ट्रेक इट GREEN

By admin | Published: November 17, 2016 05:07 PM2016-11-17T17:07:43+5:302016-11-17T17:07:43+5:30

हिवाळी ट्रेक आता सुरू होतील, पण ते करताना आपल्या पावलांना निसर्गाचा लळा लावता येईल का?

Trek It Green | ट्रेक इट GREEN

ट्रेक इट GREEN

Next
- आनंद पेंढारकर


क्या मौसम है.. ऐ दिवाने दिल.. चल कहीं दूर निकल जाए...
हे किशोर कुमारचं गाणं. हिवाळ्याचा गारवा जाणवू लागला आहे आणि आता ट्रेकर्सना जास्तच हुरुप येईल. वाटेलच सारखं की, चल कहीं दूर निकल जाए...
टेकड्या, कडे आणि किल्ले गाठण्याची लगबग सुरू झाली असेल आणि मित्रांबरोबर डोंगरात भटकंतीचे बेत आखले जात असतील. वाटतं मस्त हरवून जावं त्या गारठलेल्या वाटांवर. पण तसं हरवतानाही थोडं भान जाग ठेवलं ना तर हिवाळ्यातली ही भटकंती मनाला इतका आनंद देते की एका ट्रेकचा, ट्रेलचा आनंदही खूप दिवस पुरतो.
त्यासाठी आपल्या पावलांना जरा निसर्गाचा लळा लावावा लागेल. 
तुम्ही म्हणाल असं काय, जी माणसं ट्रेकला जातात, डोंगरात फिरायला जातात त्यांना निसर्गाचा लळा असतोच. म्हणून तर ती जातातच ना. पण ते हिंदीत म्हणतात ना, ख्याल करना एक बात, ख्याल रखना अलग बात होती है..
आपल्याला आपल्या निसर्गाचा असा ख्याल रखना कॅटेगरीतला लळा लावून घ्यावा लागेल. 
सगळेच ट्रेकर्स हे लक्षात घेत नाहीत. आपण निसर्गात भ्रमंती करत आहोत आणि हा निसर्ग विविध जीवजंतूचा अधिवास आहे. म्हणजे चक्क आपण त्यांच्या घरात वावरतोय. राहतोय. त्यांचंच पाणी पितोय. आणि तिथंच निवास करतोय. तिथंच विष्ठाही टाकतोय. घाण करतोय. प्लॅस्टिक टाकतोय. आरडाओरडा करतोय. आणि क्वचित आग पण लावतोय. तंबू ठोकून खड्डे करतोय. त्यांचं कुरण जाळून टाकतोय, सपाट करतोय किंवा उपटून टाकतोय. अनेक बिळांवरची दगडं उचलून खुशाल फेकून देतोय. तसंच कधी कधी दगडं मारून किंवा आपले शहरी स्प्रे मारून त्यांना नष्टही करून टाकतो आहोत.
आता कल्पना करा, आपण कुणाच्या घरात पाहुणे म्हणून गेलो. त्यांचं घर सुंदर आहे म्हणून स्वत:हून ते पहायला गेलो. आणि तिथं असं वागलो तर चालेल का?
जिथं जाणार त्यांचे नियम, सभ्यतेचे नियम आणि माणुसकीचे नियमही किमान पाळायला हवेत ना. आपल्या समाजात चालेल का कुणाच्या घरी जाऊन कचरा टाकलेला, पसारा केलेला किंवा विष्ठा टाकलेली, घरच पेटवून देणं, पिण्याच्या पाण्यात साबण, पिशव्या, टिश्यू पेपर, काचेच्या बाटल्या टाकून निघून येणं..
चालेल का असं?
नाही ना..
मग निसर्गात आपण असं कसं वागू शकतो. प्राणी-पक्षी जे पाणी पितात तिथं घाण कशी करू शकतो.
नाही ना?
मग काही बदल आपल्या भ्रमंतीतही करता येऊ शकतील. ते केले तर आपली ही भ्रमंती जास्त ग्रीन होऊ शकेल. जास्त आनंदही देऊ शकेल.
निसर्गाचा लळा लागेल आपल्या पावलांना तो वेगळाच!!
त्या लळ्यासाठी हाताशी असाव्यात म्हणून या काही गोष्टी..
जमल्यास तुमच्या भ्रमंतीत नक्की करा...


कपडे कुठल्या रंगाचे घालाल?

तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला? ट्रेकला जाताना कसले फॅशनेबल प्रश्न विचारताय? जो येईल रंग हाताशी तो घालू. सुटी, मज्जा, ट्रेक म्हणून मस्त व्हायब्रण्ट कपडे घालू.
चुकतं अनेकदा इथंच. 
आपण निसर्गाचे रंग घालतच नाही ट्रेकला जाताना.
ते घाला. म्हणजे काय तर ग्रे-हिरवा-ब्राऊन अशा रंगांचे कॉटनचे कपडे घाला. निसर्गात हे रंग दिसतात पहा. करडा, तपकिरी, तांबूस, हिरव्याच्या तर अनंत छटा. या रंगाचे कॉटनचे कपडे घाला. लालेलाल भडक, पिवळे, काळे किंवा नारंगी रंगाचे कपडे शक्यतो घालू नका. असे ब्राइट रंगाचे कपडे म्हणजे खरं तर हे ब्राइट कलरचे भडक कपडे पाहून जीवजंतू बिचकू शकतात. काही प्राणी बिचकून उधळू शकतात. चमकीले, भडक, कृत्रिम रंग निसर्गाला बाधक ठरू शकतात. साधे नैसर्गिक रंग असतील तर नैसर्गिक वातावरणात त्यानं कमी बाधा येते. कॉटनचे कपडे सिंथेटिक कपड्यांइतके गरमही होत नाहीत. त्यामुळे गरम होण्याचाही प्रश्न नाही. मुख्य म्हणजे परफ्यूम लावून, फुलांचे म्हणवणारे डिओडरण्ट वापरून ट्रेकला जाऊ नका. त्या उग्र वासांमुळे मधमाशा, गांधीलमाशा, काही किटक आणि माकडं तुमच्याकडे येऊ शकतात.


ट्रेकला जाताय? मग गाडी कशाला?

प्रश्न साधा आहे. ट्रेकला जात आहात ना मग गाड्या घेऊन सुसाट कसं निघता? त्यापेक्षा सायकलनं जा, किंवा सरळ बसने, ट्रेनने जा. शेअर रिक्षा करा. गाडी न्यायचीच असेल तर कुणा एकाचीच न्या. एक नियम करा शक्यतो, मोटारसायकली घेऊन ट्रेकला जायचं नाही. मोटारसायकल बंदच करा. आणि मोठ्या गाड्या एसयूव्ही टाइप्स गाड्या घेऊन ट्रेकला जायचं नाही. यानिमित्तानं जरा तरी प्रदूषण कमी करू आपण. गाडीऐवजी सगळ्यांसोबत जाऊ. माणसांनाही भेटू. सगळ्यात चांगलं म्हणजे शक्य असेल तर सायकलिंग करत जा. त्यानं एक मोठी भ्रमंती तर होईलच. पण प्रदूषण कमी, निसर्गाला त्रास कमी. आणि व्यायाम होईल तो वेगळाच.

ट्रेकला जाताय की फोटो काढायला?

आवडणार नाही, हा प्रश्न अनेकांना. पण तरी उत्तर देऊन पहा. आपण ट्रेकला जातोय की फोटो काढायला. आणि हातात हवेत कशाला ते मोबाइल्स आणि नोटपॅड? जीपीएससह? म्हणजे साऱ्या जगाला कशाला कळवायला हवं की मी अमुक ठिकाणी आहे? त्यात दिसेल त्या फुलाचा, पानाचा, झाडाचा, पक्ष्याचा, फुलपाखरांचा, सापांचा, बेडकांचा आणि अन्य प्राण्यांचा एकूणएक फोटो काढायलाच हवा का? ट्रेकला जाताना अनेकजण हेच करतात, दिसेल त्याचा फोटो आधाशासारखा काढत सुटतात. 
नुस्तं जगाला दाखवायला, लाइक पुरते हे फोटो काढू नका...

आणि फोटो काढणारच असाल तर?

फोटो उत्तम काढत असाल, फोटोग्राफीची हौस असेल, माया असेल झाडफुलांवर, किल्ल्यांवर तर मात्र एक गोष्ट आवर्जून करा. आपल्याकडे गडकिल्ले, तिथले प्राणी-पक्षी, भवताल, किटक, फुलपाखरं, झाडवेली यांचं फारसं डॉक्युमेण्टशन झालेलं नाही. माथेरान, महाबळेश्वर, रायगड, जयगड सोडले तर अशी फार माहिती मिळत नाही. डॉक्युमेण्टशन फार महत्त्वाचं आहे. ते केलं तर आपल्याकडचं वाइल्डलाइफ, पर्यावरण वाचवायला त्याची मोठी मदत होईल. त्या प्रेमापोटी फोटोग्राफी आणि डॉक्युमेण्टशन ज्यांना जमेल त्यांनी नक्की करा.

जेवणाची पाकिटं कशाला?

