तिसरा डोळा!

By अोंकार करंबेळकर | Published: April 19, 2018 08:34 AM2018-04-19T08:34:07+5:302018-04-19T08:34:07+5:30

वयाच्या दहाव्या वर्षी दुर्बिणीतून त्यानं पहिल्यांदा जंगलात पक्षी पाहिला. त्यानंतर प्राणी, पक्षी, जंगल, पर्यावरण.. हेच त्याचं आयुष्य झालं. त्यासाठी विविध प्रकल्पांवर तर तो काम करतो आहेच, पण लोकांना निसर्गसाक्षर करण्यासाठीही झटतो आहे.

Third eye! | तिसरा डोळा!

तिसरा डोळा!

Next

केदार गोरे हे नाव आहे एका यशस्वी वन्यजीवतज्ज्ञाचं. गेली २० वर्षे वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरणक्षेत्रात त्याचं काम सुरु आहे. लहानपणापासून निसर्ग भ्रमंतीची त्याला जबरदस्त आवड होती. मुंबईत राहात असताना संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे त्याचं दुसरं घरंच झालं होतं. शाळेत असताना प्रत्येक सुटीमध्ये कोकणात डोंगरवाटा, खाड्या पालथ्या घालायचा एकमेव कार्यक्रम निवडल्यामुळे त्याची सह्याद्रीची चांगलीच ओळख झाली. याच काळात वयाच्या दहाव्या वर्षी त्याच्या हाताला एक भन्नाट वस्तू लागली. ती होती दुर्बिण. वयाच्या दहाव्या वर्षी या दुर्बिणीतून पहिल्यांदा त्यानं जंगलात पक्षी पहिला. या पहिल्या रोमांचकारी अनुभवानंतर त्याची दुर्बिणीशी मैत्री झाली ती कायमचीच.

निसर्गात भ्रमंतीच्या आणि प्राणी-पक्ष्यांच्या या आवडीमुळे त्यानं प्राणीशास्त्रात शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. वीस-पंचवीस वर्षांपुर्वी अशा विषयात शिक्षण घेऊन काम करण्याला सहज संमती मिळणं अवघड होतंच. पण थोडे आढेवेढे घेतल्यानंतर पालकांनी केदारला परवानगी दिली.

१९९६ साली त्यानं डब्ल्यू डब्ल्यू एफमध्ये निसर्ग शिबिरं भरवण्याचं काम सुरू केलं. या कामामुळं त्याला भारतात आणि आफ्रिकेत फिरण्याची भरपूर संधी मिळाली. भारतातील बहुतांश सर्व जंगलं आणि निसर्गशिबिराच्या जागा त्यानं पालथ्या घातल्या. बिनभिंतीच्या या शाळेत त्याला प्राणी, पक्षी, झाडांबददल भरपूर निसर्गज्ञान मिळालं. अशी झपाटलेली ८ वर्ष गेल्यानंतर त्यानं वसंत जे. शेठ मेमोरियल फाऊंडेशनमध्ये पर्यावरण प्रकल्पांमध्ये काम सुरु केलं. पुढच्या काळात त्याला ठाणे आणि नवी मुंबईतील पाणथळ जागांवर संशोधन करण्याचं काम करण्याची संधी मिळाली. केदार वन्यजीवांचं उत्तम छायाचित्रण करतो. वन्यजीव संवर्धनासाठी फोटोग्राफीच्या माध्यमातूनही तो काम करत आहे.

२००९ साली त्याच्या या ग्रीनकरिअरला महत्त्वाचं वळण लागलं. ते म्हणजे त्याला द कॉर्बेट फाऊंडेशनमध्ये नोकरी मिळाली. यानंतर त्यानं कधी मागे वळून पाहिलंच नाही. जंगलांच्या आसपासच्या भागात मानव आणि वन्यप्राणी यांच्यामधील संघर्षाच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी कॉर्बेट फाऊंडेशन काम करत आहे. पाणलोट विकास, जंगलाजवळ राहाणाऱ्या बेरजगार तरुणांना प्रशिक्षण देणं, वन्यजीवांच्या संरक्षणाचे कार्यक्रम, खेळ-माहिती, पुस्तिकांच्यामाध्यमातून मुलांना वन्यजीव संवर्धनाची माहिती देणं अशा अनेक कामांमध्ये तो सहभाग घेतो. यासाठी कधीकधी शाळांमध्ये जाऊन मुलांशी संवाद साधला जातो. शाळकरी मुलांच्या प्रश्नांना उत्तरं देऊन त्यांना निसर्गज्ञान देण्याचं कामही केदार करतो.

