गोष्टी... न संपणाऱ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 01:12 PM2017-09-21T13:12:39+5:302017-09-21T13:13:46+5:30

‘गोष्ट नेमक्या कोणत्या काळात सांगायची रे? वर्तमानात की भूतकाळात?’ परवा एका मैत्रिणीनं विचारलं आणि विचारचक्र सुरू झालं...

Things ... not ending ... | गोष्टी... न संपणाऱ्या...

गोष्टी... न संपणाऱ्या...

Next
ठळक मुद्दे ‘गोष्ट नेमक्या कोणत्या काळात सांगायची रे? वर्तमानात की भूतकाळात?’ परवा एका मैत्रिणीनं विचारलं आणि विचारचक्र सुरू झालं...गोष्ट कायम भूतकाळातच लिहायची असा शाळेत शिकवलेला नियम पाळायचं ठरवलं तर फक्त घडून गेलेल्या गोष्टीच ‘गोष्टी’ ठरतील.

- प्रसाद सांडभोर
 

    ‘गोष्ट नेमक्या कोणत्या काळात सांगायची रे? वर्तमानात की भूतकाळात?’ परवा एका मैत्रिणीनं विचारलं आणि विचारचक्र सुरू झालं...
गोष्ट कायम भूतकाळातच लिहायची असा शाळेत शिकवलेला नियम पाळायचं ठरवलं तर फक्त घडून गेलेल्या गोष्टीच ‘गोष्टी’ ठरतील. पण मग आता - इथे - लाइव्ह घडणाऱ्या - बिघडणाऱ्या गोष्टी ‘गोष्टी’ नाहीत का? आणि भविष्यातल्या कल्पना, दिवास्वप्नांच्या गोष्टी? त्यांचं काय? मुळात एखाद्या गोष्टीला काळाचं बंधन हवंच कशाला? नियम तोडून, खुल्या-मोकळ्या मनानं, आजूबाजूला पहावं तर सगळीकडे गोष्टीच गोष्टी आहेत...

टेबलाजवळ जरा तिरकी उभी एक एकटी खुर्ची...
कपाच्या तळाशी उरलेली- थंड झालेली - तीन घोट कॉफी.
खिडकीतून दिसणाऱ्या झाडाची विशिष्ट कोनात वळलेली फांदी.
रस्त्याच्या मधोमध पडलेली एक चिमुरडी चप्पल.
अंगावर कुठे एखाद्या जखमेचा राहून गेलेला व्रण.
फुटपाथवरच्या सिमेंटमध्ये पक्के झालेले कुणा कुत्रुल्याच्या पायांचे ठसे.
या साऱ्या गोष्टीच गोष्टी...

   आपण नीट लक्ष देऊन ऐकल्या, पाहिल्या तरच वाचता येणार ! काही गोष्टी शोधाव्या, आठवाव्या लागणार. काही कायम लक्षात राहणार. काही गोष्टी लांबच लांब, काही गोष्टी छोट्याशाच. लहानसहान. काही गोष्टी अनंत - अखंड - न संपणाऱ्या. काही गोष्टी संपून पुन्हा सुरू होणाऱ्या.
   आणि काही गोष्टी मात्र अशाच - बिनसुरुवात - बिनशेवट - नुसत्याच ‘असणाऱ्या’.
 
 

Web Title: Things ... not ending ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.