आता याचा ट्रेकशी काय संबंध? संबंध आहे, तुमच्याकडे पैसे असतील तर जे जे स्थानिक लोक, आदिवासी लहानगी मुलं फळं, भाज्या विकत असतात त्यांच्याकडून ते सारं जमल्यास घ्या. पॅक करून नेलेलं, बाहेरचं अन्न तिथं जाऊन खाऊ नये. त्यानं प्लॅस्टिक वाढतं. एक वेफर्सचं पाकीटही फेकणं हे चूकच. त्यामुळे तसं करण्यापेक्षा स्थानिक गोष्टी घ्या. आरोग्याला चांगल्या आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला थोडी मदतही.

कचरा? उचला... इतरांचाही.
आपल्याला ज्या गोष्टी कचरा वाटत नाहीत, त्याही कचराच असतात. त्यामुळे आपण तर कचरा करूच नये. पण इतरांनी केलेला कचराही येताना उचलून आणावा. म्हणजे काय तर काही पॉलिथीन बॅग जवळ ठेवा. परतीच्या वाटेवर जे जे कचरा, प्लॅस्टिक, बाटल्या दिसतील त्या उचलून आणा. आल्यावर कचराकुंडीत टाका.

पाण्याच्या टाक्या धुणं...
हे सोपं असतं. किल्ल्यांवरच्या पाण्याच्या टाक्या, तळी स्वच्छ करता येतात. त्यासाठी थोडा वेळ काढून गडावर स्वच्छता मोहीम आखा. त्यासाठी माहितगार ट्रेकर्सची मदत घ्या.

कुणाच्या तरी घरी राहा...
निसर्गाला भेटा, तसं तिथल्या माणसांनाही भेटा. जमल्यास कुणाच्या घरी होम स्टे करा. स्थानिक लोकांशी गप्पा मारा. त्यांचं जगणं समजून घ्या. इकोटुरिझम तर वाढेलच पण आपला देश, आपली माणसं कळायला मदत होईल. त्यांच्या कुठल्या गरजा आपण भागवू शकू हेदेखील कळेल!

पक्षिमित्र, गिरिमित्र व्हा...
अशा संस्था आहेत त्यांचे ई-ग्रुप्सपण आहेत, फेसबुक पेजेस, वेबसाइट्स आहेत. त्यांचे सदस्य व्हा आणि निसर्ग अजून समजून घ्या. जास्त जवळ जा, निसर्गाच्या.


हे प्लीज करू नका..

१) रॉक क्लाईम्बिक करताना झाडं उपटू नका. घरटी काढून फेकून नका. फोटोग्राफी करताना झाडवेलींना छळू नका. जंगली प्राण्यांना त्रास होईल असं वागू नका. बिळं, पोळी अशा गोष्टी लांबून पहा. ते काढून टाकू नका किंवा त्यांना छेडू नका.

२) हेरिटेज वास्तू, किल्ले हे सारे इतिहासाचे साक्षिदार आहेत. त्यांच्यावर आपली नावं लिहू नका. काहीच लिहू नका. आपण येऊन गेल्याची काहीही खूण तिथं नाही राहिली तरी चालेल.
३) लाऊड म्युझिक लावून नाचू नका. ओरडू नका. अनेक ट्रेकर्स ड्रम वाजवतात, शिट्ट्या वाजवतात, ते कशाला? आयटम सॉँगवर नाचायचं तर किल्ल्यांवर कशाचा जायचं? स्थानिकांना आणि निसर्गालाही या साऱ्यानं त्रासच होतो.
४) कचरा करू नका. पाण्याच्या बाटल्या, खरकटं, प्लॅस्टिकचे डबे हे सारं तिथं टाकू नका. घरचं जेवण न्या, डबे पुन्हा स्वच्छ धुवून आणा.

५) शेकोट्या करण्याची हौस टाळा. त्यानं जंगलात आग लागू शकते. स्थानिक माणसांचा जीव धोक्यात येऊ शकतो. 

६) पाणी घाण करू नका. पाण्यातून आजार पसरतात. ते जंगली प्राण्यांनाही होतात. 

७) माकडांना खाऊ घालू नका. किंवा अन्य कोणत्याही प्राण्यांना. त्यांना आपल्या तेलकट गोष्टींची, तेलाची सवय नसते. त्यानं ते प्राणी उधळतात. त्यांची तब्येत बिघडते. आणि हवंच ते अन्न म्हणून ते अन्य लोकांवर हल्लेही करतात.

८) साप दिसला तर मारू नका. निसर्ग त्यांचं घर आहे, त्यांना शांतपणे जाऊ द्या.

९) दारू पिऊन पार्ट्या करू नका.

१०) दारू पिऊन ट्रेक करणं हा स्वत:च्या जिवाशी खेळ तर आहेच, पण निसर्गाचा अपमानही आहे.
 

sproutsenvttrust@gmail.com

Web Title: Trek It Green

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.