समाजमाध्यमातून तो सध्या मानवी चुकांमुळे होणाऱ्या प्रश्नांबद्दलही विचार मांडतो. शहरांमध्ये कबुतरांसारख्या एकाच पक्ष्याची संख्या मानवी चुकांमुळं वाढणं किंवा सी-गलसारख्या परदेशी पक्ष्यांना फरसाण, शेव वगैरे खायला घालून त्यांच्या आहाराच्या सवयी बदलणं या शहरी लोकांच्या सवयींवर तो जबरदस्त टीका करतो. अशा सवयींमुळं आपण निसर्गात हस्तक्षेप करत आहोत आणि पर्यायानं प्राणी-पक्ष्यांचं नुकसान करत आहोत हे तो स्पष्टपणे मांडतो.

द कॉर्बेट फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यानं गुजरातमधील कच्छ येथे माळढोक संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये सहभाग घेतला. तेथे आलेल्या अनुभवांवर एक कॉफी टेबल पुस्तकही प्रकाशित करण्यात आले आहे. केदार या पुस्तकाचा सहलेखक आहे. या पुस्तकांचं प्रकाशन २०१६ साली हवाई येथे झालेल्या आययुसीएन वर्ल्ड कॉन्झर्वेशन काँग्रेसमध्ये प्रकाशन करण्यात आलं होतं. २००९ आणि २०१२ साली त़्याला नेदरलँड सरकारतर्फे एनयूएफएफआयसी फेलोशिप मिळाली तसेच अमेरिकन गृह मंत्रालयाच्या इंटरनॅशनल व्हीजीटर फेलोशिप प्रोग्राममध्ये सहभागी होण्याची संधीही पर्यावरणक्षेत्रातील कामामुळे मिळाली आहे. २००५ पासून तो आययुसीएनच्या शिक्षण आणि संवाद विभागाचा सदस्य आहे. अशा अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रकल्पांमध्ये तो सहभागी झाला आहे.

अत्यंत वेगाने विकास करणारा विकसनशिल देश म्हणून आज आपल्या देशाची ओळख आहे. तसेच भारतामध्ये कुशल मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात तयार होत आहे. येत्या दशकभरामध्ये भारताची स्थिती चांगल्या दिशेने बदललेली असेल असा विश्वास त्याला वाटतो. कॉर्बेट फाऊंडेशन सध्या जीम कॉर्बेट, कान्हा, बांधवगड, काझीरंगा अशा व्याघ्रप्रकल्पाच्या ग्रामीण, निमशहरी आणि शहरी लोकांना अधिकाधिक निसर्गसाक्षर करण्याचा प्रयत्न करत आहे. विकासापासून दूर राहिलेल्या या लोकांना पर्यायी काम मिळावं आणि शाश्वत विकासाच्या दिशेने आपली पावलं पडावीत यासाठी फाऊंडेशनचे काम सुरु आहे.

केदार म्हणतो, आज आकारास येणारी पिढी आपल्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांना निसर्ग, पर्यावरण, वन्यजीवांसदर्भातील विषयांची माहिती देणं ही काळाची गरज आहे. आज लहान असणारी मुलं उद्याचे नागरिक आहेत. लहानपणापासूनच ते पर्यावरणसाक्षर आणि निसर्गाबद्दल संवेदनशील बनले तर भविष्यात नक्कीच जबाबदार समाजाची निर्मिती होऊ शकेल.
अशा प्रकारचं करिअर निवडण्याबद्दल तो सांगतो.. जेव्हा पॅशन हेचतुमचं प्रोफेशन होतं तेव्हा तुमच्याकडे अमर्याद ऊर्जा उपलब्ध होते. आपण ‘काम करतोय’ असं कधी वाटतच नाही. मला नेहमीच वन्यप्राण्यांशी संबंधित काम करायचं होतं त्यामुळे मला कधीच माझ्या कामाचा कंटाळा येत नाही.

कोणाला आपल्या छंदाचं, आवडीचं रुपांतर कामात करायचं असेल तर केदार त्यांना प्रोत्साहन देतो. मी स्वत: माझ्या कामात अत्यंत समाधानी आहे तुम्हीही असेच समाधान मिळवू शकाल असं त्याचं सांगणं आहे.

वन्यजीवांचा होतोय ऱ्हास
भारतातील काही महत्त्वाच़्या विषयांकडे केदार नेहमी तरुणांचं लक्ष वेधून घेतो. भारतातील जंगलांच्या आसपासच्या प्रदेशात होणारी शिकार कमी झाली तर अनेक समस्या सुटतील असं तो सांगतो. भरमसाठ इमारतींचं बांधकाम, खाणकाम, नियोजन न करता केलेले पर्यटन प्रकल्प, रस्ते आणि रेल्वेमार्गाचं आक्रमण यामुळे जंगलं तसेच अनेक वन्यजीवांचा अधिवास नष्ट होत आहे. त्यामुळे हे वन्यप्राणी ही हळूहळू कमी होताहेत. १९९० पासून जगातील ६४ टक्के पाणथळ जागा नष्ट झाल्या आहेत. त्यातही आशियातील पाणथळ जागा नष्ट होण्याचा वेग खूप मोठा आहे. भारतामध्ये गोड्या पाण्याच्या स्रोतांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे, त्यांच्याकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे.
 

Web Title: Third eye!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.