या अ‍ॅटिटय़ूडनं जगणार्‍या अनेकांना हे भाडय़ानं आणून उपभोगून घेणं जास्त महत्त्वाचं वाटतं आहे.


रेन्ट केलं? उसनं आणलं?
-चालतंय!

1. भाडय़ानं घेणं म्हणजे कुणाची तरी वापरलेली वस्तू वापरणं हा समज मागे पडलेला दिसतो.
2. ऑनलाइन पोर्टल्स, ग्रुप्स आता अनेक वस्तू भाडय़ानं देतात, त्यातल्या आपल्याला हव्या त्या प्रसंगानुरूप भाडय़ानं घेता येतात.
3. भाडय़ानं आणणं म्हणजे आपण गरीब, आपली ऐपत नाही असा मेलोड्रामाही ही तरुण मुलं करत नाहीत.
4. आपण रेन्ट केलेलं आहे, हे ही मित्रांपासून, जगापासून लपवून ठेवत नाहीत.
5. ज्यांना रेन्टही करता येत नाही, ते सरळ मित्रमैत्रिणींचं वापरायला आणतात. त्याला बॉरो करणं असं सहज म्हणतात. बॉरो करणं याविषयीही काही फार संकोच उरलेला नाही.
6. रेन्ट आणि बॉरो या दोन गोष्टी नवीन जगण्यात मानानं परतल्या आहेत, त्या टिकतील-वाढतील का, हे मात्र काळच ठरवेल!

Web Title: Want something? Then make a rent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.